सत्तेसाठी सेनेच्या हिंदुत्वाची धार कमी झाली : दरेकर

    दिनांक  16-Apr-2021 18:36:57
|

darekar _1  H xमुंबई : पालघर साधू हत्याकांडानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली होती. गतीने तपास पूर्ण करुन दोषींना शिक्षेपर्यंत पोहोचवण्याबाबत आवश्यक ती पाऊले महाविकास आघाडी सरकारने न उचलल्यामुळे, आज एक वर्ष पूर्ण झाले तरी त्यांना न्याय मिळू शकला नाही.
 
 
हिंदुत्वाच्या विचारांचा विसर पडल्यामुळे केवळ ‘सत्ते’साठी या प्रकरणांकडे सरकार दुर्लक्ष करत आहे, सत्तेसाठी शिवसेनेच्या हिंदुत्वाची धार कमी झाली असावी, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली. पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील गडचिंचले गावातील जमावाने दोन साधू व त्यांच्या वाहन चालकाची निर्घृण हत्या केली होती. या हत्याकांडाला आज एक वर्ष पूर्ण झाले. या निमित्ताने भाजपकडून आंदोलन करण्यात आले. त्यावेळी दरेकर माध्यमांशी बोलत होते.
 
सरकार या प्रकरणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्यामुळे, मी या सरकारचा जाहीर निषेध करतो. हिंदुत्वाच्या आचार-विचारांची कास धरत हिंदुत्वाचे तेजस्वी रुप हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी झळाळते ठेवले होते. त्यांनी हिंदुत्वासाठी ‘मशाल’ पेटवली होती. आज सत्तेवर त्यांचेच सुपुत्र उद्धव ठाकरे असताना ही मशाल विझली असून, त्याचा धूर होताना दिसत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या विचारांची कास धरत उद्धव ठाकरे यांनी या हत्याकांडावरील आपलं मौन सोडावं व सरकारचे प्रमुख म्हणून भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी दरेकर यांनी केली आहे.
 
 
सरकारचा निषेध करताना दरेकर म्हणाले, या प्रकरणी सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी आज मी, आचार्य तुषार भोसले यांच्यासह विधानभवन जवळील महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर लाक्षणिक उपोषण केले. या प्रकरणाची सरकारला आठवण करुन देण्यासाठी आणि सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले आहे. एव्हढेच नाही तर आम्ही दुर्घटनास्थळी जाऊन हत्या झालेल्या साधू-महंतांना श्रद्धांजली देखील वाहणार आहोत.
 
 
वेगवेगळ्या माध्यमातून जनता सरकारला जागं करण्याचा प्रयत्न करत आहे. आता तरी सरकारने जागं व्हावं, अशी अपेक्षाही दरेकर यांनी व्यक्त केली. राज्यात साधू-संतांसाठी, हिंदुत्वासाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी भाजप, महाराष्ट्रप्रेमी कार्यकर्ते, हिंदुत्वप्रेमी कार्यकर्ते लढत राहतील, जोपर्यंत या हत्याकांडातील दोषींवर कारवाई होत नाही, तोपर्यंत आम्ही सरकारला जाब विचारत राहू, असंही दरेकर यांनी सांगितले.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.