मुंबई (प्रतिनिधी) - पवईमधील 'नॅशनल इस्टिट्यूट आॅफ इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग'च्या (एनआयटीआयई) संकुलामध्ये बुधवारी सकाळी बिबट्याचे एक पिल्लू आढळून आले. येथील बंद असलेल्या एका वखारीमध्ये हे पिल्लू आहे. गेल्या दोन दिवसांपासून वन विभागाचे कर्मचारी आणि वन्यजीव अभ्यासक घटनास्थळी असून पिल्लावर नजर ठेवून आहेत.
बोरिवलीच्या 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'च्या हद्दीला लागून पवई 'आयआयटी' आणि 'एनआयटीआई'चे संकुल आहे. या संकुलांच्या परिसरात पूर्वीपासून बिबट्यांचा वावर आहे. यापूर्वी देखील पवईमधील या परिसरातून बिबट्या बचावाच्या घटना घडल्या आहे. मात्र आता या संकुलाच्या परिसरात बिबट्याचे पिल्लू आढळून आले आहे. बुधवारी सकाळी 'एनआयटीआई'च्या एका बंद कोठारामध्ये बिबट्याचे पिल्लू आढळून आले. प्रशासनाने या घटनेची माहिती वन विभागाला कळविल्यानंतर विभागाचे अधिकारी आणि वन्यजीव अभ्यासक याठिकाणी पोहोचले.
बुधवारी दुपारपासून वनाधिकारी आणि वन्यजीव अभ्यासक याठिकाणी तळ ठोकून आहेत. सापडलेले पिल्लू हे साधारण दीड-दोन महिन्यांची असल्याची माहिती मुंबई वनपरिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल संतोष कंक यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'ला दिली. पिल्लाला हात न लावता त्याच्यावर नजर ठेवण्यासाठी त्याठिकाणी कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले आहेत. बुधवारी रात्री मादी बिबट्या पिल्लाजवळ येऊन गेल्याचे कॅमेरा ट्रॅपने टिपलेल्या छायाचित्रामुळे समजले आहे. हा परिसर रिकामी करण्यात आला असून मादी बिबट्या स्वत:हून या परिसरातून पिल्लाला घेऊन जाण्याची वाट आम्ही पाहत असल्याचे कंक यांनी सांगितले.