भारत रशियाचा विश्वासू सहकारी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Apr-2021
Total Views |

Russia_1  H x W
 
 
 
भारत-अमेरिका सहकार्य वृद्धिंगत होत असताना व रशिया भारताशी सौहार्दाचे संबंध राखताना पाकिस्तानच्याही जवळ जात आहे. त्याला कारणे अनेक आहेत आणि गेल्या आठवड्यातील रशियन परराष्ट्रमंत्री सर्जेई लावरोव यांच्या भारत व त्यानंतर लगेच पाकिस्तान दौर्‍याने त्याचा प्रत्ययही आला.
 
 
 
जागतिक राजकारणाचा लोलक सदासर्वदा एकसारखाच असू शकत नाही. कारण, परिवर्तनच शाश्वत असून, त्यानुसार प्रत्येक देशाचा प्राधान्यक्रम बदलत असतो. एकेकाळी शीतयुद्धादरम्यान रशियाच्या कडेवर गेलेला भारत आज मात्र तसा राहिलेला नाही. तीच अवस्था रशियाची असून तो देश आता चीन, पाकिस्तानशी उत्तम सहकार्य करत असल्याचे दिसते. त्या पार्श्वभूमीवर भारतातील रशियन राजदूत निकोलाय कुदाशेव आणि उपप्रमुख रोमन बाबुश्किन यांनी, “भारत रशियाचा विश्वासू सहकारी असून दोन्ही देशांमध्ये काही मतभेद किंवा गैरसमज नाहीत. आपले पाकिस्तानसोबत स्वतंत्र संबंधांच्या आधारे मर्यादित सहकार्य आहे,” असे सांगितले. पण, त्यांच्या या विधानाने हुरळून जाण्याची अजिबात आवश्यकता नाही. दरम्यान, कुदाशेव आणि बाबुश्किन यांच्या वक्तव्यातील भारत रशियाचा विश्वासू सहकारी असल्याचा दावा वास्तवनिदर्शक आहेच; पण त्यापुढील भाग मात्र १०० टक्के तसाच असल्याचे म्हणता येत नाही. कारण, भारत-रशिया संबंध केवळ दोन देशांपुरते मर्यादित नसून, त्यात अमेरिकेचा प्रवेशही अपरिहार्य ठरतो. अमेरिका आणि रशियातील शत्रुत्वाची माहिती अवघ्या जगाला असून, उर्वरित जगातील एखाद्या देशाने दोन्हीपैकी यातल्या एखाद्या देशाशी दृढ संबंध स्थापन केले किंवा त्या दिशेने हालचाली सुरू केल्या तरी एक अस्वस्थ होतो. तसाच प्रकार गेल्या दशकभरापेक्षाही अधिक काळापासून सुरू असून त्यावर प्रतिक्रिया म्हणून दोन्ही देश इतर संधी चाचपडत असतात. त्यानुसार भारत-अमेरिका सहकार्य वृद्धिंगत होत असताना व रशिया भारताशी सौहार्दाचे संबंध राखताना पाकिस्तानच्याही जवळ जात आहे. त्याला कारणे अनेक आहेत आणि गेल्या आठवड्यातील रशियन परराष्ट्रमंत्री सर्जेई लावरोव यांच्या भारत व त्यानंतर लगेच पाकिस्तान दौर्‍याने त्याचा प्रत्ययही आला.
 
 
 
नुकतीच सर्जेई लावरोव यांनी भारताला भेट दिली आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी द्विपक्षीय संबंध, चालू वर्षाच्या अखेरीस रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या भारत दौर्‍याच्या तयारीच्या अनुषंगाने चर्चा केली. नंतर मात्र त्यांनी थेट पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद गाठले आणि त्यावरूनच नाराजीचे वातावरण निर्माण झाले. निकोलाय कुदाशेव आणि रोमन बाबुश्किन यांनी यासंदर्भानेच स्पष्टीकरण देत, भारत आपला विश्वासू सहकारी व पाकिस्तानशी मर्यादित सहकार्य असल्याचे म्हटले. रशियन राजनयिक अधिकार्‍यांचे विधान नक्कीच बरोबर आहे, कारण भारताचे रशियाशी वर्षानुवर्षांपासूनचे लष्करी, संरक्षणविषयक, सामाजिक संबंध आहेत. आजही भारत रशियाकडून ६० टक्क्यांपेक्षा अधिक लष्करी साहित्य व शस्त्रास्त्रांची आयात करतो. येत्या काही काळात रशिया भारताला ‘एस-४००’ क्षेपणास्त्रविरोधी प्रणालीदेखील देणार आहे, तर भारताने रशियाच्या कोरोनारोधी ‘स्पुटनिक’ लसीच्या देशांतर्गत वापराला परवानगी दिली आहे. सोबतच भारत रशियाच्या अतिपूर्वेकडील तेल व नैसर्गिक वायू प्रकल्पांत गुंतवणुकीच्या प्रयत्नात आहे. एकूणच भारत आणि रशियातील संबंध सुरळीत सुरू असल्याचे यावरून दिसते. त्यातून भारत रशियाचा विश्वासू सहकारी असल्याचेही नक्कीच सूचित होते. पण, पाकिस्तानशी रशियाचे मर्यादित सहकार्य आहे, या रशियाच्या म्हणण्याकडे डोळे झाकून बघता येणार नाही. कारण, गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेने पाकिस्तानकडे दुर्लक्ष केले असून, त्याला दिल्या जाणार्‍या निधीत मोठी कपात केली आहे. त्यामुळेच पाकिस्तान सुरुवातीला चीनच्या आश्रयाला गेला आणि आता तो रशियाकडे झुकताना दिसतो. त्याला आपल्या बाजूने आणण्यासाठी रशियाही उत्सुक असून परराष्ट्रमंत्री सर्जेई लावरोव यांनी त्याला तसे आमंत्रणच दिल्याचे दिसते. कारण, आपल्या इस्लामाबाद दौर्‍यावेळी त्यांनी व्लादिमीर पुतीन पाकिस्तानला ‘लागेल ती मदत’ द्यायला तयार असल्याचे सांगितले. म्हणूनच, रशियन राजनयिक अधिकार्‍यांच्या पाकिस्तानशी मर्यादित सहकार्याच्या विधानावर विसंबता येत नाही. कारण ‘लागेल ती मदत’चा अर्थ कोर्‍या धनादेशाइतका स्पष्ट आहे.
 
दरम्यान, भारत-रशिया संबंधांत अफगाणिस्तानचाही मुद्दा आहे. तालिबानी दहशतवाद्यांच्या बिमोडासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात लष्कर घुसवले. पण, आता ते परत घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यानंतर अफगाणिस्तानात शांतता नांदण्यासाठी शेजारी देशांची महत्त्वाची भूमिका असेल. त्यात भारताचाही समावेश होतो, तर रशियालाही अफगाणिस्तानात रस असून त्याच्या मते भारताची आणि आपली दृष्टी समान आहे. पण, अफगाणिस्तानचा मुद्दा आला की, पाकिस्तानचे सहकार्यही महत्त्वाचे ठरते. अफगाणिस्तानची सीमा पाकिस्तानशी भिडलेली असून त्या भागात दहशतवाद्यांचे अनेक तळ आहेत. पाकिस्तान दहशतवाद्यांच्या निर्मूलनासाठी प्रयत्न करत असल्याचे नेहमीच दाखवतो. पण, ते तसे नाही. उलट पाकिस्तानच दहशतवाद्यांना पोसत असल्याचे बर्‍याचदा उघड झाले आहे. तरीही दहशतवादाशी लढ्याच्या बदल्यात तो अमेरिकेकडून आर्थिक मदत मिळवत राहिला. पुढे अमेरिकेने ती कमी केलीही; पण आता तशी मदत रशियाने पाकिस्तानला देऊ केली आहे. पाकिस्तानबरोबर रशियाचा पाच वर्षांपासून लष्करी युद्ध सरावही होत आहे व त्याचा उद्देश दहशतवादाविरोधातील लढ्यातील सहकार्य, असे रशिया सांगतो. आताच्या कुदाशेव आणि बाबुश्किन यांच्या विधानातील मर्यादित सहकार्याचा रोख त्याचकडे होता. पण, रशियन राजनयिक अधिकारी भारतात असल्याने ते असे बोलले का? कारण, रशियन परराष्ट्रमंत्री पाकिस्तानात जाऊन आपण मर्यादित सहकार्य नव्हे, तर लागेल ती मदत द्यायला तयार असल्याचे म्हणतात. त्याचा अर्थ नैसर्गिक वायूचा पुरवठा, आर्थिक मार्गिका, संरक्षण क्षेत्र असाही असू शकतो.
 
दरम्यान, पाकिस्तानशी संबंध प्रस्थापित करतानाच रशियन राजनयिक अधिकार्‍यांनी हिंदी-प्रशांत क्षेत्राची संकल्पना आणि ‘क्वाड’च्या वाढत्या प्रभावावरही चिंता व्यक्त केली. पाश्चिमात्य देशांच्या या माध्यमातून हिंदी-प्रशांत क्षेत्राला शीतयुद्धाच्या खाईत लोटण्याचा उद्देश असल्याचे रशियाने म्हटले. रशियाने अशी टिप्पणी करायला नको होती, कारण चीनवर अंकुश ठेवण्यासाठी आणि परस्पर सहकार्य वाढीसाठी भारत, अमेरिका, जपान व ऑस्ट्रेलियाचा समावेश असलेला ‘क्वाड’ गट महत्त्वाचा आहे. ‘क्वाड’मुळे हिंदी-प्रशांत क्षेत्रात अशांतता नव्हे, तर शांतता नांदू शकते. त्यावर रशियाने आक्षेप घेणे बरोबर ठरत नाही. तथापि, इतक्याशा घडामोडींमुळे दोन्ही देशांतील संबंध किमान पातळीवर आले असे नाही. पण, ते सार्वकालिक सर्वोच्च पातळीवरही नाहीत, याचे संकेत मात्र यातून मिळतात. मात्र, येत्या वर्षअखेरीस होऊ घातलेल्या व्लादिमीर पुतीन आणि नरेंद्र मोदी यांच्या शिखर परिषदेनंतरच दोन्ही देशांतील संबंधांतील स्पष्टता समोर येऊ शकते.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@