गोलंदाजांचेही ‘अच्छे दिन’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Apr-2021
Total Views |

Kapil Dev_1  H
 
 
 
भारत हा क्रिकेटवेडा देश म्हणून ओळखला जातो. या देशातील अनेक खेळाडूंनी क्रिकेटच्या जगतात वेगवेगळ्या विश्वविक्रमांची नोंद आपल्या नावावर करून ठेवली आहे. त्यामुळेच क्रिकेटविश्वात भारताने आपले एक वेगळे अस्तित्व निर्माण केले. फलंदाजी हे भारतीय क्रिकेटचे मुख्य अस्त्र मानले जाते. या भक्कम फलंदाजीच्या जोरावरच भारताने आतापर्यंत अनेक सामने आपल्या नावावर करून घेण्यात यश मिळवले. भारतीय खेळपट्ट्या या फलंदाजांसाठी पोषक असल्याचे मानले जाते. फलंदाजीसाठी पोषक खेळपट्टी म्हणजे गोलंदाजांसाठी मात्र हा कठीण धडाच! त्यामुळे भारतीय गोलंदाजी ही फलंदाजांप्रमाणे म्हणावी तशी भक्कम झाली नाही. काही गुणवान आणि नामवंत गोलंदाजांचा अपवाद सोडल्यास गोलंदाजीही भारताचा एक कच्चा दुवाच राहिली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. गोलंदाजीचा हाच कमकुवत धागा पकडत भारताचे माजी कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू कपिल देव यांनी अलीकडेच एक महत्त्वाचे विधान केले. “भारतीय गोलंदाजीही आता पूर्वीसारखी राहिली नाही. भारताकडेही आता अनेक गुणवान गोलंदाज आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये भारताला अनेक दर्जेदार वेगवान गोलंदाज गवसल्याने आपली दुसरी फळीसुद्धा सक्षम झाली आहे,” असे म्हणत कपिल देव यांनी सध्या गोलंदाजांचेही ‘अच्छे दिन’ आल्याचा मुद्दा अधोरेखित केला. कपिल देव यांच्या म्हणण्याला काही क्रिकेट समीक्षकांनीही साथ दिली आहे. समीक्षकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही वर्षांपूर्वी भारत भक्कम फलंदाजीच्या आधारावर एकदिवसीय सामन्यांमध्ये ३००हून अधिक धावांचा डोंगर उभारत प्रतिस्पर्धी संघासमोर मोठे आव्हान देत असे. मात्र, गोलंदाजांच्या निष्प्रभ मार्‍यामुळे कमकुवत प्रतिस्पर्धी संघदेखील हे आव्हान सहज पेलत असल्याचे अनेक सामन्यांमध्ये दिसून येत असे. मात्र, अलीकडच्या काळात ही परिस्थिती सुधारण्यात भारताला यश आले आहे. अनुभवी गोलंदाज जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार यांच्यासह नवखे वेगवान आणि अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखले जाणारे हार्दिक पांड्या, शार्दुल ठाकूर, विजय शंकर आदींची दुसरी फळीसुद्धा सक्षम झाली आहे. यासोबतच फिरकी गोलंदाजीसाठीही विविध पर्याय भारतासमोर उपलब्ध झाले असल्याने भारतीय गोलंदाजीचे ‘अच्छे दिन’ आल्याचा मुद्दा योग्य असल्याचे समीक्षकांचे म्हणणे आहे.
 
 

मग ‘बुरे दिन’ कोणते?

 
 
सध्याच्या काळात भारताला अनेक दर्जेदार वेगवान गोलंदाज गवसल्याने आपली गोलंदाजी मजबूत झाल्याचा मुद्दा अधोरेखित करण्यात आल्यानंतर यावरून क्रिकेट विश्वात सध्या मतमंतातरे सुरू असल्याचे चित्र आहे. सध्याच्या काळात गोलंदाजी मजबूत आहे म्हणजे आधीच्या काळात ती कमकुवत होती का, असाही सवाल काही जागतिक दर्जाच्या क्रिकेट समीक्षकांकडून उपस्थित करण्यात आला. गोलंदाजी मजबूत नसती तर भारताला दोन ‘विश्वचषक’, एक ‘टी-२० विश्वचषक’, ‘चॅम्पियन्स ट्रॉफी’ आणि इतर महत्त्वाच्या मालिकांचे जेतेपद मिळविणे अशक्य होते, असेही मत काही क्रिकेट समीक्षकांनी मांडले आहे. ज्या कपिल देव यांनी कर्णधारपदी असताना १९८३च्या ‘विश्वचषका’वर नाव कोरले, त्या वेळीच्या भारतीय संघानेही गोलंदाजीच्या जोरावरच अंतिम सामन्यात विजय मिळविला होता. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने अवघ्या १८३ धावांचेच आव्हान प्रतिस्पर्धी संघाला दिले होते. मात्र, गोलंदाजांनीच भेदक मारा केल्यामुळे भारतीय संघाला विजय साकारता आल्याचा इतिहास आहे. त्यामुळे अलीकडच्या काळात गोलंदाजी मजबूत झाली असून, आधीच्या काळात ती इतकी प्रभावी नसल्याचे म्हणणे चुकीचे असल्याचा मुद्दा काही समीक्षकांनी अधोरेखित केला. फलंदाजीच्या जोरावर भारताने अनेक सामने जरी जिंकले असले, तरी काही सामने तरी भारताने भेदक गोलंदाजीच्या आधारावर नक्कीच जिंकल्याचा इतिहास आहे. त्यामुळे गोलंदाजांना निराश करणे हे चुकीचे आहे. भारतात अनेक गोलंदाजांनीही आपल्या नावावर विक्रमांची नोंद केली आहे. असे काही विक्रम गोलंदाजांनीही नोंदवून ठेवले आहेत, जे आजपर्यंत कोणालाही मोडता आलेले नाहीत. भारताचा माजी कर्णधार आणि प्रसिद्ध फिरकीपटू अनिल कुंबळे याने एका डावात प्रतिस्पर्धी संघाचे सर्व दहा फलंदाजांना माघारी धाडण्याचा विक्रम पाकिस्तानविरुद्ध खेळताना रचला आहे. क्रिकेटच्या जगतात आजवर कोणीही हा विक्रम मोडू शकलेला नाही. या विक्रमाची नोंद कुंबळेच्याच नावावर आहे. कुंबळेप्रमाणेच अनेक गोलंदाजांनीही हॅट्ट्रिकही नोंदवली असून, आपल्या गोलंदाजीच्या जोरावर भारताला विजय मिळवून दिल्याचा इतिहास आहे. त्यामुळे आधीच्या काळात गोलंदाजी ही कमकुवत आणि अलीकडच्या काळात प्रभावी असणे म्हणणे हे चुकीचे असल्याचे मत अनेक क्रिकेट समीक्षक नोंदवतात. पूर्वीच्या आणि अलीकडच्या अशा दोन्हीकडच्या काळात गोलंदाजी ही सक्षमच होती तर मग ‘बुरे दिन’ कोणते? हा प्रश्न अनुत्तरितच राहतो.
 
 
- रामचंद्र नाईक
 
 
@@AUTHORINFO_V1@@