दूरदृष्टी आणि द्वेषदृष्टी

    दिनांक  25-Apr-2021 21:30:22   
|

narendra modi  _1 &n


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेकडे बघितले तर हे लक्षात येईल की, त्यांनी दाढी वाढवलेली आहे, ती शुभ्र आहे, डोक्यावरील सर्व केस पांढरे झालेले आहेत, चेहर्‍यावर देशाच्या काळजीच्या रेषा दिसतात, दृष्टीत निर्धार दिसतो, मिटलेले ओठ, शब्द जपून वापरण्याची आठवण करून देतात. ही प्रतिमा एका राजऋषीची आहे. त्यांच्या डोळ्यापुढे फक्त भारतच आहे, भारताची १३० कोटी जनता आहे, या जनतेच्या आरोग्याचा प्रश्न आहे.


कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने देशात हाहाकार माजविला आहे. ‘ऑक्सिजन’ची कमतरता, हॉस्पिटलमध्ये बेड्सची, डॉक्टर-नर्सेसची कमतरता, लसींच्या कुप्यांची कमतरता, देशभर जाणवू लागलेली आहे. रोज त्याच्या बातम्या येत असतात. ‘ऑक्सिजन’च्या अभावाने रुग्ण दगावल्याच्या बातम्या या ठळक बातम्यांचा विषय होतात. या परिस्थितीच्या भीषणतेत रुग्णालये आणि ‘कोविड सेंटर’ला आगी लागण्याच्या घटना घडतात, त्यात अनेक रुग्ण दगावतात. नागरिकांच्या मनात भयंकर भीती निर्माण करणारे वातावरण निर्माण झालेले आहे.यात रोज राजकारणी लोक आपल्या वक्तव्यांनी भर घालीत आहेत. ऑक्सिजनचा पुरवठा कमी आहे, शिव्या द्या केंद्र सरकारला. ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शनचा पुरवठा कमी पडतो, घाला शिव्या केंद्र सरकारला. हॉस्पिटलध्ये बेड्स कमी आहेत, केंद्र सरकारला वेठीस धरा. मजुरांची मजुरी बुडत चालली आहे, केंद्र सरकार त्यांना पैसा देत नाही, द्या शिव्या केंद्र सरकारला. नरेंद्र मोदी यांच्या विरोधामध्ये सर्व विरोधी दलांचा हा एककलमी ‘शिवी कार्यक्रम’ चालू आहे. बंगालच्या ममतादीदी म्हणतात की, “मी एका पायाने बंगाल जिंकेन आणि दोन पायाने दिल्ली जिंकेन, मोदींना घालवून लावेन.” ममतादीदींच्या एका पायाचे दुखणे बंगालच्या निवडणूक प्रचाराचे प्रतीक झाले आहे. त्यांचे निवडणूक सल्लागार प्रशांत किशोर यांच्या सुपीक मेंदूतून ही कल्पना निघाली असावी. निवडणुका संपल्या की ममतादीदी दोन पायांवर चालू लागतील, अशी आपण आशा करूया.

काँग्रेसच्या जनरल सेक्रेटरी प्रियांका गांधी-वाड्रा म्हणतात की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या रोगराईत नेतृत्व करण्यास अनुत्तीर्ण झालेले आहेत. त्यांच्या सरकारने अत्यंत चुकीचे व्यवस्थापन केलेले आहे. योजनेचा अभाव आणि पहिल्या व दुसर्‍या लाटेकडे दुर्लक्ष, यातून प्रशासकीय अकार्यक्षमता प्रकट होत आहे. सुरक्षेची जाणीव आणि या प्रचंड मानवी संकटामध्ये नेतृत्व करण्यास आणि दिशा देण्यास मोदी अयशस्वी झालेले आहेत. हॉस्पिटलमध्ये बेड नाहीत, औषधे नाहीत, स्मशानगृहे भरुन गेली आहेत, अशा वेळी नेतृत्व कुठे गेले?” प्रियांका गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याची मागणी प्रत्यक्ष केली नसली तरी त्यांना हेच म्हणायचे आहे की, मोदींनी राजीनामा द्यायला पाहिजे. त्यांचे बंधू राहुल गांधी म्हणतात की, “कोरोनाची रोगराई हे काही भारतापुढील एकमेव संकट नव्हे, केंद्र सरकारची लोकविरोधी धोरणे ही खरी समस्या आहे.” ते पुढे म्हणतात की, “नरेंद्र मोदी यांचा समज असा दिसतो की, मी भाषणे करतो आणि देशाने ‘कोविड’ परिस्थिती हाताळावी. देशाला उपाय पाहिजे आहेत, उत्सव आणि पोकळ बातम्या नकोत.”यात सुरात सूर मिसळून तामिळनाडूच्या राजकीय पक्षातील नेते (या राजकीय पक्षाचे नाव आहे, व्हीसीके) थिरुमावलवन, यांनी पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे. “नरेंद्र मोदी यांनी ‘कोविड’ साथीची जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे. सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न त्यांना योग्य रितीने हाताळता आला नाही. लोकांच्या जीवनाशी ते खेळत आहेत. त्यांना ही परिस्थिती कशी हाताळायची, याची दूरदृष्टी नाही. ते जर अधिक काळ पंतप्रधान राहिले तर नागरिकांचे जीवन आणखीनच धोक्यात येईल.”महाराष्ट्राच्या आपल्या लाडक्या मुख्यमंत्र्यांनी अजूनपर्यंतदेखील मोदी यांच्या राजीनाम्याची मागणी केली नाही. परंतु, ते आणि त्यांचे सहकारी नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर जवळजवळ रोजच तोफ डागत असतात. अशा सर्व राजकीय नेत्यांना एक नागरिक म्हणून आपण सर्वजण एक प्रश्न विचारू शकतो, “तुमच्या म्हणण्याप्रमाणे कोरोना महामारी रोखण्यास मोदी सरकार अयशस्वी झाले आहे, हे घटकाभर मान्य करू, प्रश्न असा आहे की, तुम्ही काय करता? कोरोना महामारीपासून सोडविण्यासाठी आतापर्यंत तुम्ही काय केले आहे? राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी किती कोटी रुपये घालवून ठिकठिकाणी ‘कोविड सेंटर’ उभी केली आहेत? त्यांच्या पक्षाचे किती कार्यकर्ते ‘कोरोना योद्धा’ बनून लोकसेवेसाठी उतरले आहेत? आरोप करायला काही जात नाही आणि पोकळ भाषणे करायला तर काहीच जात नाही.”

कोरोना महामारीचे संकट अभूतपूर्व आहे. स्वातंत्र्यानंतर एवढ्या भीषण प्रमाणात संसर्गजन्य रोगराई देशात निर्माण झाली नाही, ती अनपेक्षितपणे आली. तिच्या भीषणतेचा अंदाज कुणालाही करणे शक्य नव्हते. पाश्चात्य देश हे आपल्यापेक्षा विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात १०० पावले पुढे आहेत. परंतु, त्यांनाही या भीषण रोगराईचा अचूक अंदाज आला नाही, तेदेखील हतबल झाले. या देशात स्वयंशिस्त पाळण्याची सवय असल्यामुळे कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी ज्या उपाययोजना सरकारने सुचविल्या त्याचे नागरिकांनी शिस्तबद्ध पालन केले. आपल्याकडे सर्वच गोंधळ आहे. बेशिस्तीचा कहर असतो. गर्दी टाळा, असे कितीही सांगितले तरी ते लोकांच्या डोक्यावरुन जाते आणि ते बाजारपेठा, धार्मिक सण-उत्सवात, लग्न समारंभात, मन मानेल तसा व्यवहार करतात. लोकांना ही स्वयंशिस्त लावण्यासाठी गांधी घराण्याने ७० वर्षात काय केले? जे राजकीय नेते नाक वर करुन बोलतात, त्यांनाही विचारले पाहिजे की, जनतेला स्वयंशिस्त लावण्यासाठी तुम्ही काय करता?, यापूर्वी काय केले? आपली तिजोरी भरण्याचे काम मात्र सर्व लोक करतात. जनतेच्या गुणांची तिजोरी भरण्याचे काम कुणी करायचे?

आपले भाग्य थोर म्हणून या आणीबाणीच्या काळात नरेंद्र मोदींसारखा कणखर पंतप्रधान आपल्याला लाभला आहे. कोरोनाची भारतात लागण होण्यापूर्वीच, हा विषाणू भारतात येणार, याची त्यांना जाणीव झाली. म्हणून डिसेंबर २०१९पासूनच त्यांनी खबरदारीच्या उपाययोजना सुरु केल्या. विदेशी प्रवाशांची तपासणी सुरू केली. आपल्याला या महामारीशी झगडण्यासाठी आरोग्य सेवा लागतील, मे २०२०मध्ये ७०० हॉस्पिटल्स उभारली. दोन लाख विलगीकरण बेड्सची व्यवस्था करण्यात आली. ‘पीपीई किट’ (डॉक्टरांना घालण्यासाठी सुरक्षेचे आवरण) त्याचे उत्पादन भारतात होत नव्हते, प्रारंभी आयात करण्यात आले. २०२०मध्ये ३९ कारखान्यात त्याचे उत्पादन सुरु झाले आणि तोपर्यंत २२ लाख ‘पीपीई किट’चे वाटप झाले. याच काळात ६० लाख मास्कचे वितरण झाले. देशात ‘कोविड टेस्ट’ करणार्‍या ३०० लॅब मे २०२०मध्ये उभ्या राहिल्या. त्या काळात देशात ८४०० ‘व्हेंटिलेटर’ होते. मे २०२०मध्ये त्यांची संख्या २० हजार झाली. हे सर्व काम मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे शक्य झाले. त्यांच्या जागी गांधी घराण्याचा पंतप्रधान असता तर काय झाले असते, प्रत्येकाने आपल्या कल्पनेप्रमाणे त्याचे उत्तर शोधावे. ही आकडेवारी गेल्या वर्षीची आहे. या आकडेवारीत आता कैक पटीने भर पडलेली आहे.
आताचा प्रश्न ‘रेमडेसिवीर’ याचा आहे. एप्रिल २०२१ला त्याचे देशात उत्पादन ७४.१०लाख एवढे झाले आहे. जानेवारी-फेब्रुवारीत त्याचे उत्पादन २७ लाख एवढे होते. राज्याच्या गरजेप्रमाणे त्याचा पुरवठा केला जातो. उत्पादन अधिक वाढविण्याचे आदेश मोदींनी दिलेले आहेत. ‘मेडिकल ऑक्सिजन’संबंधी मोदी यांनी ‘ऑक्सिजन’ उत्पादन वाढविण्यावर भर दिला आहे. ३२ राज्यांत आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ‘ऑक्सिजन’ प्लांट उभे करण्यात आले आहेत. पंतप्रधान निधीतून ते उभे करण्यात आले आहेत. त्यातून एक लाख सिलिंडरचे उत्पादन झाले आहे. ज्या राज्यांना ‘ऑक्सिजन’ची अधिक गरज आहे, त्यांच्या गरजेचा अभ्यास चालू आहे आणि त्याची पूर्तता करण्याचे प्रयत्नही चालू आहेत.
खास ‘ऑक्सिजन एक्सप्रेस’ सुरू करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशसाठी त्या रवाना झालेल्या आहेत. लोकांना मार्गदर्शन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कळकळीचे सांगणे असे आहे की,‘तपासणी करा, योग्य उपचार करा आणि लस टोचून घ्या.’ १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्याची योजना त्यांनी आखलेली आहे.या काळातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेकडे बघितले तर हे लक्षात येईल की, त्यांनी दाढी वाढवलेली आहे, ती शुभ्र आहे, डोक्यावरील सर्व केस पांढरे झालेले आहेत, चेहर्‍यावर देशाच्या काळजीच्या रेषा दिसतात, दृष्टीत निर्धार दिसतो, मिटलेले ओठ, शब्द जपून वापरण्याची आठवण करून देतात. ही प्रतिमा एका राजऋषीची आहे. त्यांच्या डोळ्यापुढे फक्त भारतच आहे, भारताची १३० कोटी जनता आहे, या जनतेच्या आरोग्याचा प्रश्न आहे, पोटापाण्याच्या प्रश्न आहे, पांढरे झालेले केस हे सांगतात की, ते केवळ वयाने पांढरे झालेले नाहीत, तर देश तपस्येने पांढरे झालेले आहेत. ही वेळ त्यांच्या मागे उभे राहण्याची नसून ते जे काही सांगतात ते ऐकण्याची आणि व्यवहारात आणण्याची आहे. माझ्या कॉलनीत बागकाम करणारा माळी आहे. काल त्याच्याशी बोलत असताना कोरोनाचे संकट, लसीकरण, महाराष्ट्र शासन असे विषय आले. हे विषय मी काढले नाहीत, तोच बोलू लागला. बोलता बोलता तो म्हणाला, “आपल्या देशाचे भाग्य मोठे, म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्याला लाभले.” हा माळी भाजपचा कार्यकर्ता नाही. त्याचे बोलणे मनापासूनचे होते आणि मला असे वाटते की, हीच भावना सर्वसामान्य माणसाची आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.