नवी मुंबई : कोविड रूग्णांचे प्राण वाचविण्यासाठी मानवी रक्तातील प्लाझ्मा वरदान ठरत असल्याने ऐरोली विधानसभा क्षेत्राचे प्रथम आमदार संदीप नाईक यांनी बुधवारी कोपरखैरणेतील रूग्णालयात प्लाझ्मा दान करून नवा आदर्श उभा केला.तसेच, इतरांनीही प्लाझ्मा दान करण्यास पुढे येण्याचे आवाहन केले.
राज्यात सध्या कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरते आहे. ऑक्सिजन व व्हेंटीलेटरवरील रूग्णांचा आकडा वाढत असल्याने कोरोनाची चैन तोडण्यासाठी सरकारने ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. गंभीर स्वरूपाच्या कोविड रूग्णांचे प्राण वाचविण्यासाठी मानवी रक्तातील प्लाझ्मा वरदान ठरतो.
ऑक्सीजनवर असणारे तसेच मध्यम आणि तीव्र लक्षणे असणाऱ्या कोरोना रूग्णांच्या जीवासाठी प्लाझ्मा थेरपी प्रभावी ठरत असल्यामुळे राज्यात प्लाझ्माची मागणी वाढली आहे. राज्यात सध्या रक्ताचा आणि प्लाझमाचा तुटवडा जाणवतो आहे. कोरोना मदतकार्यात व्यस्त असताना संदीप नाईक यांनाही कोरोनाने घेरले. काही दिवसांपूर्वी ते कोविडमधून पूर्णपणे बरे झाले. कोरोनावर यषस्वीपणे मात करून बाहेर आलेल्या व्यक्तीच्या शरीरात कोरोनाच्या अँटीबॉडीज तयार होत असतात.
या व्यक्तींचा प्लाझ्मा गंभीर कोरोना रूग्णाला दिल्यास तो बरा होण्याच्या शक्यता वाढतात. माझ्या प्लाझ्मा दानातून एखाद्या कोरोनाबाधिताचे प्राण वाचत असतील तर त्यासारखे मोठे समाधान नाही,अशा भावना संदीप नाईक यांनी प्लाझ्मादानप्रसंगी व्यक्त केल्या.