परिपूर्णतेचे वेडे असलेल्या व्यक्ती अवास्तविक अपेक्षा बाळगतात. या उच्च प्रतीच्या अवास्तविक अपेक्षा केवळ त्यांच्यापुरत्याच मर्यादित असतात, असे नाही. आपल्या अवतिभोवतीच्या लोकांबाबत तितक्याच अपेक्षा ठेवून असतात. यामुळे ते लोकांवर टीका करायला किंवा त्यांच्यातील दोष दाखवायला कायम तत्पर असतात. परिपूर्णता तसे पाहिले तर चुका आणि दोषांनी भरलेल्या या जगात एक अशक्य अशी संकल्पना आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
आपण सगळेच काही ना काही काम करत असतो. ज्या कामात आपल्याला आनंद मिळतो, ते काम आपण विशेष रममाण होऊन करत असतो. ज्या कामामुळे आपल्याला पुढे जाऊन काही श्रेय मिळणार असेल, तर त्या कामासाठी आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतो. प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगवेगळी असते. त्यामागचा हेतू, अपेक्षा, रस आणि फायदा या गोष्टी आपण काम कसे करतो, हे ठरवत असतात. पण, काही लोकांच्या बाबतीत मात्र आपण करत असलेलं कुठलेही काम परिपूर्णतेने केले पाहिजे, याकडे भर असतो. अशी मंडळी मोठ्या अभिमानाने सांगत असतात, “मी कुठलंही काम अर्धवट/अपूर्ण करत नाही. आपलं कसं सगळं ‘परफेक्ट’ असतं बुवा!! मी पूर्ण काटेकोरपणेच काम करतो!” आपल्यापैकी काही जणांना आपण खरंच परिपूर्णतेने काम करणारी व्यक्ती आहोत की नाही, असा प्रश्न पडला असेल, तर नक्कीच आपण तशीच व्यक्ती आहात, याबद्दल मनात शंकाच नसावी. आपण खरंच प्रामाणिकपणे पाहाल, तर आपण काटेकोरपणे वागायला पाहिजे म्हणून नक्कीच कष्ट केले असले पाहिजेत. कारण, ‘परिपूर्ण’ या शब्दाला एक सकारात्मक वलय आहे. त्या खास वलयात आपण असलं पाहिजे, असं कोणाला वाटणार नाही. अनेक लोकांना ‘परिपूर्णता’ किंवा ‘काटेकोरपणा’ हा व्यक्तिमत्त्वाला खास उंचीवर नेणारा विशेष गुण वाटतो. साहजिकच आपण तसं असावं, असं कुणाला वाटलं तर नवल नाही.
‘परिपूर्णता’ ही गुणवत्ता सर्वसामान्यपणे आपल्या मनात आपण अपयशी ठरू नये वा आपल्याबद्दल लोकांनी कठोर टीका करू नये वा असह्य अभिप्राय देऊ नये, या आंतरिक दबावातून येत असते. हे दडपण अमर्याद असतं. खरंतर मानसशास्त्रात असं दिसून आलं आहे की, परिपूर्णतेचा मुकूट घालून वावरणारी माणसं खर्या अर्थाने राजा कधी बनत नाहीत. तथापि, ‘परिपूर्णता’ हे असे स्वभाववैशिष्ट्य आहे की, ज्यामुळे आयुष्य हे एक निकालपत्रच बनून जातं. ज्यात आपण काय व किती यश मिळवलं, याची यादी बनवून ठेवली जाते. जेव्हा परिपूर्णता निकोप असते, तेव्हा ती प्रेरणादायी ऊर्जा बनू शकते, ज्यामुळे माणसं आयुष्यातील अडचणींवर मात मिळवू शकतात, यश मिळवू शकतात. पण, काटेकारपणा जेव्हा रोगट वा धोकादायक असतो, तेव्हा तो दुःखाचा आणि निराशेचा कधी न संपणारा स्रोत बनू शकतो. गेल्या काही वर्षांत तरूण पिढीला वेगवान स्पर्धात्मक अशा जीवघेण्या वातावरणातून जावं लागत आहे. या काटेकोरपणाची समस्या अशी आहे की, काटेकोरपणामुळे अनेक मंडळींचे कार्य हे जास्त निराशाजनक झाले आहे. ज्यांनी अमाप यश मिळवले आहे, त्या लोकांपेक्षा परिपूर्णतेच्या पिंजर्यात अडकलेल्या व्यक्तींना अधिक तणाव व तणावाशी निगडित समस्या झाल्या आहेत.
एखादी व्यक्ती जेव्हा परिपूर्णतेच्या वेड्या ध्यासात अडकली की, तिचा वैयक्तिक असा प्रयोग बर्याचवेळा फसला जातो. परिपूर्णतेचे व्यसन असलेल्या व्यक्ती या उच्च प्रतीच्या कर्तृत्ववान व्यक्तींसारख्या भासतात. पण, त्या तितक्या सक्षम असतील असे नाही. यासाठी काही गुणविशेष जाणून घेणे आवश्यक आहे. परिपूर्णतेचे वेडे असलेल्या व्यक्ती अवास्तविक अपेक्षा बाळगतात. या उच्च प्रतीच्या अवास्तविक अपेक्षा केवळ त्यांच्यापुरत्याच मर्यादित असतात, असे नाही. आपल्या अवतिभोवतीच्या लोकांबाबत तितक्याच अपेक्षा ठेवून असतात. यामुळे ते लोकांवर टीका करायला किंवा त्यांच्यातील दोष दाखवायला कायम तत्पर असतात. परिपूर्णता तसे पाहिले तर चुका आणि दोषांनी भरलेल्या या जगात एक अशक्य अशी संकल्पना आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. परिपूर्णता आपण जास्तच ताणली, तर जगातील अनेक गोष्टी अपुर्याच राहतील. आपण उत्कृष्टपणासाठी झटणे आणि परिपूर्णतेचा वेडेपणा बाळगणे, या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. उत्कृष्टपणासाठी झटणारे लोक आपल्या कर्तृत्वावर समाधानी असतात आणि इतरांची प्रगती व्हायला हवी म्हणून त्यानाही मदत करतात. यांच्याविरुद्ध काटेकोरपणाने झपाटलेले लोक दुसर्याच्या चुका आणि दोष दाखवण्याकडे प्रवृत्त असतात. जेव्हा अपयशाचा सामना करावा लागतो, तेव्हा या व्यक्ती प्रचंड दडपून जातात. आपण किती विधायक आणि उत्पादनक्षम कष्ट केले, याची जाणीव त्यांना राहत नाही. या व्यक्ती स्वतःवरच दोषदर्शी बनून जातात आणि इतरानांही जगू देत नाहीत.(क्रमशः)
- डॉ. शुभांगी पारकर