'लॉकडाऊन की निर्बंध?', किशोरी पेडणेकर नेमकं काय म्हणाल्या..

02 Apr 2021 14:58:45

kishori pednekar _1 



मुंबई: सगळे मुंबईकर 'मिनी लॉकडाऊन' होणार का, या संभ्रमावस्थेत असताना, "मुंबईत आता कोरोना रुग्ण वाढत आहेत. रुग्णालयातील खाटा भरून जात आहेत. त्यामुळे काळजी वाढली आहे. 'लॉकडाऊन' कोणालाच नकोय. पण, काही कठोर नियम करावेच लागणार आहेत. शेवटी 'बचेंगे तो और भी लढेंगे'. जीवंत राहिलो तर या पृथ्वीतलावर आपण काही तरी करू शकतो," असे मत महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. 'लॉकडाऊन' करणार की कठोर निर्बंध लावणार? याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच घोषणा करणार असल्याचेही पेडणेकर यांनी यावेळी सांगितले.
किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन मुंबईतील कोरोना परिस्थितीची माहिती दिली. ''मुंबईतील कोरोनाची परिस्थिती वाढत चालली आहे. रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असून, आरोग्य यंत्रणेवर त्याचा ताण येत आहे आणि हा आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी करायचा असेल तर आपल्याला अधिक काळजी घ्यायला हवी,'' असेदेखील महापौर म्हणाल्या.
याशिवाय, घरी राहूनही अनेक जण कोरोनाबाधित होत आहेत. उपचार नीट घेतले जात नाहीत. ज्यांना गृहविलगीकरणात ठेवण्यात येत आहे, ते लोक बाहेर फिरताना दिसत आहेत. त्यामुळे आता या लोकांकडून हमीपत्र घेण्यात येणार असल्याचेही किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केले. ''केंद्रातून फार मोठी मदत मिळत नाही. त्यामुळे आम्ही आमच्या परीने प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याचा आणि कोरोनाला रोखण्याचा प्रयत्न करत आहोत,'' असे म्हणत नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचे आवाहनही त्यांनी केले.
Powered By Sangraha 9.0