मुंबई : गुरुवारी नाशिकमधील ऑक्सिजन गळतीमुळे २२ जणांचे प्राण गेले. ही घटना ताजी असतानाच विरार येथे रुग्णालयाला आग लागल्याने १४ जणांना आपला प्राण गमवावा लागला. यामधील आगीमध्ये कुमार दोशी यांचा मृत्यू झाला. पतीच्या मृत्यूची बातमी समजताच पत्नी चांदनी यांनाही हृदयविकाराचा झटका आला. या घटनेत दोशी दाम्पत्याचा दुर्दैवी अंत झाला. यांच्या मृत्युला जबाबदार कोण? असा प्रश्न आता विरोधकांकडून विचारला जात आहे. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे सामन्यांचा जीव जातो अशी टीका भाजपने केली आहे. त्यात 'हा काही राष्ट्रीय मुद्दा नाही' अशा आरोग्यमंत्र्यांच्या विधानामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.
"आपल्या जवळची व्यक्ती जाण्याचे दुःख ठाकरे सरकार कधीही समजू शकत नाही. कारण जनतेचा जीव या असंवेदनशील सरकारसाठी कवडीमोलाचा झाला आहे. प्रशासनाच्या बेजबाबदारीपणामुळे निष्पापांचा जीव जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आतातरी किमान हा विषय गांभीर्याने घ्यावा!" अशी मागणी भाजपने केली आहे. मध्यरात्री साडेतीन वाजता विरार पश्चिममध्ये असलेल्या विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागात आग लागली. हे कोविड रुग्णालय असून या रुग्णालयात एकूण ३९ रुग्ण उपचार घेत होते. यामधील १३ जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर ८० टक्के भाजल्याने एका रुग्णाचा दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जात असताना आपला प्राण सोडला.