युक्तीपासून इंटलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स’ पर्यंत...

    26-Apr-2021
Total Views |

Untitled-1 _1  
 
 
आज दि. २६ एप्रिल म्हणजेच ‘इंटलेक्चुअल प्रॉपर्टी डे.’ सध्याच्या या स्पर्धात्मक युगामध्ये आपल्या बुद्धीमधून निर्माण झालेल्या एखाद्या संकल्पनेची किंवा वस्तूची नोंदणी करणे आवश्यक आहे. कारण, तसे न केल्यास आपल्या संकल्पनेची, वस्तूची, ब्रॅण्डची पुनरावृत्ती होऊ शकते. कायद्याच्या चौकटीमध्ये ही नोंदणी ‘इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स’च्या अंतर्गत करता येते. ही नोंदणी कोण करू शकतं? ती कशी करायची? आणि त्याचे फायदे काय ? या विषयाविषयी ऊहापोह करणारा हा लेख...
 
 
 
 
आज ‘इंटलेक्चुअल प्रॉपर्टी’ या दिनानिमित्त एक मजेदार किस्सा आठवला. गेल्या वर्षी, नवरात्रीच्या आसपास, मी कायद्याची सल्लागार (फ्रँचायझी वकील) म्हणून एका क्लायंटला कराराबाबत भेटायला गेले होते. आम्ही सर्व नियम, अटी आणि त्यांचा बिझिनेस प्लान, या सर्व बाबींवर चर्चा केली . माझ्या क्लायंटने, लोकांच्या हितासाठी एक आधुनिक पद्धतीचा जिम (व्यायामशाळा) सुरू केली होती आणि त्यांना त्या उद्योगाच्या संपूर्ण महाराष्ट्रात शाखा (फ्रँचायझी) सुरू करायच्या होत्या. मी, कायद्याची सल्लागार (फ्रँचायझी वकील) असल्यामुळे, एक प्रश्न त्यांना विचारला.“ताई, तुमची जिम अत्यंत प्रशस्त आणि आधुनिक पद्धतीची आहे. तुम्हाला तुमच्या उद्योगाच्या शाखा (फ्रँचायझी) संपूर्ण महाराष्ट्रात वाढवायच्या आहेत. तुम्ही या व्यवसायासाठी मोठी गुंतवणूक केली आहे, ही खरंच कौतुकाची गोष्ट आहे. परंतु, तुम्ही ब्रॅण्डच्या नावाचा (लोगो) ‘ट्रेडमार्क’ रजिस्टर केला का?” त्यावेळी मोठ्या अभिमानाने त्यांनी सांगितले की, त्यांनी एका एजंटकडे लोगो, ‘ट्रेडमार्क’ रजिस्ट्रेशनसाठी दिला आहे.
 
 
 
 
 
मग मी त्यांना विचारले,“तुम्ही जिमच्या ब्रॅण्डचे नाव ठरवताना, ते नाव, स्वतःला हवे असलेले दिले आहे की, आधीपासून उपलब्ध नाव दिलेले आहे, हे तपासून बघितले?” तेव्हा त्या हडबडल्या आणि कोरा चेहरा करून माझ्याकडे बघू लागल्या. मी लगेच मोबाईल काढला आणि ‘ट्रेडमार्क-आयपीआर’ची ‘वेबसाईट’ आणि ‘गुगल’वर त्या नावाची ‘जिम’ शोधायला सुरुवात केली. आलेले परिणाम अत्यंत धक्कादायक होते. त्या नावाची ‘जिम’ गेल्या सात वर्षांपासून रजिस्टर होतीच, याउलट मुंबईतून दहा ‘जिम’नी त्या नावासाठी आधीच फॉर्म भरला होता आणि त्यांचा प्रस्ताव (अर्ज) फेटाळला जाऊन कायदेशीर कारवाईसुद्धा झाली होती.
 
 
 
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, त्या ताईंचा अर्जसुद्धा फेटाळला (रिजेक्ट) होता. जेव्हा हे संपूर्ण चित्र मी त्यांच्यासमोर मांडले, त्यांना घाम फुटला. त्यांनी जवळ जवळ जिमसाठी ४०-५० लाख रुपये खर्च केला होता. त्याचसोबत, ‘ट्रेडमार्क’साठी ५० हजार रुपये मोजून थाटामाटात जिम सुरू केल्या होत्या. उद्योग वाढवण्यासाठी विचार करत असताना या सर्व गोष्टी अशा किचकट होतील, याचा त्यांनी कधी स्वप्नातसुद्धा विचार केला नव्हता. त्यांच्यासोबत जी फसवणूक झाली, त्यामुळे कोणीही ‘आयपीआर रजिस्ट्रेशन’ करताना, त्याची संपूर्ण माहिती योग्य अशा कायदेशीर सल्लागाराकडून घेणे आवश्यक आहे.
 
 
 
 
बरेच उद्योजक हे नवीन असल्यामुळे, उद्योगाच्या प्रेरणेत भारावून जाऊन उद्योग सुरू करतात आणि स्वतःच्या उद्योगाला त्यांना हवे असे किंबहुना देवदेवतांचे नाव देतात. उदा. ‘साईबाबा ट्रॅव्हल’, आता ‘साईबाबा’ हे नाव हे इतके प्रसिद्ध आहे की त्याचा ट्रेडमार्क तुम्हाला कधीच मिळत नाही. हे उद्योजक ‘ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन’करिता एखाद्या कायदेशीर सल्लागाराकडे जाण्यापेक्षा एखाद्या दलालाकडून करून घेतात. त्या दलालाला कायद्याची, ‘आयपीआर’ची विशेष माहिती नसल्यामुळे, तो उद्योजकाला योग्य मार्गदर्शन देऊ शकत नाही आणि तो फक्त तुम्ही सांगितलेल्या ‘ब्रॅण्डनावा’चा ‘ट्रेडमार्क’ रजिस्ट्रेशनचा फॉर्म भरतो. परंतु, दिलेल्या ब्रॅण्डचे नाव रजिस्ट्रेशनआधी उपलब्ध आहे का? हे तो कधीच शोधात नाही. त्यामुळे ते ब्रॅण्ड नाव आणि ‘ट्रेडमार्क’ हे उद्योजकाला कधीच मिळत नाही आणि उद्योजकाचे मोठे नुकसान होते.
 
 
 
आजच्या स्पर्धात्मक युगात, जेव्हा तुम्हाला तुमची कल्पना, तुमचा उद्योग, तुमचा लोगो, तुमचे संशोधन, तुमचे लेखन, तुमचे संगीत, मॉडेल, औद्योगिक आराखडा (इंडस्ट्रियल डिझाईन), या सर्व गोष्टी स्वतःच्या नावावर ‘रजिस्टर’ करायच्या असतील, तर त्या इंटलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स’च्या अंतर्गत ‘रजिस्टर’ होतात. तुम्ही बनवलेल्या किंवा तुमच्या बुद्धीतून निर्माण झालेल्या गोष्टी, जी तुमची संपत्ती असते, त्याला कायद्याच्या भाषेत ‘इंटलेक्चुअल प्रॉपर्टी’ असे म्हणतात आणि त्याच्यावर असलेल्या तुमच्या हक्कांना, ‘इंटलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स’ असे बोलले जाते.
 
 
 
‘इंटलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स’ इतके प्रभावी आणि फायदेशीर माध्यम आहे की, उद्योजकाला आणि उद्योगांना नेहमीच सुरक्षित ठेवते. उदा. २०१२ मध्ये ‘सॅमसन’ कंपनीने त्याच्या मोबाईलमध्ये ‘अ‍ॅपल’ कंपनीच्या मोबाईलसारखा पेटंट वापरला. म्हणून ‘सॅमसन’ कंपनीला ‘पेटंट इंफ्रिजमेण्ट’च्या कायदेशीर कारवाईत एक बिलियन अमेरिकन डॉलर म्हणजे जवळ जवळ ७,५०० कोटी रुपये द्यावे लागले. हीच तर जादू आहे, ‘इंटलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स’ची.
 
 
 
आज ‘एरिक्सन’ कंपनी स्वतःचे मोबाईल न बनवता स्वतःचे पेटंट इतर मोबाईल कंपनींना देऊन कोट्यवधी रुपये कमावते. तसेच ‘सोनी’ कंपनीच्या ‘पेटंट कॅमेरा लेन्सेस’ बर्‍याच नवीन मोबाईलमध्ये वापरल्या जातात, ज्याचा फायदा ‘सोनी’ कंपनीला होतो. म्हणून आपला उद्योग, आपले कौशल्य याचा योग्य ब्रॅण्ड रजिस्टर करा आणि आपली अद्वितीयता संपूर्ण जगासमोर सिद्ध करा. या सर्वात मोठा फायदा तुम्हाला तुमच्या उद्योगात, फ्रॅन्चायझी निर्माण करण्यात किंवा इतरांसोबत असोसिएशनमध्ये काम करण्यात होतो.
 
 
 
भारतात खालील प्रमाणे ‘इंटलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स’ रजिस्टर होतात किंवा त्यांचे वर्गीकरण होते. 

१) ट्रेंड मार्क - ट्रेंड मार्कमध्ये नाव, संस्थेचे नाव, शब्द, ओळ, लोगो, चिन्ह, डिझाईन, आकृती हे सर्व रजिस्टर होतात. उदा. ‘मॅकडॉनल’चा लोगो, ‘एलआयसी’ची टॅगलाईन 'जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी'
 
 
 
२) कॉपी राईट - कॉपी राईटमध्ये साहित्य, संगीत, कलात्मक गोष्टी रजिस्टर होतात. उदा. लता मंगेशकरांनी गायलेली गाणी, कुसुमाग्रजांच्या कविता, पु.ल.देशपांडेंची पुस्तके, ‘मायक्रोसॉफ्ट’ कंपनीचे विंडो ऑपरेटिंग सिस्टीम
 
 
३) पेटंट- पेटंटमध्ये तुम्ही केलेले संशोधन, तुम्ही शोधलेला फॉर्म्युला रजिस्टर होतो. औषधांचे, मसाल्याचे फॉर्म्युले, एखाद्या यंत्राचे, मोबाइलचे मॉडेल.
 
 
४) इंडस्ट्रिअल डिझाईन- यामध्ये इंडस्ट्रियल उद्योगात जे ‘थ्री डी’ डिझाईन लागतात ते सर्व रजिस्टर होतात. उदा. इंडस्ट्रियल थ्रीडी डिझाईन
 
 
५) जिऑग्राफिकल इंडिकेशन- एखादी वस्तू किंवा गोष्टीला जर त्या गावाचे शहराचे किंवा ठिकाणाचे नाव पडले असेल तर ती गोष्ट जिऑग्राफिकल इंडिकेशनमध्ये रजिस्टर होते. उदा. कांजीवरम साडी, देवगड हापूस, दार्जिलिंग चहा
 
 
६) ले-आउट डिझाईन आणि इंटिग्रेटेड सर्किट- यामध्ये सेमीकंडक्टरला लागणारे सर्किट ले-आउट डिझाईन रजिस्टर होते.
 
 
लक्षात ठेवा:
  
- तुमचे ज्ञान, कला, कौशल्य तुमची आणि तुमच्या उद्योगाची संपत्ती आहे आणि त्याला चोरीपासून वाचवण्यासाठी इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स’ रजिस्टर करा.
 
 
- ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन करताना, आधी ब्रॅण्ड तपासून घ्या आणि योग्य कायद्याच्या सल्लागाराकडून रजिस्ट्रेशन करून घ्या.
 
 
- तुमच्या इंटलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स’ रजिस्ट्रेशनची पक्की पावती मागून घ्या.
 
 
- जर रजिस्ट्रेशन करताना काहीही समस्या आली, तर त्वरित तुमच्या वकिलाला भेटा.
 
 
- तुमचे इंटलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स’ रजिस्ट्रेशन वेळोवेळी नूतनीकरण करून घ्या. 
 

आयपीआर रजिस्ट्रेशन प्रत्येक उद्योगाची गरज आणि ढाल आहे. स्वतःचे अस्तित्व निर्मितीचे साधन म्हणून धरा आयपीआर रजिस्ट्रेशनचा हात आणि वाढावा उद्योग बॅण्ड संपूर्ण जगात.
 
 
अ‍ॅड. शिवांगी क. झरकर
 
 
8850373717
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.