'बात निकली ही है तो दूर तक जायेगी...'

20 Apr 2021 16:49:37

ram satpute_1  



मुंबई :
राष्ट्रवादीच्या नेत्या खडसे कुटुंबीय व भाजप आमदार राम सातपुते यांच्यामध्ये ट्विटर वॉर चांगलंच रंगल्याचे पाहायला मिळते आहे. रोहिणी खडसे यांनी ट्विटरवर राम सातपुते यांच्यावर टीका केली. त्यानंतर जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे यांना सातपुते यांनी पुन्हा प्रत्युत्तर दिले आहे. तसेच, त्या उत्तरात ‘कशाला बोलायला लावता ताई.....बात निकली ही है तो दूर तक जायेगी...!’ असा इशाराही दिला आहे.


सातपुते म्हणाले की, “ताई भोसरी जमीन घोटाळ्यामुळे मंत्रीपद गेलं ना हो नाथाभाऊंचं. या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे तीच कारवाई झाली ना तेव्हा. आणि यामुळेच आपला २०१९ला मुक्ताईनगरच्या जनतेने पराभव केला. कशाला बोलायला लावता ताई..? बात निकली ही है तो दूर तक जायेगी ..!” असं टोला भाजप आमदार राम सातपुते यांनी रोहिणी खडसे यांना लगावला आहे.


'देवेंद्र फडणवीस सत्ता गेल्यापासून माशासारखे तडफडत आहेत’ अशी टीका राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली होती. त्यावर बोलताना “नाथाभाऊ आपण आयुष्यभर पैसे खायचे सोडून दुसरं काहीच केलं नाही आणि देवेंद्र भाऊबद्दल बोलत आहात.विरोधी पक्षनेता असताना तोडपाणी आणि मंत्री झाले तेव्हा भ्रष्टाचार. निष्कलंक देवेंद्रजीवर बोलण्या गोदर आरसा बघा सगळं लक्षात येईल” असं ट्वीट राम सातपुतेंनी केले होते.

त्याला खडसे यांच्या कन्या अ‍ॅड. रोहिणी खडसे यांनीही ट्विटद्वारे प्रत्युत्तर दिले होते. त्यांनी म्हटले आहे की, खडसे जर पैसे खात होते, तर मग सत्ता होती, तेव्हा कारवाई का केली नाही? तेव्हा तुम्ही नागपुरी बांगड्या भरल्या होत्या का? आणि असेल तुमच्यात हिम्मत तर सिद्ध करा ना? श्यामराव फडणविशी मिरची तुम्हाला का झोंबली? ज्यांच्याबद्दल बोलले त्यांच्या तोंडात काय मिठाची गुळणी आहे का? अशा शब्दांत रोहिणी खडसे यांनी राम सातपुते यांच्यावर टीका केली होती. मात्र यालाही सातपुते यांनी प्रत्युत्तर देत टीका केली की,ताई मंत्रीपद गेलं ना हो नाथाभाऊंच या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळं तीच कारवाई झाली ना तेव्हा आणि यामुळेच आपला २०१९ला मुक्ताईनगरच्या जनतेने पराभव केला. कशाला बोलायला लावता ताई..?बात निकली ही है तो दूर तक जायेगी."
Powered By Sangraha 9.0