‘कोरोना’ जगात दीर्घकाळ टिकणार!

    दिनांक  15-Apr-2021 14:44:57
|

who_1  H x W: 0


जिनिव्हा :
“जगभरातील अनेक देशांमध्ये लसीकरण झपाट्याने वाढत असले, तरी कोरोना हा जगात दीर्घकाळ टिकेल,” असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) महासंचालक टेड्रोस डनोम गॅबियिसस यांनी बुधवार, दि. १४ एप्रिल रोजी पहाटे दिला.


आशिया आणि मध्य-पूर्व भागांमधील देशांमध्ये वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावावर त्यांनी चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, “जगात आजघडीला ७८ कोटी लोकांचे लसीकरण झाले असून तरीदेखील कोरोनाचा संसर्ग कमी होत नाही आहे. त्यामुळे कोरोनापासून बचाव करण्यासाठी सातत्याने मास्क घालणे गरजेचे आहे. यासोबतच दोन व्यक्तींमध्ये सामाजिक अंतर राखणेही गरजेचे आहे. या नियमांचे पालन केल्यासच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे शक्य आहे,” असे ते म्हणाले.


त्यांनी पुढे सांगितले की, “कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण सर्वात मजबूत उपाय आहे. परंतु, यासोबतच मास्क, सामाजिक अंतर, स्वच्छता, चाचणी, विलगीकरण हे देखील तेवढेच गरजेचे आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यास जगात पुन्हा एकदा पूर्वीसारखा व्यापार आणि प्रवास पाहायला आवडेल,” असेही ते सांगायला विसरले नाहीत. जगात आतापर्यंत १३.७२ कोटी लोक कोरोना महामारीच्या विळख्यात आले असून यामध्ये २९.५९ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे, तर यातील ११.०४ कोटी लोक बरे झाले आहेत. जगात आजघडीला २.३८ कोटी कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार सुरू आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.