जगाला आर्यत्वाच्या (श्रेष्ठत्वाच्या) मार्गावर घेऊन जाण्याच्या उदात्त व उच्च ध्येयामुळे आपल्या वैदिक संस्कृतीचे स्थान अढळ व सर्वांमध्ये अग्रणी मानले जाते. किती सर्वश्रेष्ठ ध्येय आहे पाहा - कृण्वन्तो विश्वमार्यम्! म्हणजेच या जगातील प्रत्येक मानवाला एक श्रेष्ठ व आदर्श माणूस घडवूया.
इन्द्रं वर्धन्तो अप्तुर: कृण्वन्तो विश्वमार्यम्।
अपघ्नन्तोऽराव्णः॥ (ऋग्वेद ९/६३/५)
अन्वयार्थ
हे (अप्तुर:) सत्कर्मांमध्ये निपुण असलेल्या सुजनांनो, (इन्द्रम्) आत्म्याला, परम ऐश्वर्यशाली तत्त्वांना (वर्धन्त:) वाढवित (अराव्ण:) दानहीनता, चेंगटपणा, कृपणता, ईर्ष्या, द्वेष, स्वार्थ इत्यादी दुर्भावनांना (अपघ्नन्त:) दूर सारत (विश्वम्) सार्या जगाला (आर्यम्) आर्य-श्रेष्ठ (कृण्वन्त:) बनवत पुढे जाऊया!
विवेचन
प्रत्येक संस्कृती, संस्था किंवा संघटना यांचे काहीना काहीतरी उद्दिष्ट अथवा ध्येय असते. ध्येयाविना या जगात कोणाचीही महत्ता लक्षात येते नाही. वरील मंत्रातून वेद आणि वैदिक संस्कृतीची ध्येयनिष्ठा दृष्टीस पडते. मंत्र तसा छोटाच आहे, पण यातील भाव मात्र विशालतम आहे, तो म्हणजे जगाला आर्यत्वाच्या (श्रेष्ठत्वाच्या) मार्गावर घेऊन जाण्याचा! याच उदात्त व उच्च ध्येयामुळे आपल्या वैदिक संस्कृतीचे स्थान अढळ व सर्वांमध्ये अग्रणी मानले जाते. किती सर्वश्रेष्ठ ध्येय आहे पाहा - कृण्वन्तो विश्वमार्यम्! म्हणजेच या जगातील प्रत्येक मानवाला एक श्रेष्ठ व आदर्श माणूस घडवूया. ’आर्य’ म्हणजेच उत्तमोत्तम गुणांनी परिपूर्ण असा मानव. उत्कृष्ट गुण, कर्म आणि स्वभाववैशिष्ट्यांनी नटलेला असा तो मानव जगाच्या कोणत्याही देशाचा असो. त्यातील अवगुण गळून तो श्रेष्ठत्वाला प्राप्त व्हावा, हीच पवित्र भावना वेदांनी विशद केली आहे.
जगात अनेक मतं आणि संप्रदाय आहेत. ज्यांना आपण ‘धर्म’ संबोधतो. एतद्देशीय घ्या किंवा विदेशी, या सर्व संप्रदायांची उद्दिष्टे फारच संकुचित आहेत. कोणी या जगाला हिंदू बनवू इच्छितो, तर कोणी मुसलमान. कोणी ख्रिश्चन, तर कोणी बौद्ध. कोणी जैन तर कोणी शीख. कोणी पुरोगामी तर कोणी कम्युनिस्ट, पण वेद किंवा वैदिक संस्कृती ही मात्र या सर्व संकुचित अशा मतमतांतरांच्या गलबल्यातून बाहेर काढत जगातील सर्व मानवांना ‘आर्य’ म्हणजेच श्रेष्ठ मानव बनवू इच्छिते. वेद व प्राचीन वैदिक वाड्.मयात आणि अर्वाचीन काव्य-नाटकादी संस्कृत साहित्यात मोठ्या प्रमाणात ‘आर्य’ याच शब्दाचा उल्लेख आढळतो.
‘ऋ गतौया’ धातूपासून ‘आर्य’ शब्दाची उत्पत्ती होते. याचा अर्थ ‘गति: प्रापणार्थे’ म्हणजेच ज्ञान, गमशीलता या तत्त्वांना प्राप्त होणार्याला ‘आर्य’ असे म्हणतात. ‘निरुक्त’ शास्त्रात ‘आर्य’ शब्दाची व्याख्या करताना म्हटले आहे- ‘आर्य ईश्वरपुत्र:।’ म्हणजेच खर्या अर्थाने ‘आर्य’ हाच ईश्वराचा पुत्र असतो, तर ऋग्वेदात ही समग्र पृथ्वी आर्याला प्रदान करण्याची उदात्त भावना व्यक्त झाली आहे. ‘अहं भूमिमददाम् आर्याय।’ यावरून हे स्पष्टपणे निदर्शनास येते की, भारतवासीयांचे प्राचीन व मूलभूत नाव ‘आर्य’ हेच होते, तर या देशाचेही प्राचीनतम नाव आर्यावर्त! म्हणूनच आपण सर्वजण ‘आर्य’ आहोत. रामायणात प्रभू श्रीराम, भरत, लक्ष्मण, शत्रुघ्न त्यांना त्यांच्या पत्नींनी ‘आर्यपुत्र’ असे म्हणून संबोधले आहे, तर महाभारतातदेखील पांडव इत्यादीकांनी ‘आर्यपुत्र’ या नावानेच संबोधल्याचे पुरावे सापडतात. ‘मनुस्मृती’ या ग्रंथात मनू महाराजांनी ‘आर्यावर्त’ याच नावाने आपल्या देशाचा उल्लेख केला आहे. ‘वशिष्ठस्मृती’मध्ये म्हटले आहे-
कर्तव्यमाचरन् कार्यम् अकर्तव्यमनाचरन्।
तिष्ठति प्रकृताचारे, स तु आर्य इति स्मृत:॥
म्हणजेच जो पवित्र व शुद्ध कर्तव्य-कर्मांचे सदैव आचरण करतो, वाईट कर्मांपासून (अकर्तव्य) पासून नेहमी दूर राहतो आणि जो पूर्णांशाने सदाचारी असतो, तोच आर्य होय. महाभारतात महर्षी वेदव्यासांनी जो ज्ञानी, समाधानी, मनोनिग्रही, सत्यवादी, जितेंद्रिय, दानी, दयाळू आणि नम्र असतो, त्यालाच ‘आर्य’ म्हटले आहे. इतके आपले श्रेष्ठतम नामाभिधान असल्याने आपण त्याचा गौरवाने स्वीकार करावयास हवा. म्हणूनच वेदांनी व वैदिक संस्कृतीने समग्र विश्वाला श्रेष्ठ मानव बनविण्याचा जो उद्घोष केला आहे, तो निश्चितच सर्व प्रकारच्या संकीर्णतेपासून अलिप्त आहे.
समग्र जगाला आर्य बनविण्याकरिता काय करावे? कोणकोणत्या सत्प्रवृत्तींचा स्वीकार करावा आणि कोणत्या वाईट दोषांचा त्याग करावा, याचेही सुंदर विवेचन येथे केले आहे. कारण, आर्य बनणे किंवा बनविणे, हे तितके सोपे नाही. उपरोक्त मंत्रातील पहिले ‘इन्द्रं वर्धन्त:’ व शेवटचे ‘अपघ्नन्त: अराव्ण:!’ ही दोन छोटी छोटी वाक्ये स्वतःकडे अंगुलीनिर्देश करण्याचा संकेत करतात. कारण, स्वतः घडल्याशिवाय इतरांना घडविता येत नाही. इंद्राला वाढवीत आणि आपल्यातील नानाप्रकारच्या दुष्ट प्रवृत्तींचे निराकरण करीत आर्यत्व वाढीस लागते. स्वतः जोपर्यंत सन्मार्गावर चालणार नाहीत, तोपर्यंत दुसर्यांना सन्मार्ग शिकविता येत नाही. ‘इदि’ या संस्कृत धातूपासूून बनलेल्या ’इंद्र’ शब्दाचा अर्थ परम (श्रेष्ठ) ऐश्वर्य असा सांगितलेला आहे. याच अनुषंगानेे इंद्र म्हणजेच भगवंताचे सर्व प्रकारचे सद्गुण, सद्विद्या, सत्कर्म असेेे ऐश्वर्यसंपन्न विविध अर्थ! ‘काशिका’ व्याकरण महाभाष्य ग्रंथात ‘आत्म्याला इंद्र’ असे म्हटले आहे. म्हणजेच जो काम, क्रोध, लोेभ, मोह इत्यादी नाना प्रकारच्या शत्रुरूप विषयांवर विजय मिळवून मनाला जिंकतो, तो आयुष्यभर युुक्त आत्मा म्हणजेच इंद्र.
हा आत्मा ज्ञानयुक्त असतो. आपले प्रत्येक कर्म विवेकबुद्धीने करतो म्हणून अशा या इंद्राला वाढवत आणि नानाविध श्रेष्ठ गुण, कर्म व स्वभावांची वृद्धी करीत जो माणूस पुढे वाटचाल करतो. त्याचबरोबर आपल्यातील ‘अराव्ण:’ म्हणजेच कृपणता, स्वार्थभाव, चेंगटपणा, दातृत्वहीनता इत्यादी वाईट प्रवृत्तींना दूर सारत स्वतःला उत्तमोत्तम बनवितो, तोच इतरांना काहीतरी चांगला उपदेश करण्याचा व समाज घटकांना श्रेष्ठतम बनविण्याचा अधिकारी होतो.
सांप्रतकाळी या वेदमंत्राला सर्वार्थाने अंगीकारण्याची फारच आवश्यकता आहे. जगात मानव ऐक्य, सुख, शांतता व समृद्धी नांदण्यासाठी सर्व राष्ट्रांनी एक मुखाने आर्यत्वाचा अंगीकार केल्यास सर्व प्रकारची मतमतांतरे, संप्रदाय, जातीव्यवस्था व भेदभावनांच्या भिंती नाहीशा होतील. सर्वजण सद्भावनेने एक दुसर्यांचे ‘मित्रराष्ट्र’ बनून राहतील. आर्यत्वाचा एवढा उदात्त उच्च ध्येय जगातील प्रत्येक मानवाने स्वीकारल्यास शत्रुत्व भावना तर उरणारच नाही. एक प्रकारे ईश्वरीय व्यवस्थेची स्थापना सर्वत्र होईल व समग्र विश्व पवित्र उद्देशाने प्रेरित होत ‘सर्वे भवन्तु सुखिनः’ या मार्गाने वाटचाल करीत राहील.
- डॉ. नयनकुमार आचार्य