कुणी रेमडेसिवीर देता का...रेमडेसिवीर!

    दिनांक  16-Apr-2021 14:57:03
|

niranjan_1  H x


ठाणे :
राज्यभरासह मुंबई व उपनगरातही कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. याचा ताण आता स्थानिक आरोग्य यंत्रणांवर येतो आहे. अशातच कोरोनाच्या गंभीर रुग्णांसाठी वापरण्यात येणाऱ्या रेमडेसिवीर या औषधाचा तुटवडा राज्यभरात जाणवतोय. यावरूनच कुणी रेमडेसिवीर देता का रेमडेसिवीर! असे म्हणत ठाण्यातील कोविड रुग्णांच्या नातेवाईकांच्या होत असलेल्या गैरसोयींमुळे भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी ठाण्याचे जिल्हाधिकारी राहुल नार्वेकर यांना पत्र लिहीत ठाणे‌ ‌शहरासह‌ ‌जिल्ह्यातील‌ ‌गरजू‌ ‌रुग्णांना‌ ‌रेमडेसिवीर‌ ‌इंजेक्शन‌ ‌पुरविण्यासाठी‌ ‌योग्य‌ ‌यंत्रणा‌ ‌निर्माण‌ ‌करावी अशी मागणी केली आहे.

या पत्रात डावखरे म्हणतात,‌ कोविडच्या‌ ‌दुसऱ्या‌ ‌लाटेत‌ ‌ठाणे‌ ‌महापालिका‌ ‌क्षेत्रासह‌ ‌ठाणे‌ ‌जिल्ह्यात‌ ‌मोठ्या‌ ‌प्रमाणावर‌ ‌रुग्ण‌ ‌आढळत‌ ‌आहेत.‌ ‌या‌ ‌रुग्णांवर‌ ‌उपचारासाठी‌ ‌रेमडेसिवीर‌ ‌इंजेक्शन‌ ‌आवश्यक‌ ‌आहेत.‌ ‌राज्य‌ ‌सरकारने‌ ‌रेमडेसिवीर‌ ‌इंजेक्शन‌ ‌वितरणाची‌ ‌व्यवस्था‌ ‌आपल्या‌ ‌हाती‌ ‌घेतली‌ ‌आहे.‌ ‌मात्र,‌ ‌जिल्हा‌ ‌प्रशासनाने‌ ‌सुरू‌ ‌केलेल्या‌ ‌हेल्पलाईनवर‌ ‌रेमेडेसिवीर‌ ‌कोठे‌ ‌उपलब्ध‌ ‌आहेत,‌ ‌याचीही‌ ‌माहिती‌ ‌दिली‌ ‌जात‌ ‌नाही.‌ ‌राज्य‌ ‌सरकारकडे‌ ‌रेमडेसिवीरचा‌ ‌साठा‌ ‌असून,‌ ‌तो‌ ‌खासगी‌ ‌रुग्णालयांना‌ ‌गरजेनुसार‌ ‌वितरीत‌ ‌करणार‌ ‌असल्याचे‌ ‌सांगण्यात‌ ‌आले.‌ ‌मात्र,‌ ‌खासगी‌ ‌रुग्णालयांकडून‌ ‌थेट‌ ‌रुग्णांच्या‌ ‌नातेवाईकांना‌ ‌रेमडेसिवीर‌ ‌इंजेक्शन‌ ‌आणून‌ ‌देण्याचे‌ ‌फर्मान‌ ‌काढले‌ ‌जाते.‌‌जिल्ह्यातील‌ ‌कोणत्याही‌ ‌मेडिकल‌ ‌स्टोअर्समध्ये‌ ‌रेमडेसिवीरचा‌ ‌साठा‌ ‌नाही.‌ ‌मेडिकल‌ ‌स्टोअर्स‌ ‌चालकांकडून‌ ‌संबंधित‌ ‌इंजेक्शनचा‌ ‌साठा‌ ‌राज्य‌ ‌सरकारने‌ ‌ताब्यात‌ ‌घेतला‌ ‌असल्याचे‌ ‌सांगण्यात‌ ‌येत‌ ‌आहे.‌ ‌त्यामुळे‌ ‌'कुणी‌ रेमडेसिवीर‌ ‌देता‌ ‌का...‌ ‌रेमडेसिवीर...'‌ ‌असे‌ ‌म्हणण्याची‌ ‌दुर्दैवी‌ ‌परिस्थिती‌ ‌रुग्णांच्या‌ ‌नातेवाईकांवर‌ ‌आली‌ ‌आहे.‌ ‌ठाण्याबरोबरच‌ ‌मुंबईतील‌ ‌विविध‌ ‌भागातील‌ ‌मेडिकल‌ ‌स्टोअर्समध्ये‌ ‌नातेवाईक‌ ‌फेऱ्या‌ ‌मारत‌ ‌आहेत.‌ ‌त्यात‌ ‌त्यांची‌ ‌फरपट‌ ‌होत‌ ‌आहे.‌ ‌या‌ ‌पार्श्वभूमीवर‌ ‌ठाणे‌ ‌शहरासह‌ ‌जिल्ह्यातील‌ ‌गरजू‌ ‌रुग्णांना‌ ‌रेमडेसिवीर‌ ‌इंजेक्शन‌ ‌पुरविण्यासाठी‌ ‌योग्य‌ ‌यंत्रणा‌ ‌निर्माण‌ ‌करावी.‌ ‌या‌ ‌संदर्भात‌ ‌लवकरात‌ ‌ लवकर‌ ‌कार्यवाही‌ ‌करावी अशी विनंतीही डावखरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.