धक्कादायक ! नाशिकात चक्कर येऊन एका दिवसात ९ जणांचा मृत्यू

16 Apr 2021 18:01:05

Nashik_1  H x W
 
नाशिक : नाशिक शहरातील तापमानात वृद्धी झाल्याने कडक उन्हाळा जाणवत. तर दुसरीकडे कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत आहे. त्यातच चक्कर येऊन पडल्याने नाशिक शहरात दिवसभरामध्ये ९ जणांचा मृत्यू झाला. तर दोन दिवसापूर्वी अशीच घटना घडून चार जण दगावले होते. नाशिक शहरात दोन- तीन दिवसात १३ जण दगावल्याची धक्कादायक घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
 
 
सदर व्यक्तींचे मृत्यू हे उष्माघाताने झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. अचानक चक्कर येऊन बेशुद्ध पडल्याने मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींचा आकडा गेल्या तीन दिवसात १३ वर पोहोचला आहे. विशेष म्हणजे मृतांमध्ये तरुणांचाही समावेश आहे. याआधी कोणाचा रस्त्याने पायी जाताना मृत्यू झाला होता, तर कोणाला राहत्या घरीच चक्कर आली होती.
 
 
गेल्या काही दिवसांत उष्णतेचा पारा चांगलाच वाढला आहे. नाशिक शहराचे तापमान वाढून ४० अंशांच्या पार पोहोचले आहे. त्यामुळे उष्माघाताचा त्रास होऊन मृत्यू झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. वाढत्या उन्हामुळे चक्कर येऊन मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज याआधीही वर्तवण्यात आला होता. परंतु मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
 
 
आधीच कोरोनाच्या वाढत्या प्रकारामुळे नाशिकमध्ये मृत्यूचा आकडा वाढत असताना आता या नव्या प्रकारामुळे वैद्यकीय क्षेत्रातही आश्चर्य व्यक्त केले जात आहे. चक्कर येणे, मळमळ होणे यांसारख्या कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, असा सल्ला नाशिक शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांनी नागरिकांना दिला आहे. संचारबंदीच्या काळात नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडण्यास मनाई आहे. त्यामुळे अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडतानाही काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.
 
 
दरम्यान, गेल्या आठवड्यात चौघांचा मृत्यू हा चक्कर येऊन पडल्याने झाला होता. इंदिरानगर, उपनगर, श्रमिकनगर आणि देवळाली गावात या घटना घडल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा शहरात चक्कर येऊन तसेच चालताना श्वासाचा त्रास होऊन शनिवारी दिवसभरात सुमारे नऊ जणांचा मृत्यू झाला.
 
 
अशा प्रकारे या घटनेत मृत पावलेल्या व्यक्तींमध्ये आकाश टायटस निकाळजे (वय २७, राहणार नाशिकरोड रोकडोबावाडी परिसर), लक्ष्मण तुकाराम जोरे (वय ६४, रा.शक्तीनगर, हिरावाडी), राजू जेठालाल राठोड (वय ५६, रा. सातपूर, कार्बन नाका परिसर, आयटीआय नजिक), बायजाबाई दगडू पवार (वय ८०, रा. संदीपनगर, अशोकनगर), यशवंत दत्तात्रय कुलकर्णी (वय ७८, रा. नंदनवन लॉन्स, कलानगर, इंदिरानगर), सुमन रामचंद्र सपकाळ (वय ७२, रा. पवननगर) आदींचा समावेश आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0