कोन सावळे रस्त्याच्या काँक्रटीकरणासाठी १४ कोटी ६५ लाख रुपयांचा निधी

24 Apr 2021 20:00:21

Mahesh 1 _1  H


आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नांना यश;
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून निधी मंजूर

पनवेल : कोन-सावळे रस्त्याच्या काँक्रीटीकरण कामासाठी आमदार महेश बालदी यांनी केलेल्या मागणी व सातत्यपूर्ण पाठपुराव्यानुसार केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या विकासकामासाठी १४ कोटी ६५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
 
गेल्या अनेक वर्षांपासून पनवेल तालुक्यातील मात्र उरण विधानसभा मतदार संघात येणारा कोन-सावळे रस्ता अत्यंत खराब झाला आणि रस्त्याच्या दुरावस्थेमुळे वाहनचालक व प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याकडे सातत्याने दुर्लक्ष होताना निदर्शनास आले. त्यामुळे आमदार झाल्यांनतर महेश बालदी यांनी सर्वप्रथम या रस्त्याकडे विशेष लक्ष दिले. राज्य सरकार याकडे लक्ष देणार नाही, हे त्यांना माहित होते त्यामुळे त्यांनी थेट केंद्राकडे मागणी केली.
 
कोन सावळे रस्त्यांच्या आजूबाजूला कंटेनर यार्डची संख्या वाढल्यामुळे अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते. त्यामुळे कोन सावळे रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे गरजेचे असून सदरच्या कामासाठी केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत प्रस्तावित करून मंजुरी मिळावी, अशी मागणी आमदार महेश बालदी यांनी करत त्याकडे शासनाचे लक्ष वेधले होते. त्यानुसार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या रस्त्याच्या विकासासाठी १४ कोटी ६५ लाख रुपयांचा निधी राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केला असून या कामाची लवकरच निविदा जाहीर होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
 
कोन- सावळा रस्त्याच्या कामासाठी आमदार महेश बालदी यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या रस्त्याच्या विकासासाठी निधी देऊन प्रवासी व वाहनचालकांना मोठा दिलासा दिला. यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि आमदार महेश बालदी यांचे आभार मानतो. - डॉ. अविनाश गाताडे
Powered By Sangraha 9.0