रामकथेचा छोटेखानी ‘एन्सायक्लोपीडिया’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Apr-2021   
Total Views |

Deepali Patvadkar book_1&
 
 
 
आज चैत्र नवमी अर्थात रामनवमी. मर्यादा पुरुषोत्त्म भगवान श्रीरामांची जन्मतिथी. हा रामजन्मोत्सव देशभरात अतीव उत्साहात साजरा केलाजातो. त्यानिमित्ताने लेखिका, इंडोलॉजिस्ट दीपाली पाटवदकर यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘रामकथेच्या दिग्विजयाची कथा सांगणारी रामकथामाला’ या सचित्र पुस्तकाचा थोडक्यात परिचय करुन देणारा हा लेख...
 
 
आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदाम्।
लोकाभिरामं श्रीरामं भूयो-भूयो नमाम्यहम्॥
 
 
अर्थात, मी या संसारातील सर्वाधिक प्रिय आणि सुंदर, त्या भगवान श्रीरामाला वंदन करतो, जे सगळ्या आपदांना दूर करतात आणि सुख-समृद्धी प्रदान करतात. तेव्हा, भगवान श्रीराम कोरोनारुपी महामारीच्या या जीवघेण्या संकटापासूनही जगाचे रक्षण करो, अशी सर्वप्रथम मनोभावे प्रार्थना करुया. प्रार्थना ही देवाला केली जाते. भगवान रामालाही हे देवत्व प्राप्त झाले. अयोध्येचा राजा श्रीराम हा विष्णूचाच सातवा अवतार. प्रत्येक अवतारामागे भगवान विष्णूचा काही तरी दैवी उद्देश होताच. श्रीराम रुपी अवतारातूनही भगवान विष्णूंनी मर्यादापुरुषोत्तम कसा असावा, याचाच एक मूर्तिमंत आदर्श प्रस्थापित केला. भगवान रामाचे हे कर्तृत्व, दार्तृत्व आणि देवत्व रामायणाच्या माध्यमातून आजही तितकेच स्फूर्तिदायी आहे. केवळ भारताच्या कानाकोपर्‍यातच नाही, तर जगभरात रामायण विविध भाषा, स्वरुपांत आजही तितकेच प्रसिद्ध आहे. यावरून रामायणाची महती आपल्या लक्षात यावी. खरंतर रामायणाची ही व्यापकता आपण ऐकून, वाचून असतो. त्याविषयी साधकबाधक माहितीही आपल्याकडे असते. अगदी वाल्मिकी रामायणापासून ते गदिमांच्या गीतरामायणापर्यंत सर्व कलाव्याप्त रामकथेची ही महती एकाच छताखाली उपलब्ध झाली तर.... नेमका, हाच विचार करून लेखिका दीपाली पाटवदकर आणि विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभाग, पुणे यांनी २४ रामकथाकुसुमांची रामकथामालेची गौरवशाली परंपरा या सचित्र पुस्तकाच्या माध्यमातून रामभक्तांच्या भेटीला आणली आहे.
 
 
खरंतर दीपालीताई दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या वाचकांसाठी अजिबात अनोळखी नाहीत. दोन वर्षांपूर्वी गुढीपाडवा ते रामनवमी असे नऊ दिवसांचे रामायणावर त्यांचे नऊ लेख दै. ‘मुंबई तरुण भारत’मध्ये प्रसिद्ध झाले होते. त्याचबरोबर गणेशोत्सव, नवरात्री असो वा होळी, दीपालीताईंचे वैविध्यपूर्ण सचित्र लेख नेहमीच वाचकांच्या पसंतीस पडतात, हे वेगळे सांगायला नकोच. अशा या दीपालीताई इंडोलॉजिस्ट असल्या तरी त्यांनी जवळपास २० वर्षे आयटी क्षेत्रात नोकरी केली. त्यांचे शिक्षणही याच क्षेत्रातले. पण, नोकरी-पैशांच्या पलीकडे जात दीपालीताईंनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून इंडॉलॉजी (भारतविद्या) या भारतीय विद्याशाखेचा अभ्यास केला. पुढे भारतीय संस्कृतीचा अभ्यास करता करता रामायणाचं जागतिक आकर्षण हाच त्यांच्या अभ्यायाचा विषय आकार घेऊ लागला. त्यातूनच याविषयी दै. ‘मुंबई तरुण भारत’मध्ये स्तंभलेखन आणि रामकथामाला रुपाने आज त्याचे पुस्तकात झालेले हे सुंदर रुपांतर खरंच आमच्यासाठीही तितकेच अभिमानास्पद आहे. या पुस्तकापूर्वी ‘आर्यभट्ट’, ‘नक्षत्रांची फुले’, ‘घर अंगण’, ‘चित्र ज्ञानेश्वरी’ ही दीपालीताईंची साहित्यसंपदा आणि हो, लेखिका, स्तंभलेखिका म्हणून सुपरिचित दीपालीताई या चित्रकारही आहेत, हेही इथे विशेषत्वाने नमूद करावे लागेल. लेखनाबरोबरच त्यांचे रंगचित्र कौशल्य रामकथामालेच्या या पुस्तकासाठी त्यांनी निवड केलेल्या आकर्षक छायाचित्रांतूनही अधोरेखित होतेच.
 
 
रामायण हे भारतीय संस्कृतीतील एक अविभाज्य अंग. अगदी पुरातन काळापासून ते राम मंदिरासाठीच्या यशस्वी लढ्यापर्यंत राम हे या हिंदुस्थानाचे सर्वोच्च आराध्य दैवत. नोव्हेंबर २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने अखेरीस ५०० वर्षांहून अधिक काळ चाललेल्या राममंदिराच्या लढ्याला न्याय दिला आणि श्रीराम मंदिराचा मार्ग प्रशस्त झाला. २०२३ पूर्वी अयोध्येत भव्यदिव्य राममंदिरही साकारेल आणि शेकडो वर्षांची रामभक्तांची प्रतीक्षाही पूर्णत्वास येईलच. त्यामुळे दीपालीताईंचे या पार्श्वभूमीवर प्रकाशित झालेले हे पुस्तक तितकेच औचित्यपूर्ण ठरते. रामकथेला राष्ट्र, भाषा, धर्म याचे कोणतेच बंधन नाही. कारण, आज भारतात काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत, ते अफगाणिस्तानपासून इंडोनेशियापर्यंत रामकथेचे अस्तित्व जाणवते. खासकरून म्यानमार, थायलंड, मलेशिया, कंबोडिया आदी देशांमध्ये स्थानिक भाषांमध्ये रामकथा विविध नावाने, थोड्या फार फरकाने लिहिली गेली. म्यानमारमध्ये रामाचा ‘याम’ झाला, तर रामायण हे ‘यामायन’ झाले. थायलंडमध्ये तर राज्याच्या राजाला आजही ‘राम’ हेच नाव दिले जाते. तिथल्या रामायणाचं नाव आहे ‘रामाकेन.’ तसेच आजही आपल्याकडील रामलीलेप्रमाणे विविध कलाप्रकारांच्या माध्यमांतून रामायणाचे रंगारंग सादरीकरणही या देशांमध्ये तितक्याच उत्साहाने केले जाते. इंडोनेशियासारखा देश मुस्लीमबहुल असला तरी रामकथेला अगदी आपलेसे मानणारा. यावरुन रामनामाची जागतिक महती लेखिकेने विदेशातील रामायण, परदेशातील रामचित्रकथा या प्रकरणांतून मांडली आहे.
 
 
अशा या प्रदीर्घकाळ रामभक्तांच्या मनावर गारुड करणार्‍या रामकथांचा आढावा केवळ साहित्यापुरता नक्कीच मर्यादित नाही. वाल्मिकींपासून ते एकनाथांच्या भावार्थ रामायणापर्यंत ते जैन, बौद्ध, शीख परंपरेतील रामायणाची परंपराही लेखिकेने उलगडली आहेच. पण, त्याचसोबत चित्रातील, शिल्पातील, नृत्य-नाट्यातील, लोककलेतील अशा विविध कलांमधून आकार घेतलेल्या रामकथांनाही लेखिकेने आपल्या लेखनातून उचित न्याय दिला आहे. रामकथा आजच्या माहिती-तंत्रज्ञानाच्या युगातही किती लोकप्रिय आणि कालसुसंगत आहे, याचा सोदाहरण परिचय करुन द्यायलाही लेखिका विसरत नाही, हे तितकेच महत्त्वाचे. दीपालीताईंच्या सरळ, सुबक लेखनशैलीचा परिचय पुस्तक वाचताना प्रकर्षाने जाणवतो. क्लिष्ट भाषा, अवघड शब्दरचना यांचा वापर कटाक्षाने टाळल्याने पुस्तक अधिकच वाचनीय ठरते. तसेच हे पुस्तक फक्त मध्यमवयीन किंवा ज्येष्ठांसाठी न राहता, अगदी शालेय विद्यार्थीही ते आवर्जून वाचू शकतील, रामायण, रामकथामालेचे महत्त्व समजू शकतील, अशी या पुस्तकाची सर्वसमावेशक रचना.
 
 
या पुस्तकाचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे, पारंपरिक आकाराऐवजी आडव्या पोथीच्या आकारात केलेली पुस्तकाची मांडणी. सर्व पृष्ठे रंगीत असून ती समर्पक चित्रांमुळे अधिकच खुलून दिसतात. तसेच पुस्तकाच्या छपाईसाठी वापरलेल्या गुळगुळीत कागदाच्या वापरामुळे पुस्तकाच्या वाचनसौंदर्यात अधिकच भर पडली आहे. तेव्हा, एकूणच रामकथामालेचा छोटेखानी ‘एन्सायक्लोपीडिया’ असलेले हे माहितीपूर्ण पुस्तक संग्रही ठेवावे, आप्तेष्टांना भेट द्यावे असेच म्हणावे लागेल.
 
 

पुस्तकाचे नाव : रामकथेच्या दिग्विजयाची कथा सांगणारी रामकथामाला
लेखिका : दीपाली पाटवदकर
प्रकाशन : विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभाग, पुणे
पृष्ठसंख्या : ११२
मूल्य : २०० रु
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@