चीन मांगे मोअर...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Apr-2021   
Total Views |

China_1  H x W:
 
चीनला कुटुंबकल्याणाची काळजी आहे म्हणून हे सारे चिंताजनक वाटते असे अजिबात नाही, तर भारत, अमेरिकेला टक्कर देण्यासाठी गाठीशी उत्पादनक्षम, मागणी वाढवणारी, बाजार खेळते ठेवणारी लोकसंख्या हवी, म्हणूनच चीन ‘मांगे मोअर.’
 
 
कुठल्याही देशातील एकूण लोकसंख्येचे प्रमाण हे त्या त्या देशातील सर्व प्रमुख घटकांवर बरा-वाईट परिणाम करत असते. म्हणजे लोकसंख्येचा विस्फोट झाला की, साहजिकच आरोग्य सेवा-सुविधांवरील, सार्वजनिक वाहतुकीवरील ताण वाढतो, रोजगाराच्या समस्या निर्माण होतात आणि एकूणच देशातील नागरिकांचे राहणीमान खालावते. तसेच देशातील लोकसंख्याच मुळी कमी असेल आणि खासकरून उत्पादनक्षम वर्ग कमी असेल, तर मनुष्यबळाची देश-विदेशातून आयात करायची वेळ येते. लोकांनी विवाहबद्ध व्हावे, त्यांनी मुलांना जन्म द्यावा, यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले जाते. म्हणजे एकूणच काय तर लोकसंख्येचे संतुलन हा देशाच्या सार्वत्रिक हिताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा विषय. त्यातच ‘कोविड-१९’ महामारीमुळे जगभरातील आरोग्य व्यवस्थांच्या उडालेल्या बोजवार्‍यामुळे सर्वच देशांना लोकसंख्येचा विषय अधिक गांभीर्याने घेण्याची वेळ आली आहेच. अशा या लोकसंख्येच्या बाबतीत क्रमांक एकचा देश राहिलेल्या चीनला मात्र दुसरीच भीती भेडसावत आहे. आधी लोकसंख्येचा विस्फोट होऊ नये आणि देशासमोरील आर्थिक समस्यांमध्ये भर पडू नये म्हणून चीनने ‘एक अपत्य धोरणा’चा स्वीकार केला. परंतु, याचे एकूणच लोकसंख्येच्या सांख्यिकीवर विपरित परिणाम दिसू लागताच, चीनने २०१६ साली ‘एक अपत्य धोरणा’चा त्याग केला आणि दाम्पत्यांना दोन अपत्यांना जन्म देण्याची मुभाही दिली. पण, आता वेगाने विकासाकडे झेपावणार्‍या चीनमध्ये मात्र तरुणांना लग्न आणि मुलांना जन्म देणे, हेच काहीसे नकोसे वाटू लागल्याने लोकसंख्येच्या प्रमाणात घट नोंदविण्यात आली आहे.
 
 
 
एका अंदाजानुसार चीनची लोकसंख्या ही सध्या १४४ कोटींच्या घरात आहे. म्हणजेच, जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी १८.४७ टक्के लोकसंख्या ही एकट्या चीनमध्ये वास्तव्यास आहे. चीनमधील एका नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालात लोकसंख्येच्या नकारात्मक दराबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. या अहवालानुसार, चीनच्या एकूण लोकसंख्येमध्ये आगामी काळात आणखी घट नोंदवली जाऊ शकते. त्यामुळे आता दोन अपत्य धोरणालाही चीनने मूठमाती देण्याची वेळ आली आहे. तसे केले नाही, तर आगामी पाच वर्षांत दरवर्षी दहा दशलक्ष बालकांच्या जन्माची संख्या अधिकाधिक कमी होऊ शकते. तसेच चीनच्याच एका सरकारी आकडेवारीनुसार, २०१९ साली चीनमध्ये जन्मलेल्या बालकांची संख्या पाच लाख ८० हजारांनी घटून १४.६५ दशलक्ष इतकी नोंदविण्यात आली. दर हजार लोकसंख्येमागे १०.४८ टक्के इतका नोंदवलेला जन्मदर हा १९४९ पासूनचा सर्वात कमी जन्मदर चीनच्या चिंतेत नक्कीच भर घालणारा आहे.
 
 
 
चीनचे एक ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ काई फेंग यांच्या मते, आगामी चार वर्षं म्हणजे साधारण २०२५ पर्यंत चीन हाच देशातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश असेल. परंतु, त्यानंतर मात्र या लोकसंख्येच्या प्रमाणात घट होण्यास सुरुवात होईल. त्याचा थेट परिणाम देशाच्या मागणी-पुरवठ्यावर होईल. लोकसंख्येतील ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण वाढलेले असेल, तर तरुणांची संख्या कमी झालेली असेल. म्हणूनच चीनने आतापासून लोकसंख्येच्या या सांख्यिकीला गांभीर्याने घेण्याचा सल्ला फेंग यांनी सरकारला दिला आहे. कोणी विचार करेल की, कदाचित कोरोना महामारीमुळे चीनच्या लोकसंख्येत घट नोंदविण्यात आली असावी. पण, ‘वर्ल्डोमीटर’च्या उपलब्ध आकडेवारीनुसार, चीनमध्ये कोरोनाचे ९०,५२० रुग्ण आढळले व त्यापैकी ४,६३६ नागरिकांचाच मृत्यू झाला. आता कोरोनाचे उगमस्थान असलेल्या चीनमध्येच इतकी कमी रुग्णसंख्या आणि कमी मृतांची संख्या हे खरंतर न पटणारेच. पण, असो. तेव्हा, कोरोना मृत्यू हे चीनमधील लोकसंख्या घटीचे कारण नक्कीच नाही, हे स्पष्ट. कोरोना महामारीचा साहजिकच चीनलाही फटका बसला. उत्पादन, आयातही घटली. परिणामी, लोकांचे रोजगार हिरावले. महागाईदेखील वाढली. आता अशा परिस्थितीत जिथे स्वत:चा उदरनिर्वाह जेमतेम होत असेल, तिथे लग्न, मुलं अशा कुटुंबनियोजनाचा विचार करताना चीनची तरुण पिढी फारसा पुढाकार घेताना दिसत नाही. पण, चीनला कुटुंबकल्याणाची काळजी आहे म्हणून हे सारे चिंताजनक वाटते असे अजिबात नाही, तर भारत, अमेरिकेला टक्कर देण्यासाठी गाठीशी उत्पादनक्षम, मागणी वाढवणारी, बाजार खेळते ठेवणारी लोकसंख्या हवी, म्हणूनच चीन ‘मांगे मोअर.’
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@