ठाणे : मुंब्य्रातील प्राईम रुग्णालयात अग्नितांडव

28 Apr 2021 10:35:00

Thane_1  H x W:
 
ठाणे : मुंब्य्रातील नॉन कोविड प्राईम हॉस्पिटलला बुधवारी पहाटे अचानक आग लागल्याने हलकल्लोळ माजला. रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेल्या २० रुग्णांना इतरत्र हलवण्यात आले. मात्र, ३ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यु झाल्याचे वृत्त असुन आगीमुळे नव्हे तर इतरत्र हलवताना दोघांचेच मृत्यु झाल्याचा दावा ठाणे महानगर पालिका प्रशासनाने केला आहे. दरम्यान, दुर्घटना टाळण्यासाठी सर्व रुग्णालयांचे फायर, ऑक्सिजन व विद्युत यंत्रणेचे तातडीने ऑडिट करण्याचे आदेश मंगळवारी ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिले असतानाच मुंब्यात आगीची दुर्घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
 
 
 
मुंब्रा, कौसा येथील प्राईम क्रिटीकेअर या नॉन कोविड रुग्णालयात एकूण २० रुग्ण उपचार घेत होते. त्यातील ४ जण आयसीयुत ॲडमीट होते. बुधवारी पहाटे ३.४० च्या सुमारास अचानक शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीत तीन रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.आगीची माहिती मिळताच मुंब्रा येथील आमदार व राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड तसेच ठाणे महापालिकेचे अधिकारी वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. अग्निशमन दलाचे जवान आग नियंत्रणात आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती ठामपा प्रशासनाकडुन देण्यात आली आहे. यावेळी आव्हाड यांनी तीन रुग्णांचा होरपळुन मृत्यु झाल्याचे म्हटले असुन मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाखांची तर जखमींना १ लाखांची मदत जाहीर करण्यात आल्याचे सांगितले.दरम्यान, भाजप नेते किरिट सोमय्या यांनी बुधवारी सकाळी रुग्णालयाला भेट दिली.तसेच,गेल्या काही दिवसात ठाण्यात लागोपाठ घडत असलेल्या दुर्घटनाबाबत चिंता व्यक्त करून प्राईम रुग्णालयात ४ जणांचा मृत्यु तर दोघे अत्यवस्थ असल्याचा दावा केला.
 
 
 
Powered By Sangraha 9.0