सह्याद्रीतील वाघांचा पाठीराखा

02 Apr 2021 12:46:01

girish punjabi _1 &n



प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहत, गेल्या दशकभरापासून सह्याद्रीमधील वाघांच्या अधिवासावर काम करणारे वन्यजीव संशोधक गिरीश पंजाबी यांच्याविषयी...

 
 
मुंबई (अक्षय मांडवकर) - सह्याद्रीतील कड्याकपार्‍यांमध्ये गुप्तपणे अधिवास करणार्‍या वाघांचा शोध घेणारा हा संशोधक. येथील वाघांच्या भ्रमणमार्गावर सूक्ष्मपणे अभ्यास करणारा. या भ्रमणमार्गावरील प्रत्येक गाव, डोंगर, नदी, ओहळ तोंडपाठ असलेला. या भूभागावरील त्यांच्या आजवरच्या अभ्यासामुळेच तळकोकणातील व्याघ्र अधिवासाला सरकारी संरक्षणाचे कवच मिळाले आहे. सह्याद्रीमधील वन्यजीवांचा अधिवास आणि त्यांचा भम्रणमार्ग अबाधित ठेवण्यासाठी चिकाटीने संशोधन करणारा सह्याद्रीतील वाघांचा हा पाठीराखा म्हणजे वन्यजीव संशोधक गिरीश पंजाबी.
 
 
गिरीश यांचा जन्म दि. 31 ऑक्टोबर, 1987 साली पुण्यात झाला. पुण्यामध्येच हचिंग्ज हायस्कूलमध्ये त्यांचे शालेय शिक्षण झाले. शाळेत असतानाच ते निसर्गरम्य ठिकाणी कॅम्पिंगला जात होते. या कॅम्पिंगच्या माध्यमातून त्यांना निसर्गाची ओढ लागली आणि पुढे ती बहरतच गेली. शालेय शिक्षणानंतर पर्यावरणासंंबंधी शिक्षण घेण्याच्या दृष्टीने त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयातील ‘प्राणिशास्त्र’ विभागात प्रवेश मिळवला. या दरम्यान एका ‘इकोटूर’ संस्थेसह काम करण्यास सुरुवात केली. त्याद्वारे भारतातील अनेक राष्ट्रीय उद्याने आणि व्याघ्र प्रकल्पांमध्ये प्रवास केला. 2006 साली ‘रणथंभोर व्याघ्र प्रकल्पा’ला भेट देईपर्यंत गिरीश यांची वन्यजीव विज्ञानातील आवड ही सुप्त राहिलेली होती. मात्र, या ठिकाणी वन कर्मचार्‍यांसोबच केलेल्या वास्तव्यामुळे त्यांना क्षेत्रीय वन कर्मचार्‍यांचे जीवन किती अवघड आहे आणि वन्यजीव संवर्धनामध्ये किती जटील समस्या आहेत, याची जाणीव झाली. त्यामुळे वन्यजीव संवर्धन क्षेत्रासंबंधी त्यांचे आकर्षण वाढले आणि तेव्हापासूनच त्यांनी वन्यजीव संवर्धन क्षेत्रामध्ये काम करण्याचा निर्धार केला.
 
 
बंगळुरू येथील ‘नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्स’ या संस्थेमधून गिरीश यांनी 2008-10 सालादरम्यान ‘वन्यजीव जीवशास्त्र आणि संवर्धन’ विषयातून आपले पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. यावेळी त्यांनी डॉ. रवि चेलम आणि डॉ. अबी तामीम वनक यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या पदव्युत्तर प्रबंधासाठी भारतीय कोल्ह्यांचा अभ्यास केला. पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणादरम्यान त्यांनी संपूर्ण भारतभरातील संरक्षित वनक्षेत्र पालथी घातली. पदव्युत्तर पदवीचा एक भाग म्हणून संशोधक, निसर्ग संवर्धक यांच्याशी झालेल्या संवादातून अफाट माहिती संकलित केली. त्यामुळे वन्यजीव संशोधन क्षेत्रात करिअर करण्याचा त्यांचा मार्ग अधिक सुकर झाला.
 
 
girish punjabi _1 &n 
 
पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गिरीश ताबडतोब डॉ. अद्वैत एडगावकर यांच्या सह्याद्रीमध्ये सुरू असलेल्या एका अभ्यासप्रकल्पात सहभागी झाले. उत्तर पश्चिम घाटामधील मोठ्या मांसाहारी प्राण्याची वहिवाट तपासण्याचे काम त्यांनी या अभ्यास प्रकल्पाच्या माध्यमातून केले. या दरम्यान, त्यांची सह्याद्रीच्या अधिवासासोबत मैत्री झाली. सह्याद्रीची ओढ कायम ठेवत त्यांनी नागालँडमधील ‘इंटांकी राष्ट्रीय उद्याना’त सर्वेक्षणाचे काम केले. पुढील कालावधीत मध्य महाराष्ट्रातील उमरेड-कर्‍हाडला व्याघ्र प्रकल्पामध्ये ‘जीपीएस-कॉलर’ लावलेल्या वाघिणीच्या परीक्षणाची जबाबदारी पार पाडली. मुंबईतील ‘संजय गांधी राष्ट्रीय उद्यान’च्या हद्दीतील शाकाहारी प्राण्यांवर संशोधनाचे काम केले. 2012 मध्ये ‘मुंबईकर फॉर एसजीएनपी’ या प्रकल्पावर केले. या माध्यमातून ‘आरे वसाहती’मधील भटक्या कुत्र्यांच्या संख्येचे सर्वेक्षण केले.
 
 
‘इंडो-नॉर्वेजियन सहयोगी प्रकल्पा’अंतर्गत त्यांनी ‘डब्ल्यूसीएस-इंडिया’ संस्थेच्या संशोधिका डॉ. विद्या अत्रेय यांच्यासोबतही काम केले. या कामादरम्यान त्यांनी सावंतवाडी-दोडामार्ग तालुक्यांतील संरक्षित क्षेत्राबाहेर ‘कॅमेरा ट्रॅपिंग’ तंत्राद्वारे वन्यजीव सर्वेक्षण हाती घेतले. 2014-15मध्ये मिळालेल्या लघु अनुदानांतर्गत त्यांनी सह्याद्रीतील वन्यजीव भ्रमणमार्गाचा अभ्यास केला. सोबतच स्थानिक संशोधक आणि वन्यजीव संवर्धकांबरोबर संपर्कसेतू तयार केला. यादरम्यान, त्यांनी प्रथमच वनविभागाच्या मदतीने दोडामार्ग तालुक्यातील ‘तिलारी’ परिसरात ‘कॅमेरा ट्रॅप’ लावले आणि येथून तीन वाघांची नोंद केली. या कामाकरिता त्यावेळेचे कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक एम. के. राव यांची त्यांना मदत मिळाली. तिलारीमध्ये आढळलेल्या वाघांचा अधिवास लक्षात घेऊन हा परिसर संरक्षित करण्यासाठी पहिले पाऊल यामुळे पडले. या कामासाठी गिरीश यांना 2015 साली ‘कार्ल झीस संरक्षण पुरस्कार’ मिळाला.
 
 
2016 साली ‘रफर्ड फाऊंडेशन’कडून मिळालेल्या अनुदानाच्या जोरावर त्यांनी ‘डब्ल्यूआरसीएस’ संस्थेच्या माध्यमातून तिलारी ते चंदगडदरम्यान आढळणार्‍या तृणभक्षी प्राण्यांचे सर्वेक्षण केले. या कामानिमित्त त्यांनी सह्यादीचा कोपरा अन् कोपरा पालथा घातला. 2019 सालापासून ते ‘डब्लूसीटी’ या संस्थेसोबत कार्यरत आहेत. या माध्यमातून ते वन्यजीवांवर देखरेख कशा पद्धतीने ठेवावी, याबाबत वनकर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्याचे काम करतात. सध्या ते वनविभागाला ‘तिलारी संवर्धन राखीव क्षेत्रा’चा व्यवस्थापन आराखडा तयार करण्यासाठी मदत करत आहेत.
 
 
या सर्व कामामुळे सह्याद्रीमधील गावांमध्ये गिरीश यांचा दांडगा जनसंपर्क तयार झाला आहे. “आजवर स्थानिकांनीच सह्याद्रीमधील जंगलाचे संरक्षण केले आहे आणि भविष्यातही या जंगलाचे संवर्धन तेच करणार आहेत,” असे गिरीश सागंतात. म्हणूनच सह्याद्रीतील स्थानिक ग्रामस्थांना मध्यभागी ठेवून वनक्षेत्र संरक्षणाच्या माध्यमातून त्यांचा विकास साधण्यासाठी ते आग्रही आहेत. त्यांना पुढील वाटचालीकरिता दै.‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!
 
 
Powered By Sangraha 9.0