JEE Main 2021 परीक्षा लांबणीवर

18 Apr 2021 13:38:04

JEE _1  H x W:



नवी दिल्ली : कोरोना महामारीचा वाढता प्रकोप लक्षात घेता नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे जेईई मेन ही एप्रिल २०२१ सत्राची परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. नियोजित वेळापत्रकानुसार, जेईई मेन २०२१ एप्रिल सत्राची परीक्षा २७ ते ३० एप्रिल २०२१ या काळात होणार होती. जेईई मेन परीक्षेची नवी लवकरच जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी दिली. JEE Main 2021 April Postponed
 
 
विद्यार्थ्यांनी केली होती परीक्षा स्थगितीची मागणी
 
भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाला आहे. सलग चौथ्या दिवशी दोन लाखांहून जास्त कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. पहिल्या लाटेतही देशात इतके रुग्ण सापडले नव्हते. गेल्या २४ तासांत भारतात तब्बल २ लाख ६१ हजार ५०० नव्या रुग्णांची नोंद झाली. दिवसभरात १ लाख ३८ हजार ४२३ जण आढळले. शनिवारी दि. १७ एप्रिल रोजी १ हजार ५०१ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. हा आकडा सर्वाधिक आहे.
 
 
कोरोना विषाणू संसर्गामुळे सीबीएसईच्या बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. बारावीच्या परीक्षा लांबणीवर ढकलल्या आहेत. देशातील इतर बोर्डांच्या परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. जेईई मेन एप्रिल सत्राची परीक्षा २७ एप्रिल ते ३० एप्रिल दरम्यान होणारी परीक्षा लांबणीवर टाकावी, अशी मागणी विद्यार्थी करत होते. जेईई मेनच्या विद्यार्थ्यांतर्फे  #POSTPONEJEEMains2021 हा हॅशटॅग ट्रेंड करण्यात आला होता. त्यानुसार, त्यांना दिलासा देण्यात आला आहे.
 
 
प्रवेशपत्र मिळणार का ?
 
नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA)कडून जेईई मेन परीक्षा एप्रिल सत्राचे ओळखपत्र मिळणार का, असे प्रश्न अनेकांना पडले आहेत. जेईई मेन एप्रिल सत्रात फक्त एका पेपरचे आयोजन केले जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना बीई / बीटेक अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा आहे. ते अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा जेईई मेन पेपर १ ची परीक्षा देतील.
 
 
'नीट' आणि 'पीजी' परीक्षा लांबणीवर
 
वाढत्या कोरोना विषाणू संसर्गामुळे १८ एप्रिलला होणारी NEET PG परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आली होता. त्यामुळे जेईई मेन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी देखील परीक्षा लांबणीवर टाकण्याची मागणी केली.
 
 
नेट परीक्षा लांबणीवर पडणार का ?
 
नॅशनल ईलिजिबिलिटी टेस्ट म्हणजेच राष्ट्रीय पात्रता परीक्षाही इतर परीक्षांप्रमाणे पुढे ढकला, अशी मागणी विद्यार्थी करत आहेत. ही परीक्षा २ मे ते १७ मे दरम्यान होणार आहे. दरवर्षी नॅशनल टेस्टिंग एजन्सी ( एनटीए ) मार्फत सहायक प्राध्यापक पदासाठी परीक्षा घेतली जाते. मात्र, देशातला आणि राज्यातला वाढता कोरोनाचा संसर्ग पाहता परीक्षा पुढे ढकलण्याची विद्यार्थ्यांची मागणी आहे.
Powered By Sangraha 9.0