"'तो' पवारांचा चमचा असल्यानं कुणी काही बोलत नाही!"

18 Apr 2021 19:05:37

news 12 _1  H x





बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि अजित पवार यांच्या बारामती मतदार संघात माणूसकीलाही लाजवेल, असा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा भासत आहे.
 
 
मात्र, स्वतःला पवारांचा खंदा समर्थक मानणाऱ्या एका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने रिकाम्या बाटलीत पॅरासिटमॉल हे औषध भरून त्याला रेमडेसिवीर इंजेक्शन म्हणून विकले असल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी उघडकीस आला आहे. देशात तुटवडा असलेल्या या औषधाचे बनावट इंजेक्शन तयार करून तो ३५ हजार रुपये प्रति इंजेक्शन, अशा दराने विकत होता. मात्र, राज्यात सुरू असलेल्या रेमडेसिवीर प्रकरणात कुणी राष्ट्रवादीच्या या कार्यकर्त्याबद्दल का बोलत नाहीत, असा प्रश्न लेखिका व स्तंभलेखक शेफाली वैद्य यांनी विचारला आहे.
 
 
चिंताग्रस्त रुग्णांचे नातेवाईक एका इंजेक्शनसाठी इथून तिथून धावपळ करत आहे. मागेल ती किंमत द्यायला रुग्णांचे नातेवाईक तयार आहेत. मात्र इंजेक्शनच शिल्लक नसल्याने मोठे संकट आहे. अशा बिकट परिस्थितीतही काहींना पैसे कमावणे महत्वाचं वाटत आहे. त्यातून बारामतीत बनावट रेमडेसिवीर इंजेक्शन बनवणाऱ्या टोळीचा पोलिसांना पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांना चार आरोपींना अटक केली आहे.
 
 
बनावट रेमडेसिवीर इंजेक्शन बनवून विकणाऱ्या टोळीचा बारामती पोलिसांनी पर्दाफाश केला. रेमडेसिवीरच्या रिकाम्या बाटलीत पॅरासिटेमॉलचे औषध भरून हे आरोपी दिलीप गायकवाड, संदीप गायकवाड, प्रशांत घरत, शंकर भिसे हे रेमडेसिवीर इंजेक्शन म्हणून विक्री करत होते. यापैकी दिलीप गायकवाड हा पवार घराण्याशी थेट संबंध असलेला कार्यकर्ता मानला जातो. त्यामुळेच की काय त्याबद्दल कुणी एक शब्दही बोलत नाहीत, असा प्रश्न शेफाली वैद्य यांनी विचारला आहे.
 
 
 
बनावट इंजेक्शन हे प्रत्येकी ३५ हजार रुपयांना विकले जात होते. एका रुग्णाला रेमडेसिवीर इंजेक्शनाची गरज होती. म्हणून रुग्णाच्या नातेवाईकाने पोलिसांच्या मदतीने टोळीतील एकाशी संपर्क साधला. त्याने ३५ हजाराला एक अशी मिळून ७० हजाराची दोन इंजेक्शन विकणार असल्याचा सौदा ठरला. बारामती तालुका पोलीसांनी या दोन्ही आरोपींना त्यावेळी अटक केली. त्यांच्या चौकशीत अन्य दोन साथीदारांचाही पत्ता लागला.
 
 
 
गुन्ह्यात वापरलेली फॉर्च्युनर वाहनही पोलिसांनी जप्त केले आहे. संदीप गायकवाड हॉस्पिटलमध्ये वॉर्ड बॉय म्हणून काम करत होता. तो रेमडेसिवीरच्या रिकाम्या बाटल्यात बनावट इंजेक्शन भरून ते दिलीप गायकवाडला देत व त्याची विक्री शंकर भिसे आणि प्रशांत घरत करायचा. यातील मुख्य आरोपी दिलीप गायकवाड आहे. दिलीप गायकवाड आणि प्रशांत घरत हे या औषधाची विक्री करत होते. आरोपीकडील तीन बनावट रेमडेसिवीर इंजेक्शन जप्त केले आहेत. गुन्ह्यात आणखी कुणाचे संबंध आहेत का याबद्दल तपास पोलीस करत आहेत.
 
 
 
सगळे चीडीचूप ?
 
गुजरातच्या फार्मा कंपनीतून राज्याला रेमडेसिवीरचा साठा उपलब्ध व्हावा यासाठी राज्यातील भाजप नेत्यांनी केंद्राकडे पाठपुरावा केला होता. राज्य सरकारमधील मंत्री त्यावरून आकांड तांडव करत आहेत. पोलीसांनी ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकांना शनिवारी रात्री उशीरा ताब्यात घेतले होते. त्यांची चौकशी करून सोडून देण्यात आली. यावेळी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी पोलीस ठाण्यात जाऊन अधिकाऱ्यांना धारेवर धरले.


राज्याला मदत करणाऱ्यांची चौकशी कसली करता, हे महाराष्ट्राला शोभणारे नाही, असा समाचार अधिकाऱ्यांचा घेतला. मात्र, फडणवीसांनी थेट साठा गुजरातहून कसा मागविला, राज्य सरकारला विश्वासात का घेतले नाही, असा प्रश्न नवाब मलिक यांनी विचारला आहे. दरम्यान, ब्रुक फार्मा कंपनीचे मालक राजेश डोकानिया हे स्वत: अन्न आणि औषध मंत्री राजेंद्र शिंगणे आणि विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांना भेटले होते. मगत त्यांनी साठा पाठवला होता, असा दावा भाजपने केला आहे.




Powered By Sangraha 9.0