शिवस्मृतीस अभिवादन!

26 Apr 2021 23:12:54

chatripati shivaji mahara

छत्रपती शिवाजी महाराजांची ३४१वी पुण्यतिथी चैत्र पौर्णिमा, हनुमान जयंती, शके १९४३ म्हणजेच आज, मंगळवार, दि. २७ एप्रिल या दिवशी येत आहे. यानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी केलेला हा लेखप्रपंच...


शिवरायांचा आठवावा प्रताप!

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे तेजसूर्य! अल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रमणानंतर सुमारे साडेतीनशे वर्षे महाराष्ट्र अंधःकारात चाचपडत होता. जुलमी सत्तेच्या वरवंट्याखली चिरडला जात होता, भरडला जात होता. या सुलतानी संकटापुढे हतप्रभ झालेला महाराष्ट्र आत्मविस्तृत होऊन गलितगात्र होऊन पडला होता. अशा परिस्थितीमध्ये अवसेच्या रात्रीनंतर सूर्योदय व्हावा तद्वत शिवप्रभूंचा जन्म झाला. अवघा महाराष्ट्र रोमांचित झाला, जणू उभ्या हिंदभूचा भाग्योदय झाला!


नुकतीच मिसरूड फुटू लागलेल्या शिवबाने समवयस्क मावळ्यांना सोबत घेऊन श्री रायरेश्वरासमोर हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली आणि अवघ्या २५ वर्षांमध्ये सार्वभौम हिंदवी स्वराज्याची उभारणी केली. अवघा महाराष्ट्रशक्तीची, युक्तीची अन् स्वातंत्र्यदेवतीची आराधना करू लागला. शिवराय...शिवराय ही व्यक्ती नव्हतीच मुळी. ती होती वृत्ती आणि शिवरायांनी ही वृत्ती सर्वसामान्यांच्या अंगी बाणवली आणि या सर्वसामान्यांनी असामान्य इतिहास घडवला. दिल्लीची पातशाही, निजामशाही, कुतुबशाही, आदिलशाही, इमादशाही, बरीदशाही या सार्‍या राजवटींना पुरून उरणार्‍या हिंदूपदपादशाहीची स्थापना शिवरायांनी केली. हे कार्य अलौकिक आहे. आज महाराजानंतर ३५० वर्षांनंतरही प्रेरणा देणारे आहे.


या अलौकिक महापुरूषाच्या स्मृती चिरंतत राहाव्यात त्यापासून सर्वांना स्फूर्ती मिळावी, याकरिता लोकमान्य टिळकांनी स्थापन केलेल्या ‘श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळा’तर्फे प्रतिवर्षी किल्ले रायगडावर शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रम आयोजित केला जातो. यावेळी शिवभक्त मोठ्या प्रमाणात रायगडावर शिवछत्रपतींच्या समाधीसमोर नतमस्तक होऊन महाराजांना अभिवादन करण्यासाठी एकत्र येतात. छत्रपती शिवाजी महाराजांची 341 वी पुण्यतिथी चैत्र पौर्णिमा, हनुमान जयंती, शके 1943 म्हणजेच आज, मंगळवार, दि. 27 एप्रिल या दिवशी येत आहे. यानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी या लेखाचा प्रपंच केला आहे.


हिंदवी स्वराज्यातील रायगडाचे स्थान


छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या गनिमीकाव्याला पूरक अशा पद्धतीने गडकोटांची बांधणी करून स्वराज्यासाठी लढा दिला. या सर्व किल्ल्यांमध्ये किल्ले रायगडला विशेष महत्त्व आहे. कारण, हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या या किल्ल्यावर महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि येथेच आपला अखेरचा श्वास घेऊन महाराज अनंतात विलीन झाले. सन १८१८ मध्ये मराठेशाहीचा अस्त होऊन आपला देश ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. ब्रिटिशांनी गडकोटांवर जाण्यास बंदी घातल्यामुळे बाकी सर्व किल्ल्यांप्रमाणे रायगडही पूर्णत: दुर्लक्षित होता. सन १८८३ साली जेम्स डग्लस नावाच्या इंग्रज गृहस्थाने रायगडावर जाऊन तेथील दुरवस्थेचे वर्णन लिहिले. त्याचे वर्णन वाचून भारतीय समाजात अस्वस्थता पसरली.


शिवसमाधीचा जीर्णोद्धार


स्वातंत्र्याच्या चळवळीत अग्रणी असलेल्या लोकमान्य टिळकांच्या पुढाकाराने सन 1885 साली पुण्यात झालेल्या एका सभेत रायगडावरील समाधी जीर्णोद्धाराच्या कार्याचे सुतोवाच करण्यात आले. म्हणूनच ब्रिटिश सरकारने वार्षिक 5 रुपये तजवीज करून ठेवली. पुढे ३० मे १८९५ रोजी लोकमान्य टिळकांनी पुण्याच्या हिराबागेत पुन्हा एकदा जंगी सभेचे आयोजन केलं. श्रीमंत श्रीनिवासराव पंतप्रतिनिधींच्या अध्यक्षतेखाली सेनापती दाभाडे, लो. टिळक, बापूसाहेब कुरूंदवाडकर, सरदार पोतनीस, अनेक संस्थानिक, सरदार व पुण्यातील अनेक नामवंत या सभेला उपस्थित होते. शिवस्मारकाच्या जीर्णोध्दारासाठी निधी गोळा करण्याचं आवाहन या सभेला केलं गेलं. त्यासाठी एका मंडळाची स्थापना झाली. तेच हे ‘श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ.’ लोकमान्य टिळक व त्यांच्या सहकार्‍यांच्या उपस्थितीत दि. २४ व २५ एप्रिल १८९६ असे दोन दिवस रायगडावर शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. सुमारे ३० वर्षे संघर्ष केल्यावर लोकमान्य टिळकांच्या हयातीनंतर रायगड स्मारक मंडळाच्या पदाधिकार्‍यांना यश आले व ६ फेब्रुवारी १९२५ला ब्रिटिश सरकारने समाधीच्या जीर्णोद्धाराला मान्यता दिली. पुढील वर्षी सन १९२६ मध्ये आज आपण पाहतो, ती शिवाजी महाराजांची जीर्णोद्धारित समाधीची वास्तू उभी राहिली.

‘श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळा’चे उपक्रम


मंडळाच्यावतीने आयोजित शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रमाला पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, आध्यात्मिक क्षेत्र तसेच सैन्यदलातील अधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून गडावर येऊन गेले आहेत. मंडळाने १९८७ साली महाराष्ट्र शासनाला सादर केलेल्या विकास आराखड्याला महाराष्ट्र शासनाने आणि केंद्रीय पुरातत्त्व खात्याने मंजुरी दिली. त्याप्रमाणे १९९६ साली मंडळाने पुण्यातील ‘प्रसिद्ध जोग इंजिनिअरिंग कंपनी’च्या साहाय्याने ‘रोप-वे’ची उभारणी करण्यात आली, ज्यामुळे वर्षाकाठी रायगडावर येणार्‍या शिवभक्तांची संख्या १५ हजारांवरून पाच लाखांपर्यंत गेली. शिवपुण्यतिथीनिमित्त ‘श्री शिवपुण्यस्मृती रायगड पुरस्कार’, हिंदवी स्वराज्याच्या उभारणीतील शूर सेनापती व सरदारांच्या वंशजांचा सन्मान, सध्याच्या लष्करातील एका निवृत्त मराठी वरिष्ठ लष्करी अधिकार्‍याचा सन्मान असे अनेक उपक्रम राबविले जातात. ‘मराठा रेजिमेंट’च्या घोष वादनाने तसेच रायगड पोलिसांतर्फे बंदुकीच्या २१ फैरी झाडून महाराजांना मानवंदना दिली जाते. मंडळाने पुन्हा २०१२ साली सुधारित किल्ले रायगड विकास आराखडा शासनाला सादर केला. त्यानुसार महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली ‘किल्ले रायगड विकास प्राधिकरण’ स्थापन केले. त्यातील अनेक कामे आता सुरू झाली आहेत, पण अजूनही बरीच कामे शिल्लक आहेत. मंडळाचे वर्षभर सातत्याने उपकम सुरू असतात. त्यामध्ये रायगड गडारोहण स्पर्धा, विविध पुरस्कार, मोडी कागदपत्रे खंड प्रकाशन, शिवचरित्र स्पर्धा, लोहगड महाशिवरात्र कार्यक्रम अशा सुमारे १५ उपक्रमांचा समावेश आहे.


शिवपुण्यतिथीनिमित्त आवाहन


मंडळातर्फे सर्व शिवप्रेमींना आवाहन करण्यात येत आहे की, चैत्र पौर्णिमा, हनुमान जयंती, मंगळवार, दि. २७ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता आपल्या घरीच शिवप्रतिमेचे पूजन करावे. सध्याच्या संकटकाळात रक्तदान, प्लाझ्मादान यांसारख्या उपक्रमांमध्ये आपला सहभाग नोंदवावा. पुढील वर्षी शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रमासाठी रायगडावर येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन त्यांच्या पुण्यस्मृतीस अभिवादन करून स्फूर्ती व प्रेरणा घेण्यासाठी जरूर यावे, अशी मंडळाच्यावतीने आपणास नम्र विनंती.

- अभय जगताप
Powered By Sangraha 9.0