संकटसमयी आखाड्यांची लवचिकता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Apr-2021
Total Views |

agralekh_1  H x
 
 
 
हिंदू धर्माचे वैशिष्ट्य, सौंदर्य किंवा बलस्थान परिवर्तनातील शाश्वतता हेच आहे, त्यातूनच आखाड्यांना कुंभमेळा लवकर संपवण्याची प्रेरणा मिळाली. हिंदू धर्म परिदृढ नाही, तर लवचिक आहे. पण, कुंभमेळ्यातील गर्दी दाखवणार्‍या, त्यावर टीका करणार्‍यांची ते समजून घेण्याची कुवत नाही, कारण त्यांचा विश्वास ‘अपरिवर्तनीय’ पंथ-संप्रदायांवरच अधिक आहे.
 
 
 
कोरोनाच्या वाढत्या प्रसारापासून हरिद्वार आणि उत्तराखंडचे संरक्षण करण्यासाठी तसेच सरकारने जारी केलेल्या दिशा-निर्देशांचे सुरळीत पालन होण्यासाठी आनंद आखाड्यासह निरंजनी आखाड्याने पुढाकार घेत यंदाचा कुंभमेळा वेळेआधी म्हणजेच शनिवार, दि. १७ एप्रिल रोजी समाप्त करण्याची घोषणा केली. तत्पूर्वी, हरिद्वारमधील लाखो भाविक-भक्त व साधू-संतांच्या उपस्थितीत होणार्‍या जगातील सर्वात मोठा धार्मिक महोत्सव अर्थात, कुंभमेळ्यावर तथाकथित पुरोगामी, धर्मनिरपेक्ष, उदारमतवाद्यांसह हिंदू असूनही स्वधर्माच्या वैशिष्ट्य, सौंदर्य आणि बलस्थानापासून अनभिज्ञ असलेल्यांनी टीका केली होती. त्यात, देश-विदेशातील डाव्या मुद्रित, दूरचित्रवाणी आणि वेब माध्यमांपासून पत्रकार, संपादकांसह शिवसेना, शिवसेनेचे वाचाळ प्रवक्ते संजय राऊत, सीएट टायर्सचे अध्यक्ष हर्ष गोयंका, अभिनेत्री सिमी गरेवाल, स्वरा भास्कर, चित्रपट निर्माता रामगोपाल वर्मा आदींचा समावेश होतो. त्यातल्या सर्वांनीच कुंभमेळ्याची तुलना गेल्या वर्षीच्या दिल्लीतील निजामुद्दीन मरकजमधील तबलिगी जमातीच्या कार्यक्रमाशी केली होती. आता मात्र, हरिद्वारमधील कुंभमेळ्यासाठी आलेल्या आखाड्यांनीच कोरोना आपत्तीचे गांभीर्य ओळखून ३० एप्रिलला नव्हे, तर त्याआधीच उत्सवसमाप्ती जाहीर केली आणि हिंदूंच्या बदनामीची सुपारी घेतलेल्यांना जोरदार झटका बसला. कारण, आखाड्यांनी आपल्या निर्णयातून टीकाकारांना अपेक्षित नसलेल्या; पण हिंदू धर्माच्या परिस्थितीनुरूप लवचिकतेचा प्रत्यय करून दिला व विरोधकांना विरोधाची संधी ठेवली नाही. दरम्यान, कुंभमेळ्याची तबलिगी जमातीच्या कार्यक्रमाशी केलेली तुलना जशी चुकीची, अयोग्य होती, तशीच हिंदू धर्माचा पुरेसा अभ्यास नसलेल्यांच्या अज्ञानाची पातळी दाखवणारीही होती.
 
 
 
वस्तुतः कोणत्याही दोन घटकांची तुलना करण्याची वेळ आलीच तर ते समान असावेत, विषमांची तुलना होऊ शकत नाही, असा अनिवार्य नियम असतो. ते घटक दोन किंवा त्यापेक्षा अधिक शालेय विद्यार्थ्यांपासून समाज, पंथ, संप्रदाय, धर्म आणि राज्य वा देशही असू शकतात. पण, वरील नियम पाहता, मरकजमधील तबलिगी जमातवाले व कुंभमेळ्यातील उपस्थित आखाडे, सर्वसामान्य माणसांची तुलना कदापि, होऊ शकत नाही. कारण, गेल्यावर्षी कोरोनाचे संकट अगदी नवे असताना दिल्लीत तबलिगी जमातीचा धार्मिक कार्यक्रम झाला आणि त्यात हजारो देशी-विदेशी इस्लामानुयायांनी भाग घेतला. तथापि, नंतरच्या काळात तबलिगी जमातीच्या कार्यक्रमातून कोरोनाप्रसार होत असल्याचे उघडकीस आले आणि त्याला रोखण्यासाठी सर्वप्रकारची प्रशासकीय व्यवस्था कामाला लागली. पण, तबलिगी जमातवाल्यांनी परिचारिका, डॉक्टर्स, पोलिसांना सहकार्य करण्याचे नाकारले व धुमाकूळ घातला. कोरोनावहनाचे कार्य केले. कुंभमेळ्यात मात्र तसे काही झाले नाही, तर त्याच्या आयोजनाआधीच उत्तराखंड सरकारने ‘स्टॅण्डर्ड ऑपरेटिंग सिस्टीम’-(एसओपी) जारी केली व त्याप्रमाणे पुढील कार्यक्रम पार पडत गेले. कुंभमेळ्यात येणार्‍यांना कोरोना ‘निगेटिव्ह’ रिपोर्ट अत्यावश्यक करण्यात आला, तसेच ‘सोशल डिस्टन्सिंग’ व मास्क परिधान करायला सांगितले. राज्याच्या सर्व प्रवेशस्थळी कोरोना चाचणी केंद्रे सुरू केली. हरिद्वार रेल्वे स्थानकावर येणार्‍या प्रत्येकाला ‘आरटीपीसीआर’ चाचणीचा ‘निगेटिव्ह’ रिपोर्ट दाखवणे वा आरोग्य विभागाद्वारे अनिवार्य ‘आरटीपीसीआर’ चाचणी बंधनकारक केले. हरिद्वारमध्ये प्रत्येक ठिकाणी सॅनिटायझर डिस्पेन्सर लावण्यात आले. जॉली ग्रॅण्ट विमानतळावर कोरोना चाचणी सुविधा उपलब्ध करण्यात आली. त्याचे पालनही येणार्‍या प्रवाशांनी केले. त्यांनी ना तबलिगी जमातवाल्यांसारखे इथे-तिथे थुंकण्याचे, ना कुठेही मलमूत्र विसर्जनाचे विकृत प्रकार केले, ना वैद्यकीय कर्मचार्‍यांवर-पोलिसांवर हल्ला केला, ना स्त्री कर्मचार्‍यांशी अश्लील व्यवहार केला, ना धर्म-संप्रदायाच्या आधारावर अफवा पसरवल्या, ना ते सरकारला घाबरून मशिदीत लपून बसले, ना प्रशासकीय अधिकारी आपल्याला ट्रेस करतील व आपल्याद्वारे होणारा कोरोनाप्रसार थांबवतील म्हणून मोबाईल बंद ठेवले. आता उल्लेख केलेला प्रत्येक उद्योग निजामुद्दीन मरकजमध्ये सामील झालेल्या तबलिगी जमातवाल्यांनी केला होता. तरीही हिंदूंवर खार खाणार्‍यांनी कुंभमेळ्यातील भाविक-भक्त, साधू-संतांची तुलना जमातवाल्यांशी केली, कारण त्यांना तथ्यांशी नव्हे तर हिंदूविरोधाशीच घेणे-देणे आहे.
 
 
 
दरम्यान, नियोजित तिथीच्या १५ दिवस आधीच कुंभमेळ्याच्या समाप्तीची घोषणा करण्याची प्रेरणा आखाड्यांना कुठून मिळाली? तर हरिद्वार व उत्तराखंडमध्ये कोरोनाचा फैलाव होत आहे ही वस्तुस्थिती आहेच; पण हिंदू धर्म परिदृढ नाही तर लवचिक आहे. इथे हजार-दीड हजार वर्षांपूर्वी कोणीतरी काहीतरी सांगितले म्हणून त्यावरच अडून बसण्याचा विचित्रपणा केला जात नाही. उलट वेळोवेळी आवश्यकतेनुरूप धर्मातील प्रथा, परंपरा, सण, उत्सवांच्या स्वरूपात परिवर्तन होण्याचाच इतिहास आहे. त्यात सती, केशवपन, विधवांचा विवाह न करणे, यासारख्या सामाजिक कुरीतींचा समावेश होतो, तसाच आताच्या कोरोनासाथीच्या पृष्ठभूमीवर वेळेआधीच कुंभमेळ्याच्या समापनाचाही होतो. हिंदू धर्माचे वैशिष्ट्य, सौंदर्य किंवा बलस्थान परिवर्तनातील शाश्वतता हेच आहे, त्यातूनच आखाड्यांना कुंभमेळा लवकर संपवण्याची प्रेरणा मिळाली. सध्या निरंजनी व आनंद आखाड्यांनी त्याची घोषणा केली व आता उर्वरित पाच संन्यासी आखाडेही तसे जाहीर करू शकतात. त्यानंतर २७ एप्रिलला तीन बैरागी, दोन उदासीन आणि एका निर्मल आखाड्यातील केवळ ४०-५० जणांच्या उपस्थितीत सांकेतिक शाहीस्नान होईल, इतरांना मनाई असेल. पण, कुंभमेळ्यातील गर्दी दाखवणार्‍या, त्यावर टीका करणार्‍यांची ते समजून घेण्याची कुवत नाही, कारण त्यांचा विश्वास ‘अपरिवर्तनीय’ पंथ-संप्रदायांवरच अधिक आहे. दुर्दैव म्हणजे, ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी शिवसेनाही आता त्यांच्याच टोळक्यात गेली असून, कुंभमेळ्याला ‘कोरोनाबॉम्ब’ म्हणताना दिसते. पण, त्याच हिंदूविरोधी शिवसेनेला, शिवसेना प्रवक्त्यांना, शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांना, महाविकास आघाडी सरकारला महाराष्ट्रातील कोरोनावाढ रोखता आली नाही. कारण, त्यांचे लक्ष स्कॉर्पिओतील जिलेटिनच्या कांड्यांकडे होते, विषाणूप्रसारावर लगाम लावण्याकडे नव्हे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@