मुंबई : महाराष्ट्रामध्ये २२ तारखेपासून कडक लॉकडाऊन करण्यात येणार असून मालिका, चित्रपटांच्या चित्रीकरणालादेखील राज्यात स्थगिती दिली आहे. यामुळे अनेक मालिकांचे चित्रीकरण हे जयपूर, गोवा, गुजरात आणि हैद्राबाद सारख्या ठिकाणी होणार आहे. महाराष्ट्रात ब्रेक दि चेन अंतर्गत कठोर नियम जाहीर झाल्यानंतर तातडीने अनेक मराठी मालिकांनी राज्याबाहेर चित्रीकरण करण्याचा निर्णय घेतला.
स्टार प्रवाह, झी मराठी, सोनी मराठी तसेच कलर्स मराठी या वाहिन्यांच्या अनेक मालिकांचे चित्रीकरण हे महाराष्ट्राबाहेर केले जाणार आहे. 'अग्गबाई सुनबाई'चे चित्रीकरण गोव्याला होणार आहे. तर, कलर्स वाहिनीवरील बहुतांश मालिकांचे चित्रीकरण हे गोवा, सिल्वासा तसेच राजकोटमध्ये केले जाणार आहे. यावरून निर्मात्यांनी सांगितले की, "बाहेरगावी चित्रीकरण केल्याने या दिवसांत प्रेक्षकांना नवीन आशय देणे आम्हाला शक्य होते आहे. सध्या संचारबंदीच्या काळात लोकांना घरात थांबवण्याचे काम मालिकांमुळे होऊ शकते. त्यामुळे आम्ही निर्मितीच्या खर्चात वाढ करत बाहेर चित्रीकरणाची तयारी केली आहे. सर्व नियमांचे पालन करुनच आम्ही ही पाउले उचलत आहोत." असे ‘स्टार प्रवाह’ वाहिनीचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे यांनी दिली.