लसीकरणानंतर 'कोरोना'चा धोका कमीच

22 Apr 2021 11:36:49

central health ministry_1



नवी दिल्ली :
कोरोना महारोगराईच्या दुसऱ्या लाटेत लस घेतल्यानंतर देखील नागरिकांना कोरोना संसर्गाचा धोका उद्भवत आहे. पंरतु, लस घेणार्यांमध्ये कोरोना संसर्ग गंभीर होण्याची शक्यता बरीच कमी असते, असा दावा सरकारकडून करण्यात आला आहे. बुधवारी पहिल्यांदा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना लस घेतल्यानंतर कोरोनाबाधित झालेल्यांची आकडेवारी सार्वजनिक केली. आकडेवारीनूसार कोरोनाविरोधातील लस लावण्यानंतर दर १० हजारांपैकी २ ते ४ नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला.



केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिलेल्या माहितीनूसार देशात आतापर्यंत कोव्हॅक्सिनच्या १.१ कोटी डोज पैकी ९३ लाख ५६ हजार ४३६ नागरिकांनी पहिला डोज घेतला. यातील ४ हजार २०८ नागरिक कोरोनाबाधित झाले. तर, १७ लाख ३७ हजार १७८ लोकांनी दुसरा डोज घेतल्यानंतर यातील ६९५ नागरिकांना कोरोनाची लागण झाली. याचप्रकारे कोव्हिशील्ड लसीच्या ११.०६ कोटींपैकी १० कोटी ३ लाख २ हजार ७४५ नागरिकांनी पहिला डोज घेतला. यातील १७ हजार १४५ नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला. तर, १ कोटी ५७ लाख ३२ हजार ७५४ नागरिकांनी दुसरा डोज घेतल्यानंतर यातील ५ हजार १४ नागरिक कोरोनाबाधित झाले.



भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (आयसीएमआर) महासंचालक डॉ.बलराम भार्गव म्हणाले की, देशात लस लावण्यात आल्यानंतर कोरोनाबाधित आढळण्याचे प्रकरणे बरीच कमी आहेत. एका अंदाजानूसार १० हजारांपैकी दोन ते चार नागरिक कोरोनाबाधित होत आहे. ०.०४ टक्के संसर्गग्रस्त कोव्हॅक्सिनचा पहिला डोज घेतल्यानंतर कोरोनाबाधित झाले. तर, ०.०४ टक्के नागरिक दुसरा डोज घेतल्यानंतर कोरोनाबाधित झाले. याचप्रकारे ०.०२ टक्के नागरिक कोव्हिशील्ड चा पहिला तर, ०.०३ टक्के नागरिकांना दुसरा डोज घेतल्यानंतर कोरोनाची लागण झाल्याचे भार्गव म्हणाले. कोरोना विरोधातील लस घेतल्यानंतर कोरोनाची लागण होवू शकते. पंरतु, संबंधित कोरोनारूग्ण गंभीर अवस्थेत पोहचण्याची शक्यता बरीच कमी असल्याचे भार्गव म्हणाले.
Powered By Sangraha 9.0