जलशुद्धीकरणाची प्रकिया आणि महत्त्व

    26-Apr-2021
Total Views |

water purifying_1 &n


झाडांना, प्राण्यांना, पक्ष्यांना जे पाणी चालते, ते पाणी माणसाला पिण्यासाठी योग्य असेलच असे नाही. माणसाच्या वापरासाठी अशुद्ध पाणी, दुष्ट पाणी शुद्धीप्रक्रियेतून पाठवून त्यानंतर पिण्याजोगे, वापरायोग्य केले जाते. आज या शुद्धीप्रक्रियेबद्दल जाणून घेऊया.



जगभरात जलशुद्धीकरणाचे नियम थोडेे भिन्नभिन्न आहेत, तसेच गावात व शहरातही माणसाच्या वापरासाठीचा स्रोत व त्यावरील शुद्धीप्रक्रिया वेगवेगळी आहे. बर्‍याचशा गावांमध्ये नळाचे पाणी आता पोहोचले आहे. तरी काही अंशीं नदीतील पाणी, विहिरीतले पाणीही अजून वापरले जाते. वाहत्या जलाशयातले पाणी साठवलेल्या जलाशयातल्या पाण्यापेक्षा अधिक शुद्ध असते. जलशुद्धीकरण प्रक्रियेसाठी भूजल व नळाचे पाणी दोन्ही वापरले जाते. अशुद्धी ही मुख्यत्वे करून तीन प्रकारांची असते. यालाच ‘कंटामिनन्ट्स’ म्हणजेच भेसळ असे म्हणतात. हे तीन प्रकार म्हणजे फिजिकल, केमिकल आणि बायोलॉजिकल कंटामिनन्ट्स (म्हणजेच शारीरिक अशुद्धता) मध्ये दगड, खडे, काचेचे तुकडे, धातूचे कण, बाटल्या, त्यांची झाकणे, लेबल्स इत्यादींचा समावेश होतो. ‘केमिकल कंटामिनन्ट्स’ म्हणजेच रासायनिक अशुद्धी यात साबणाचे अवशेष स्वच्छतेसाठी (Soaps, Cleaner, bleaching, Agents, Softness, Shampoo, Sanitizer, Pollishes, Cleanser) इ. वापरली जाणारी विविध सामग्री यांचा समावेश होतो. ‘बायोलॉजिकल कंटामिनन्ट्स’ म्हणजे जैविक अशुद्धी यात कीटक, विविध किडे व अन्य जीवजंतूची विष्ठा, मृत शरीर, पालापाचोळा, जंतू, विषाणू, बुरशी-परजीव इत्यादींचा समावेश होतो. या प्रकारची अशुद्धी असल्यास ते पाणी वापरण्यास अहितकर आहे, असे समजावे. ’फिजिकल कंटामिनन्ट्स’ काढण्यासाठी गाळणे (फिल्टरेशन) ही पद्धत सगळ्यात उत्तम आहे. यासाठी मलमलचे, मऊ सूत कापड घेऊन ते पाच पदरी करून, त्यातून पाणी गाळून घ्यावे. काही वेळेस पाण्यात गढूळपणा अधिक असतो, अशा वेळेस ते पाणी मोठ्या पात्रात घेऊन तुरटी फिरवावी. गढूळ पाण्यातले कण पाण्याच्या तळाशी जाऊन बसतात आणि वरचे पाणी शुद्ध होते. काही वेळेस त्याची चव मचूळ असते. असे असल्यास ते पाणी पिण्यासाठी वापरू नये, पण अन्य कामांसाठी उपयुक्त असते. या प्रकारच्या शुद्धीप्रक्रियेल Sedimentation Process म्हणतात.

पाणी उकळवून प्यायला वापरल्यास ते अधिक शुद्ध होते, यासाठी अशुद्ध पाणी आधी गाळून घेऊन स्थिर होऊ द्यावे. त्यातील Suspended solids तळाला स्थिरावले की, वरील पाणी उकळावे. उकळताना पाण्याला उकळी आल्यानंतर पुढे १०-१५ मिनिटे तापवावे, आटवावे. या पाण्यातील तीनही प्रकारच्या अशुद्धी (फिजिकल, केमिकल आणि बायोलॉजिकल) नाहीशा होतात. असे पाणी तापवताना त्यात सोन्याचा तुकडा (शुद्ध सोन्याचे नाणे/ वळं) घालून उकळविल्यास ते पाणी अधिक हितकर होते. सोन्याचा तुकडा घालून पाणी उकळावे व ते स्वत:हून थंड झाले की, पिण्यास वापरावे. याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास व टिकण्यास खूप फायदा होतो. या पाण्याला ‘सुवर्ण सिद्धजल’ म्हणतात. ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे, जे वृद्ध आहेत, ज्यांची पचनशक्ती नाजूक आहे, लहान बालकं, रुग्ण इ. नी हे सुवर्णसिद्ध जल प्यायल्यास खूप गुणकारी सिद्ध होते. पण, दरवेळेस असे उकळविणे शक्य नसते. तसेच पाणी शुद्ध आहे की अशुद्ध हेदेखील फक्त रंगाने कळून येत नाही, अशा वेळेस ‘हाऊस होल्ड फिल्टर्स’ उपयोगी पडतात. हल्ली घरांमध्ये विविध प्रकारचे ‘वॉटर फिल्टर्स’ असतात. पण, त्याने नेमकी कुठली अशुद्धी कमी होते, हे माहीत आहे का? घरगुती ‘फिल्टर्स’ जे साधारण वापरले जातात ते तीन प्रकारचे आहेत.


१- Carbon filter, २- RO Filter आणि ३- UV filters


१) चारकोल-कार्बन फिल्टर


या प्रकारच्या शुद्धीकरण प्रक्रियेत पाणी गाळताना ‘अ‍ॅक्टिव्हेटेड चारकोल’च्या चेंबरमधून पाणी पाठविले जाते. यामुळे पाण्यातली अशुद्धी त्या ‘अ‍ॅक्टिव्हेटेड चारकोल पार्टिकल्स’ मध्ये अडकते व शुद्ध पाणी फिल्टर होऊन बाहेर येते. या पाण्यात नैसर्गिक खनिजे राहतात. त्यांचा निचरा होत नाही. मुख्यत्वे करून भौतिक अशुद्धीसाठी ‘चारकोल-कार्बन फिल्टर’चा अधिक वापर होतो. त्याचबरोबर Chlorinated VOC's (volatile organic compounds) चव आणि पाण्याचा वास याचीदेखील शुद्धी होते.


२) आरओ फिल्टर


यामध्ये ’Reverse osmosis' तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. रासायनिक अशुद्धी अधिक असते. यावेळी ’आरओ फिल्टर’चा उपयोग अधिक चांगला होतो.’आरओ फिल्टर’द्वारे पाण्यामध्ये विरघळलेली खनिजे व अशुद्धी सुमारे ९० टक्के इतक्या प्रमाणात काढले जातात, तर पाण्यामध्ये ‘टीडीएस’ 500 PPM (Parts Per Million) इतका किंवा यापेक्षा जास्त असेल, तर ’आरओ फिल्टर’चा वापर उपयोगी पडतो. महानगरपालिकेचे पाणी मुख्यत्वे करून नदी व तलावांच्या स्रोतांपासून येते. अशा भूजलामध्ये ‘टीडीएस’ कमी असतो. जर टँकरचे पाणी, बोअरवेलचे पाणी असेल, तर ते भूजल पद्धतीचे असते आणि त्यात ‘टीडीएस’ जास्त असण्याची शक्यता आहे. अशा वेळेस ’आरओ फिल्टर’ अधिक उपयोगी पडते.


३) युव्ही फिल्टर


जैविक अशुद्धी काढण्यासाठी या प्रकारचे शुद्धीकरण उत्तम ठरते. यातून जंतू, विषाणू इ. चा निचरा होतो. ’आरओ फिल्टर’मधून अतिरिक्त खनिजे निघून गेल्यामुळे ‘हार्ड वॉटर’ (जड पाणी) ‘सॉफ्ट’ (साधारण) होते. त्याच्या चवीतही बदल होतो. ‘युव्ही फिल्टर’मध्ये जड पाणी साधारण करण्याची क्षमता नाही. पाण्याची चवही बदलत नाही. पण, ’आरओ फिल्टर’मधून शुद्धीकरण प्रक्रियेच्या वेळेस जी खनिजे निघून जातात, ती ठराविक मात्रेपेक्षा/प्रमाणापेक्षा जर अधिक गेली, तर शरीरास अशा ’आरओ फिल्टर’चा दीर्घकालीन वापराने अपाय होऊ शकतो. तेव्हा आपल्याला प्राप्त होणारे पाणी कसे आहे हे बघून प्युरिफायर वा फिल्टर निवडावा. पाणी भरताना/साठवताना सगळ्यात मोठी खबरदारी जी प्रत्येकाने घ्यावी, ती म्हणजे पाण्याशी हाताचा/बोटांचा संपर्क होऊ नये. कारण, अशुद्धी पाण्यात जाण्याचा तो एक मोठा स्रोत आहे. (क्रमशः)


- वैद्य कीर्ती देव
(लेखिका आयुर्वेदिक कॉस्मोटोलॉजिस्ट व पंचकर्मतज्ज्ञ आहेत.)