भगवान महावीर वाणी

24 Apr 2021 23:06:54

Bhagwan_1  H x
 
आज भगवान महावीर यांची जयंती. त्यानिमित्ताने महावीरांनी सांगितलेले आचारण, समिती, गुप्ती या तत्वज्ञानाचा नेमक्या शब्दांत अर्थ उलगडणारा हा लेख...
 
 
प्रसिद्ध कवी आणि व्याख्याते डॉ. कुमार विश्वास म्हणतात, “आपण काल्पनिक गोष्टी वाचतो, त्यातून शिकतो तर मग या पृथ्वीवर जे आले होते, ते महात्मा बुद्ध, राम, कृष्ण, २४ तीर्थंकर यांच्याकडूनही शिकता येईल ना. ताण-तणावाचं व्यवस्थापन त्यांच्याकडूनही शिकता येतंच ना... राम, कृष्ण किंवा भगवान महावीर यांची कहाणी वाचायला हवी. त्यात जीवनाचे सूत्र आपल्याला समजेल. जीवन जगण्याची कला त्यात सापडेल.”
 
 
भगवान महावीर पाच महाव्रतांना ‘आचरण’ म्हणतात. जो मनुष्य यांचं पालन करतो तो उद्यमी, संयमी तसेच मानरहित होऊन जातो. तो चारित्र्यवान व शीलयुक्त होतो. सर्व जीवांच्या प्रति मैत्रीभाव म्हणजेच आचरण. भगवान महावीर म्हणतात, “जी व्यक्ती शीलसंपन्न आहे, प्रामाणिक आहे, प्रेमपूर्ण आहे ती देवालासुद्धा प्रिय असते.”
 
 
भगवान महावीर चारित्र्याची व्याख्या करताना म्हणतात की, “इंद्रियांच्या व्यापारास रोखणे, क्रोध, मान, माया, लोभ या कषायांच्या प्रचारास रोखणे आणि समिती, गुप्ती हे सर्व संक्षेप रूपाने चारित्र्य होय.”
 
 
‘समण सुत्त’ या ग्रंथात पं. कैलाशचंद्रजी शास्त्री व मुनी नथमलजी यांनी समिती, गुप्ती यावर विस्तृत चर्चा केली आहे. पाच समिती पुढीलप्रमाणे आहेत. ईर्या समिती, भाषा समिती (वचन समिती), एषणा समिती, आदान-निक्षेपण समिती व उत्सर्ग समिती.
 
 
‘ईर्या’ म्हणजे चर्या. भगवान महावीरांना त्यांचा शिष्य विचारतो, “हे भगवंत, कसे चालावे, कसे उभे राहावे, कसे बसावे, कसे झोपावे, कसे खावे आणि कसे बोलावे म्हणजे पापकर्माचे बंधन पडणार नाही?” भगवान महावीर म्हणतात, “हे आयुष्मन, जतना किंवा विवेकाने चालावे, विवेकाने उभे राहावे, विवेकाने बसावे, विवेकाने झोपावे, विवेकाने खावे आणि विवेकाने बोलावे, म्हणजे पापाचे बंधन पडणार नाही.”
 
 
भाषा समिती अथवा वचन समिती - परायण साधू सत्य, हितकारी, मधुर वचनांचा प्रयोग करतात. कटू वचनांचा प्रयोग धर्मप्रिय व्यक्तीने, साधू-साध्वी, श्रावक-श्राविका, सुव्रती तसेच सद्गृहस्थांनी करू नये. आपल्या धर्मग्रंथात म्हणतात, मधुर स्वर धर्मरूपी कल्पवृक्षाचे फळ आहे. जैन मुनीश्री तरुण सागरजी महाराज म्हणतात, “जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर डोक्यावर ‘आईस फॅक्ट्री’ आणि तोंडात ‘शुगर फॅक्ट्री’ ठेवा.”
 
 
निर्दोष, शुद्ध आहार घेणे यास ‘एषणा समिती’ म्हणतात. मुनींना तळहातावर राहील एवढाच भात दिवसातून एकदा खाऊन राहावयाचे असते. समयानुकूल आहार ग्रहण करणे, प्रमाणात, मर्यादित स्वरूपात भोजन ग्रहण करणे, याला ‘एषणा समिती’ म्हणतात.
 
 
मुनी आपल्या विवेकबुद्धीने, सावधपणे, सद्विचाराने, विवेकपूर्वक आपल्या वस्तूंना डोळ्यांनी पाहून, साफ करून घेतात, ठेवतात. वस्तू उचलताना, ठेवताना, देताना पाहून घेणे आवश्यक आहे. आतमध्ये जीवजंतू असण्याची शक्यता असते. ही समिती म्हणजे ‘आदान-निक्षेपण समिती’ होय.
 
 
मुनींनी एकांतस्थळी, हिरवी वनस्पती, जिथे जीव नाहीत, गावापासून दूर, जिथे कोणी पाहणारा नसावा, जागा विस्तीर्ण व विशाल असेल, विरोध करणारा कोणीही नसेल, अशा ठिकाणी मलमूत्राचे विसर्जन करावे. ही मुनींची ‘उत्सर्ग समिती’ होय.
 
 
तीन गुप्तींपैकी प्रथम आहे ‘मनोगुप्ती.’ अशुभ व्यवहार व अशुभ कर्मांपासून मनास अलिप्त ठेवणे व शुभ व्यवहारामध्ये मनास प्रवृत्त करणे, यास ‘मनोगुप्ती’ म्हणतात. पाप-क्रियांचा नुसता विचार करणेसुद्धा मनोगुप्तीस घातक आहे. जीवनात शुभ विचार व शुभ क्रिया महत्त्वाच्या आहेत. शुभ कर्मांमुळे शुभ फळ व अशुभ कर्मांमुळे अशुभ फळ मिळते. तीर्थंकर, महात्मा, संत व ज्ञानी पुरुष मनास निर्मळ, निष्पाप, निष्कपट ठेवण्यासाठी वारंवार प्रेरणा देतात.
 
 
‘वचनगुप्ती’ या शब्दाचा अर्थ आहे, भाषेचा प्रयोग. मुनीने संयत, मोजके, सत्य, प्रिय व कल्याणकारी भाषेचाच प्रयोग करावा. मुनीने निंदा, स्तुती, उपहास, कटुता इत्यादी भाषादोष टाळावेत. आचार्य प्रवर आनंद ऋषीजी महाराज म्हणतात, “शरीरास पापकर्मातून मुक्त करून शुभ कर्मामध्ये लीन करणे म्हणजे ‘कायागुप्ती.’ निसर्गाने, परमेश्वराने आपणास हात दिले आहेत, ते भांडण करण्यासाठी, मारामारी करण्यासाठी दिले नाहीत, तर ते हात वृद्धांची, अपंगांची, दीन-दुःखी, असहाय व निराधार लोकांची सेवा करण्यासाठी दिले आहेत.”
 
 
भगवान महावीर व नंतरच्या जैनाचार्यांनी अनेक नैतिक कर्तव्ये अत्यंत तेजस्वी, विद्वत्ताप्रचुर पण सोप्या व सरळ भाषेत श्रावकांच्या समोर मांडली. धर्माचार्य म्हणतात की, “आपल्या मनात आचार्य, उपाध्याय, शिष्य, धार्मिक बंधू, परिवारातील सर्व सदस्य, आई-वडील, पुत्र, पुत्रवधू, सासू, सून, पती-पत्नी, स्वजन, नातेवाईक, मित्र, सखा, सोबती, प्रवासी, परिचित-अपरिचित, अस-स्थावर, आपले शेजारी, आपल्या गावातील लोक, आपल्या प्रांतातील, आपल्या देशातील, या संपूर्ण विश्वातील जीवांबद्दल मित्रत्वभाव असावा. पशू-पक्षी तसेच वनस्पतींशीही सौजन्यशील वर्तणूक ठेवावी. या सर्वार्ंशी प्रेम, आदर व मित्रत्वभाव असेल, तरच मोक्षाचा मार्ग निष्कंटक होईल. साधारण, सामान्य गृहस्थदेखील मुनिपदापर्यंत पोहोचेल.
 
 
भगवान महावीर स्वामींचा संदेश देताना जैनासुरीजीचार्य श्री. अभयशेखरसुरीजी महाराज म्हणतात की, “हे मानवा, अन्य सगळ्या पशू-पक्षी व जीवसृष्टीच्या तुलनेत तू अधिक बलवान आहेस. जर तुला भूकंप, अतिवृष्टी, अनावृष्टी, स्वाईन फ्लू, बर्ड फ्लू, कोरोना, अशा प्रकारची शिक्षा नको असेल, तर तुझ्या शक्तीचा वापर जगाच्या संहारासाठी करू नकोस. उलट तुझ्या शक्तीने जीवसृष्टीची रक्षा करून राजा बन. सगळ्या प्रकारची समृद्धी तुझ्या पायाजवळ येईल.”
 
 
सारा विश्व कोरोना के
भय से मुक्त हो
यही प्रभूचरणों में प्रार्थना!
 
संदर्भ ग्रंथ :- १) भावना योग : एक विश्लेषण - आचार्य श्री. आनंद ऋषी
२) आनंद प्रवचन भाग ५ व ६ - आचार्य श्री. आनंद ऋषी
३) भारतीय संस्कृतीला जैन धर्माची देणगी - प्रा. भोमाज
४) महावीर वाणी - डॉ. भगवानदास तिवारी
५) समण सूत्र - सर्व सेवा संघ प्रकाशन, वाराणसी
६) महावीर वाणी के आलोक में हिंदी का संतकाव्य - डॉ. जैन
 
- डॉ. व्ही. एन. रणदिवे
Powered By Sangraha 9.0