‘दिग्दर्शना’चं अभ्यासू विद्यापीठ.....

    दिनांक  24-Apr-2021 23:27:12
|

Sumitra Bhave_1 &nbs
 
 
 
साहित्य, आशय, शब्द, चित्र, कला, मूल्यं आणि माणूसपण या सर्व गोष्टींचा एकसंध विचार करून त्याला चित्रपटाचं रूप देणार्‍या बहुआयामी चित्रकर्मी म्हणजेच सुमित्रा भावे....
 
 
 
चित्रपटांच्या माध्यमातून सिनेसृष्टीत आपला वेगळा ठसा उमटवणार्‍या सुप्रसिद्ध दिग्दर्शिका, निर्मात्या आणि पटकथालेखक हीच त्यांची खरी ओळख. मूळ पिंड समाजसेवेचा असल्याने समाजसेवा करताना आलेले अनुभव, प्रसंग, त्यांच्या सर्जनशील मनाने सूक्ष्मपणे टिपले. त्याच्या अभिव्यक्तीसाठी चित्रपटासारखे प्रभावशाली माध्यम त्यांनी वापरले. त्यावेळी वाणिज्य शाखेत शिकणारा आणि नाट्य उपक्रमामध्ये रमलेला विद्यार्थी सुनील सुकथनकर त्यांना सहकारी लाभला. त्यांचा ‘बाई’ हा पहिला लघुपट राष्ट्रपती पदक विजेता ठरला. मग या दोन दिग्दर्शक द्वयीने ‘दोघी’, ‘वास्तुपुरुष’ यासारखे गंभीर विषय हाताळून या चित्रपटाला त्यापलीकडे पोहोचविले. या जोडीने १४ चित्रपट, ५० हून अधिक लघुपट, तीन दूरदर्शन मालिकांची निर्मिती व दिग्दर्शन केले. ‘जिंदगी जिंदाबाद’, ‘१० वी फ’, ‘वास्तुपुरुष’, ‘देवराई’, ‘बाधा’, ‘नितळ’, ‘एक कप च्या’, ‘हा भारत माझा’, ‘संहिता’, ‘अस्तु’, ‘दोघी’, ‘कासव’ असे त्यांचे अनेक चित्रपट त्यांनी दिले. या चित्रपट व लघुपटांना तीन आंतरराष्ट्रीय, दहा राष्ट्रीय, ४० हून अधिक राज्य पुरस्कार, तसेच अन्य पुरस्कार मिळाले आहेत. देश-विदेशातील अनेक महोत्सवांत या चित्रपटांचे प्रदर्शनही झाले आहे. या दिग्दर्शक द्वयीला ‘दोघी’, ‘वास्तुपुरुष’, ‘अस्तु’, ‘देवराई’, ‘बाई’, ‘पाणी’, ‘कासव’ या चित्रपट व लघुपटांसाठी सात वेळा राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलेले आहे. या जोडीतील एक म्हणजे ज्यांनी साहित्य, आशय, शब्द, चित्र, कला, मूल्यं आणि माणूसपण या सर्व गोष्टींचा एकसंध विचार करून त्याला चित्रपटाचं रूप दिलं, अशा बहुआयामी चित्रकर्मी म्हणजेच सुमित्रा भावे....
 
 
सुमित्रा भावे यांचा जन्म पुणे येथे १२ जानेवारी, १९४३ला झाला. त्यांनी आगरकर हायस्कूलमधून माध्यमिक शिक्षण, तर फर्ग्युसन महाविद्यालयातून कला शाखेची पदवी घेतल्यानंतर मुंबईच्या टाटा समाजविज्ञान संस्थेतून समाजकार्याचे पदव्युत्तर शिक्षण घेतले. कविता लेखन, रांगोळी, चित्रकला असे छंद जोपासत त्यांनी विद्यार्थीदशेत गुरू रोहिणी भाटे यांच्याकडे नृत्याचे शिक्षण घेतले. राष्ट्र सेवा दलाच्या कला विभागात नृत्यामध्ये यांचा सहभाग होता. सुरुवातीच्या काळात त्यांनी दिल्ली आकाशवाणीवरून मराठी वृत्तनिवेदनही केले. त्यांनी ‘टाटा इन्स्टिट्यूट’मध्ये काही काळ काम केले. पुणे येथील ‘कर्वे समाजसेवा संस्थे’मध्ये समाजकार्याचे अध्यापन केले. अनेक सामाजिक संशोधने आणि शोधनिबंध, उरुळीकांचन येथे सर्वोदय अध्ययन केंद्र हा शिक्षण प्रयोग, मुंबईच्या ‘कास्प-प्लान’ या झोपडपट्टी वस्त्यांमधील मुले व कुटुंबे यांच्या विकास योजना प्रकल्पाच्या प्रमुखपदाचा कार्यभार या अनुभवानंतर त्यांनी पुण्याच्या ‘स्त्री-वाणी’ या संस्थेच्या संचालकपदावरही काम केले. या दरम्यान दलित, अशिक्षित स्त्री यांच्या स्वप्रतिमेच्या अभ्यासाचे निकष त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याच्या भावनेतून त्या १९८५ पासून चित्रपट माध्यमाकडे वळल्या.
 
 
सुमित्रा भावे या मराठी चित्रपट दिग्दर्शिका, निर्मात्या आणि पटकथालेखक. त्यांना बरेच आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाले आहेत. त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजातून पदवी घेतल्यावर पुणे विद्यापीठातून ‘राज्यशास्त्र’ आणि ‘समाजशास्त्र’ या दोन विषयात एम.ए. केले. शिक्षण पूर्ण झाल्यावर भावे यांनी बर्‍याच समाजसेवी संस्थांमध्ये विनामोबदला काम केले होते. कथा, पटकथा, संवाद, वेशभूषा, दिग्दर्शन आणि निर्मिती अशा अनेक भूमिका त्या अतिशय सहजपणाने करत राहिल्या. एकीकडे समाजशास्त्राचा अभ्यास, समाजातल्या सर्व घटकांविषयी कळकळ, चांगुलपणावर विश्वास आणि समूहभावनेने काम करण्याची सवय, यांमुळे त्यांचे चित्रपट आणि कामाचे स्वरूपही वेगळे ठरले. माहितीचा अधिकार, स्किझोफ्रेनिया, पांढरे डाग, तरुण वयातील नैराश्य, माणसाची घराविषयीची आस, अशा कित्येक विषयांची मांडणी करताना त्या सतत ‘माणूस’ शोधत राहिल्या आणि ‘स्टोरिटेलिंग’ची विलक्षण हातोटी असल्याने त्यांच्या चित्रपटांनी सर्वच पातळ्यांवर उंची गाठली. ‘दिठी’, ‘दहावी फ’, ‘अस्तु’, ‘एक कप च्या’, ‘कासव’, ‘घो मला असला हवा’, ‘जिंदगी जिंदाबाद’ (हिंदी), ‘देवराई’, ‘दोघी’, ‘नितळ’, ‘फिर जिंदगी’ (हिंदी लघुपट), ‘बाधा’, ‘बेवक्त बारिश’ (हिंदी लघुपट). ‘मोर देखने जंगल में’ (हिंदी माहितीवजा कथापट), ‘वास्तुपुरुष’, ‘संहिता’, ‘हा भारत माझा’ या काही निवडक चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले. कर्नाटकातील ‘शाश्वती’ या राष्ट्रीय संस्थेतर्फे दरवर्षी एका भाषेतील अभिजात साहित्य निर्मितीसाठी दिला जाणारा ‘कामधेनू पुरस्कार’ सुमित्रा भावेंना मराठी भाषेसाठी त्यांच्या संहितालेखनातील साहित्यिक मूल्यांसाठी २०१३ मध्ये देण्यात आला. त्यांना केरळमधील ‘अरविंदन स्मृती पुरस्कार’, ‘सह्याद्री चित्ररत्न पुरस्कार’, ‘साहिर लुधियानवी-बलराज सहानी प्रतिष्ठान’च्या ‘के. ए. अब्बास स्मृती पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले होते.
 
 
सुमित्रा भावे यांनी दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांच्या सोबतीने अनेक उत्तमोत्तम मराठी चित्रपटांची निर्मिती केली. ‘बाई’ आणि ‘पाणी’ या सुरुवातीच्या लघुपटांना लोकप्रियता मिळाल्यानंतर त्यांनी १९९५ मध्ये ‘दोघी’ हा पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट तयार केला. त्यानंतर त्यांनी दिग्दर्शित केलेले ‘दहावी फ’, ‘वास्तुपुरुष’, ‘देवराई’, ‘बाधा’, ‘नितळ’, ‘एक कप च्या’, ‘घो मला असला हवा’, ‘कासव’, ‘अस्तु’ हे चित्रपट गाजले. त्यांचे चित्रपट आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत नावाजले गेले, तर अनेक चित्रपटांना राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले. ‘दिठी’ हा त्यांनी स्वतंत्ररीत्या दिग्दर्शित केलेला चित्रपट दोन वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. सोनाली कुलकर्णी, उमेश कुलकर्णी, सचिन कुंडलकर यांच्यासह अनेक कलाकारांना सुमित्रा भावे यांच्याकडे चित्रपटाचे धडे गिरवता आले. अंगभूत हुशारी, साहित्याची जाण आणि प्रचंड कष्टाच्या तयारीमुळे सुमित्राताईंचे सर्वच चित्रपट वैश्विक ठरले. महाराष्ट्रात प्रदर्शित होण्याआधीच ते विदेशी चित्रपट महोत्सवात पोहोचून गाजू लागले. सुमित्राताईंमध्ये चांगला कलाकार दडलेला होता. परंतु, चित्रपट ही कला असली तरी तिला तंत्राची जोड मिळाली, तरच ती प्रेक्षकांचं मन जिंकू शकते. ही बाब खूप आधीच माहिती असल्यामुळे सुमित्राताईंनी आपला चित्रपट तंत्राच्या बाजूनं कमी पडणार नाही, याची काळजी घेतली. तंत्र चांगलं असणं म्हणजे भरपूर पैसा खर्च करणं नव्हे. किंबहुना, ‘पैसा’ हा शब्द त्यांच्या चित्रपटनिर्मिती प्रक्रियेत कधी आलाच नाही. इतरांना निर्माते मिळण्यात अडचणी येत असताना सुमित्राताईंना त्यांच्या मनाप्रमाणे चित्रपट बनवू द्यायचे निर्माते मिळाले. अर्थात, सुमित्राताईंच्या चित्रपटांना चित्रपटगृहात जेवढा प्रेक्षकवर्ग मिळायला हवा होता, तो काही मिळाला नाही. याबाबत आपण प्रेक्षकवर्ग कृतघ्न आहोत. अलीकडच्या काळात तर प्रेक्षकसंख्येअभावी सुमित्राताईंच्या चित्रपटांचे शोज काही मल्टिप्लेक्समधून रद्द होण्याचेही दुर्दैवी प्रकारही घडले. सुमित्राताईंसारख्या श्रेष्ठ दिग्दर्शकाबाबत असा प्रकार घडणं ही लाजीरवाणीच गोष्ट आहे. परंतु, या प्रकारालादेखील सुमित्राताई संयमानं, संयतपणे सामोर्‍या गेल्या. मराठी प्रेक्षकांना याबद्दल फार दोष न देता त्यांनी केरळ, बंगाल आणि कर्नाटकमध्ये आपल्या चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळतो, एवढंच सूचक वक्तव्य त्यांनी केलं.
 
 
 
सुमित्राताई मूळच्या शिक्षिका. परंतु, प्रगल्भतेमुळे आता त्या नवीन कलाकारांसाठी एक चालतं-बोलतं विद्यापीठच बनल्या होत्या. एवढी गुणवत्ता असूनही त्यांनी कधीही स्वतःचा बडेजाव मिरवला नाही. कोणत्याही कारणामुळे त्या वादग्रस्त ठरल्या नाहीत. खरं तर त्यांचीही पात्रता ‘दादासाहेब फाळके’ पुरस्कार मिळण्याइतकी निश्चित आहे. परंतु, असे विषय त्यांच्या दृष्टीनं नगण्य होते. चित्रपट माध्यमाला समाजाचा आरसा म्हणून मानणार्‍यांपैकी त्या होत्या आणि या आरशात त्यांनी आपल्या समाजाचं प्रतिबिंब अगदी तंतोतंत दाखविलं, म्हणूनच सुमित्राताईंचा सिनेमा हा आजचा, आपला नि आश्वासक होता. ‘देवराई’, ‘दोघी’, ‘दहावी फ’ अशा अनेक चित्रपटांच्या माध्यमातून सिनेसृष्टीत आपला वेगळा ठसा उमटवणार्‍या सुप्रसिद्ध दिग्दर्शिका, निर्मात्या आणि पटकथालेखक सुमित्रा भावे यांचं नुकतेच १९ एप्रिल रोजी पुण्यात निधन झालं. त्या ७७ वर्षांच्या होत्या. सुमित्रा भावे यांच्या निधनामुळं एका प्रतिभावंत दिग्दर्शिकेला गमावल्याची भावना सिनेसृष्टीत व्यक्त होत आहे. त्यांच्या आजवरच्या कार्याला मनापासून सलाम.
 
 
- आशिष निनगुरकर
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.