असा त्याग केवळ रा.स्व.संघ संस्कारातच!

    दिनांक  28-Apr-2021 18:31:31
|
RSS _1  H x W:


स्वयंसेवक श्री नारायणजींच्या कामगिरीला देशभरातून प्रणामनवी दिल्ली : "मी ८५ वर्षांचा झालोय. संपूर्ण जीवन पाहिलंय. मात्र, जर त्या स्त्रीच्या पतीचे निधन झाले तर त्यांची मुलं अनाथ होतील. यासाठी माझे कर्तव्य हेच आहे की, मी त्या व्यक्तीचे प्राण वाचवावेत..", असे म्हणत रा.स्व.संघाचे स्वयंसेवक नारायणराव दाभाडकर यांनी आपला बेड त्या रुग्णाला देऊ केला. दुसऱ्या व्यक्तीच्या प्राणांची रक्षा करताना श्री नारायणजी दाभाडकर अवघ्या तीन दिवसात अनंतात विलीन झाले. राष्ट्रीय स्वयंसेवकांच्या या त्यागाला संपूर्ण देश नमन करतोय. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी समाज माध्यमांद्वारे ही माहिती दिली.
 
 
 
देश कोरोना महामारीशी लढत आहे. दुसरी लाट ही आवाक्याबाहेर जात आहे. या महामारीमुळे हाहाःकार माजला आहे. रुग्णालयांमध्ये बेडची कमतरता आहे. रुग्णालयांत बेड आणि ऑक्सिजनची कमतरता, आयसीयू बेड उपलब्ध न होऊ शकल्याने होणारी गैरसोय यामुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. सोशल मीडियावर माणसं रुग्णालयाच्या दारात तडफडून मरत असल्याचे मन सुन्न करणारे व्हीडिओ व्हायरल झालेत. हा गोंधळ सुरू असताना एक विचार करायला लावणारी घटना घडली आहे.
 
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका स्वयंसेवकांनी दाखवलेली मानवता डोळे ओले करणारी आहे. नारायण भाऊराव दाभाडकर (वय ८५) कोरोनावर रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांनी या उपचारादरम्यान दाखवलेल्या दातृत्वात आपले प्राण पणाला लावले. नारायण भाऊराव दाभाडकर अतिदक्षता विभागात (आयसीयू) दाखल होते. त्यांच्यावर उपचाराची गरज होती. पण एका व्यक्तीसाठी त्यांनी आपला बेड देऊ केला. स्वतःची अवस्था गंभीर असतानाही त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत संघ संस्कार कायम ठेवले.
 
 
 
एक महिला तिच्या पतीला घेऊन रुग्णालयात दाखल झाली होती. रुग्णाला बेड मिळावा यासाठी तिची धडपड सुरू होती. पती दगावेल या भीतीने तिला हुंदके येत होते. परंतू, बेड काही केल्या मिळत नव्हता. दाभाडकर यांना ही बाब लक्षात आली. रुग्णशय्येवर गंभीर अवस्थेत असतानाही त्यांनी आपल्या कुटूंबियांना आपला बेड त्या रुग्णाला देण्याचे कळवले. हे सांगत असताना ते म्हणाले, "मी आता ८५ वर्षांचा आहे. माझं आयुष्य मी जगून घेतलं आहे. पण जर तो व्यक्ती दगावला तर त्याच्यासकट पत्नी व त्याची मुलं अनाथ होतील." हे सांगून ते घरी परतून आले. तीन दिवसांत त्यांनी आपले प्राण सोडले.
 
 
केंद्रीय मंत्र्यांनी केले त्यागाला नमन
 
 
नारायण भाऊराव दाभाडकर यांची गोष्ट संपूर्ण देशाला कळली. केंद्रीय मंत्री जनरल वीके सिंह यांनी फेसबूकवर त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ एक पोस्ट शेअर केली आहे. "रुग्णालयात ४० वर्षीय महिलेच्या पतीला बेड मिळाला नाही म्हणून गंभीर अवस्थेत दाभाडकर यांनी स्वतःचा बेड देऊ केला. ही परिस्थिती विषम असली तरीही त्यांच्याकडून प्रेरणा घेण्यासारखं खूप आहे.
 
 
शिवराज सिंह यांनी वाहिली श्रद्धांजली
 
 
मध्यप्रदेशचे मुख्यंमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही दाभाडकर यांना श्रद्धांजली अर्पण केली. दुसऱ्या व्यक्तीचा प्राण वाचावा यासाठी तीन दिवसांतच स्वतःचे प्राण सोडले. राष्ट्राचे खरे सेवकच अशी पवित्र सेवा करू शकतात. त्यांच्या सेवा कार्याला सलाम, असे म्हणत त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
 
 
 
ऑक्सिजन पातळी घटली
 
 
नारायणराव दाभाडकर काही दिवसांपूर्वी कोरोना संक्रमित झाले होते. त्यांची कोरोनामुळे ऑक्सिजन पातळी कमी झाली होती. त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. जावई आणि मुलीने त्यांना इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. त्यांनाही बेड मिळवण्यासाठी खटपट करावी लागली होती. अशातच एक महिला तिथे बेड शोधण्यासाठी पोहोचली. जोराजोरात रडत होती. तिचा आक्रोश ऐकून दाभाडकर स्वतः बेडवरून उठवले आणि महिलेच्या पतीला बेड देऊन स्वतः घरी परतले. त्यांच्या या देशसेवेला कोटी कोटी प्रणाम....

 

RSS _1  H x W:  
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.