श्रीरामाचा जन्मदाखला

    दिनांक  20-Apr-2021 22:38:29   
|

Ram 1_1  H x W:
 
 
 
दि. १३ सप्टेंबर २००७. संपुआ सरकारने सर्वोच्च न्यायालयात ‘अ‍ॅफिडेव्हिट’ सादर केले. त्याचा आशय होता - श्रीराम ही काल्पनिक व्यक्तिरेखा आहे, ऐतिहासिक नाही. श्रीराम कधीच जन्मले नव्हते. अर्वाचीन काळात जन्म झाल्याचा पुरावा म्हणजे जन्मदाखला. या दाखल्यावर काय काय माहिती येते? तर - बाळाचे नाव, आई-वडिलांचे नाव, कुळाचे नाव, पूर्वजांचे नाव, जन्म तिथी, जन्म वेळ, जन्म वर्ष आणि जन्मस्थान. श्रीरामांच्या बाबतीत यातील कोणती माहिती ‘वाल्मिकी रामायणा’तून उपलब्ध होते. आज रामनवमीनिमित्त त्यावर टाकलेला हा प्रकाश...
प्राचीन काळातील गोष्ट आहे. गुरु वशिष्ठ ऋषींच्या अनुमोदनाने, अयोध्येच्या राजा दशरथ व राणी कौसल्या यांनी शरयू नदीच्या काठावर ‘अश्वमेध’ यज्ञाला प्रारंभ केला. या यज्ञाचे पौरोहित्य श्रेष्ठ ऋषी ऋष्यश्रुंग यांनी केले. या वेळी राजाने ‘चतु:ष्टोम’, ‘उक्थ्य’, ‘अतिरात्र’, ‘ज्योतिष्टोम’, ‘आयुषी’, ‘अभिजित’, ‘विश्वजित’, ‘अप्तोर्याम’ आदी यज्ञ केले. ‘अश्वमेध’ यज्ञ यथासांग पार पडल्यावर राजा दशरथाने ‘पुत्रकामेष्टी’ यज्ञ केला. या यज्ञाच्या ज्वाळातून सूर्यासमान तेजस्वी असलेला यज्ञपुरुष प्रकट झाला. त्याने नरपती दशरथाला सुवर्णकलश दिला व म्हणाला, “राजा! या कलशातील देवनिर्मित पायस तुझ्या राण्यांनी प्राशन केल्यावर त्यांना यथावकाश पुत्रप्राप्ती होईल!”
 
 
निपुत्रिक असलेला राजा दशरथ या आशीर्वादाने आनंदला. शरदेतील पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे प्रफुल्लित झाला. राजाने ते पायस आपल्या तीन राण्यांना वाटले. त्याने पायसाचा अर्धा भाग कौसल्येला दिला. सुमित्रेला एक चतुर्थांश दिला. मग कैकयीला एक अष्टमांश दिला आणि मग उरलेला एक अष्टमांश भाग परत सुमित्रेला दिला. पाहता पाहता एक वर्ष सरले ...
 
 
ततो यज्ञे समाप्ते तु ऋतूनां षट् समत्ययुः।
ततश्च द्वादशे मासे चैत्रे नावमिके तिथौ॥ (१-१८-८)
 
 
पुत्रकामेष्टी यज्ञाची समाप्ती होऊन सहा ऋतू उलटले. यज्ञ केल्यापासून १२ महिन्यांचा काळ लोटला होता. चैत्र महिन्याच्या शुद्ध पक्षातील नवमी होती. अदिती ज्या नक्षत्राची देवता आहे, असे पुनर्वसू नक्षत्र पूर्वेला उगवले होते. या वेळी आकाशात पाच ग्रह उच्चस्थानी होते. वाक्पती गुरू, इंदूसह म्हणजे चंद्रासह कर्क राशीत विराजमान होता. या वेळी पूर्व क्षितिजावर चंद्र आणि गुरू कर्क राशीत उगवले होते. दिवस चढत होता. मध्याह्नाला सर्व लोक ज्याला नमस्कार करतात, तो जगाचा नाथ, कौसल्येच्या उदरी जन्माला! दिव्य लक्षणांनी युक्त असलेला विष्णूचा अंश, इक्ष्वाकु कुळात जन्माला आला! या भाग्यवान बाळाचे डोळे लालसर होते, ओठ लालबुंद होते आणि त्याचा आवाज दुंदुभीसारखा मोठा होता!
 
 
पुत्राच्या तेजाने कौसल्यासुद्धा तेजस्वी दिसू लागली! ज्याप्रमाणे हातात वज्र धारण करणार्‍या इंद्राला जन्म दिल्यावर अदिती तेजस्वी दिसू लागली, तशी राणी कौसल्या शोभत होती!
 
 
लवकरच पुष्य नक्षत्रावर कैकयीला पुत्र झाला आणि त्यानंतर सुमित्रेला आश्लेषा नक्षत्रावर दोन पुत्र प्राप्त झाले. चार राजकुमारांच्या जन्माने अयोध्या नगरी आनंदली! गंधर्व गायन करू लागले. अप्सरा नृत्य करू लागल्या. आकाशातून पुष्पवृष्टी झाली आणि अवघे अयोध्यावासी राजपथावर गाऊ, नाचू लागले!
 
 
राजा दशरथाने नवबालाकांचे नामकरण केले. कौसल्येच्या बाळाचे नाव राम, कैकयीचा भरत आणि सुमित्रेचे लक्ष्मण आणि शत्रुघ्न! ‘रमन्ते सर्वे जना: गुणै: अस्मिन् इति रामः’ ज्याने सर्व जनांना आपल्या गुणांनी रमवले तो राम! ‘बिभर्ति लोकान् इति भरतः’ ज्याने राम वनवासात असताना राज्याचे भरणपोषण केले, तो भरत! ‘लक्ष्मणो लक्ष्मी सम्पन्नः’ जो लक्ष्मी अर्थात धनसंपन्न होता तो लक्ष्मण! किंवा ज्याच्याकडे रामावरील निस्सीम प्रेमाचे विपुल धन होते तो लक्ष्मण! आणि ‘शत्रून् हन्ति इति शत्रुघ्न:’ ज्याने शत्रूंचा नाश केला तो शत्रुघ्न अशी अर्थपूर्ण नावे ठेवली.
 
 
जन्मदाखल्यावर आणखी माहिती हवी ती - कुळाची. वडील, आजोबा इत्यादींची. दशरथ राजाची जानकीविवाह समयी जनकाशी भेट झाली. त्यावेळी वशिष्ठ ऋषींनी रामाच्या ५० पूर्वजांची नावे आणि त्यांनी केलेले पराक्रम जनकाला सांगितले. त्या नावांमध्ये मनु, इक्ष्वाकु, सगर, भगीरथ, दिलीप, रघु, अज आणि दशरथ यांचा समावेश होता. रामायणात, रामाचे जन्मस्थान शरयू नदीच्या काठावर असलेली अयोध्या नगरी सांगितले आहे. तसेच रामाचा जन्म राजप्रासादात झाल्याचे कळते.
 
 
आता राहिला प्रश्न जन्म वर्षाचा. रामायणाचा काळ शालिवाहन आणि विक्रमादित्य संवत्सराच्या कितीतरी आधीचा. युगाब्दच्या पण आधीचा. एखाद्या घटनेपासून वर्ष मोजण्याची पद्धत अजून सुरु झाली नव्हती, असा तो काळ होता. त्यामुळे रामाच्या जन्माचे वर्ष कोणते, हे शोधण्यासाठी आधार घ्यावा लागतो रामायणात नमूद करून ठेवलेल्या ग्रहांच्या स्थानांचा आणि आकाश निरीक्षणांचा. असा अभ्यास काही जणांनी केला आहे. यापैकी विस्तृत अभ्यास आहे निलेश ओक यांचा. त्यांनी रामायणातील ५५० हून अधिक आकाशाची निरीक्षणे अभ्यासली. त्यामध्ये रामाच्या जन्माच्या वेळेची ग्रहस्थिती, युद्धाच्या वेळची ग्रहस्थिती, धुमकेतूचा उल्लेख, त्या काळात ‘अभिजित’ हा ध्रुव तारा असल्याचा उल्लेख, त्या वेळेची ऋतू व महिन्यांची सांगड, त्या वेळचे नद्यांचे प्रवाह अशा अनेक गोष्टींचा मेळ घालून निलेश ओक यांनी रामजन्माचे वर्ष - इसवी सन पूर्व १२,२४० होते असे दाखवले आहे. ‘12,209 BCE Rama - Ravana Yuddha’ या त्यांच्या पुस्तकात या तारखेचे विवरण मिळेल.
 
 
वरील सर्व माहितीवरून श्रीरामाचा जन्म दाखला अशा प्रकारे तयार होतो -
 
 
श्रीरामाचा जन्मदाखला
 
जन्म दिवस - चैत्र शुद्ध नवमी, इस पूर्व १२,२४०
 
बाळाचे नाव - राम
 
आईचे नाव - कौसल्या
 
वडिलांचे नाव - दशरथ
 
कुळाचे नाव - इक्ष्वाकु
 
पूर्वज - ५० पूर्वजांची नावे
 
जन्मस्थान - अयोध्या
 
संकलक - ऋषी वाल्मिकी
 
इतर महापुरुषांचे जन्मदाखले
 
 
 
राजा राम खूप प्राचीन काळी होऊन गेला असल्याने त्याविषयी आपल्याला माहिती मिळते ती वाल्मिकींनी लिहिलेल्या ‘रामायण’ या इतिहासातली. रामाच्या नंतरच्या काळात होऊन गेलेल्या व्यक्तींविषयी किती माहिती उपलब्ध आहे? त्यांचा जन्मदाखला करायचा म्हणला तर तो कसा दिसेल ...
 
 
१. ग्रीक सिकंदरचा जन्मदाखला
 
 
सिकंदरची माहिती आपल्याला मिळते त्याच्यानंतर होऊन गेलेल्या त्याच्या ग्रीक चरित्रकारांकडून. ते चरित्रकार सांगतात - सिकंदरचे वडील होते फिलीप तिसरा व आई ओलिम्पीयास ही फिलीपची चौथी बायको होती. तसेच ही चरित्रे सांगतात की, सिकंदर हा देवांचा राजा झ्यूसचा २० वा वंशज होता. या ‘रेकॉर्ड्स’मधून सिकंदरने ग्रीस, आशिया मायनर, इजिप्त, पर्शिया जिंकल्याचे कळते. ते लिहितात, सिकंदरचा जन्म ग्रीक वर्षाच्या पहिल्या महिन्यात झाला. त्यानुसार त्याचा जन्म इसवी सन पूर्व ३५६च्या २० जुलैला झाला असावा असे इतिहासकारांना वाटते. पण, त्या काळात ग्रीसमध्ये अनेक कॅलेंडर्स वापरात होती व त्यांचा एकमेकात मेळ नव्हता. तात्पर्य, सिकंदरची जन्मतारीख निश्चितपणे सांगता येत नाही.
 
 
२. येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस
 
 
येशू ख्रिस्ताची माहिती आपल्याला मिळते त्याच्या नंतर होऊन गेलेल्या त्याच्या चार अज्ञात चरित्रकारांकडून. परंपरेने त्या अज्ञात लेखकांना मार्क, मॅथ्यू, ल्युक व जॉन म्हटले आहे. या पैकी एकही चरित्र येशू ख्रिस्ताचा जन्म कोणत्या दिवशी, कोणत्या महिन्यात, कोणत्या ऋतूत वा कोणत्या वर्षी झाला, या कशाचाच उल्लेख नाही. एक चरित्रकार सांगतो येशूचा जन्म गुहेत झाला, तर दुसरा सांगतो एका तबेल्यात झाला. त्याच्या आई-वडिलांचे नाव मेरी व जोसेफ होते हे कळते. एका चरित्रात जोसेफ हा हेलीचा मुलगा जोसेफ होता, तर दुसर्‍या चरित्रात तो जॅकॉबचा मुलगा जोसेफ होता असे संगितले आहे. येशूची आई कुमारिका होती हे सांगितले आहे आणि त्याचे खरे वडील ‘होली घोस्ट’ म्हणजे ‘गॉड’ आहे असे सांगितले आहे. तात्पर्य, येशू ख्रिस्ताच्या जन्माचा दिवस, महिना, वर्ष, ऋतू, आजोबा, जन्मस्थळ निश्चितपणे सांगता येत नाही.
 
 
जन्मदिवसाच्या बाबतीत अपूर्ण वा अनिश्चित माहिती अनेक ऐतिहासिक व्यक्तींबाबत झाली आहे. त्यातही अनेक प्राचीन व्यक्तींच्या बाबतीत जन्मदिवसाची निश्चित माहिती उपलब्धच नाही. मग ते प्राचीन भारतीय वैज्ञानिक असोत, ग्रीक तत्त्वज्ञ असोत, ख्रिश्चन सेंट्स असोत किंवा प्रोफेट्स असोत. २००७ मधील संपुआच्या ‘अ‍ॅफिडेव्हिट’च्या विचारसरणीनुसार अनेक महापुरुष कधीच अस्तित्वात नव्हते ते केवळ कुठल्याशा लेखकांच्या मनातले काल्पनिक लोक होते असे म्हणावे लागेल. पण, संपुआने आत्मघात केला! ज्यांच्याबद्दल माहिती नाही, त्या महापुरुषांवर ‘अ‍ॅफिडेव्हिट’ करायचे सोडून, ज्याची संपूर्ण जन्मपत्रिका उपलब्ध आहे, अशा रामाच्या जन्माविषयी संशय घेतला.
 
 
अनेक महापुरुषांच्या अनिश्चित जन्मदिवसाच्या पार्श्वभूमीवर, श्रीरामाचा जन्मदाखला मात्र सूर्यासारखा तळपतो. रामाच्या जन्म वेळेचे वाल्मिकींनी करून ठेवलेले अचूक आकाशनिरीक्षण अद्भुत आहे. ती आकाशनिरीक्षणे हजारो वर्ष ज्या संस्कृतीने टिकवून ठेवली, ती संस्कृती महान आहे. ज्या परंपरेने वर्षानुवर्ष चैत्र शुद्ध नवमीला रामजन्मोत्सव साजरा केलाय ती परंपरा धन्य आहे!
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.