CBSE Board : १२वीची परीक्षा पुढे ढकलली, १० वीच्या परीक्षा रद्द

14 Apr 2021 14:28:24

10th - 12th board exam ca



नवी दिल्ली : सीबीएससी बोर्ड परीक्षांच्या संदर्भात केंद्र सरकारने महत्वाचा निर्णय जाहीर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय शिक्षणमंत्री यांच्या बैठकीत याबद्दल सविस्तर चर्चा झाली. त्यानुसार बारावी बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून १० वीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. सीबीएससी १२ वीच्या वर्गाबद्दल १ जून रोजी परिस्थिती पाहून आढावा घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
 
 
CBSE दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आता वस्तुनिष्ठ पर्यायी (objective criterion) स्वरुपातील प्रश्न विचारले जातील. गतवर्षीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर याच स्वरुपातील योजना बोर्डाने जाहीर केली होती. दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षांच्या संदर्भात निर्णय जाहीर झाल्यानंतर त्यावर संमिश्र प्रतिक्रिया सगळ्याच स्तरातून उमटत होत्या. दहावी-बारावीच्या परीक्षा व्हाव्यात की नाही व झाल्यात तर त्या ऑनलाईन व्हाव्यात की प्रत्यक्ष पेपर लिहून व्हाव्यात याबाबत सगळीकडेच संभ्रमाचे वातावरण होते.
 
 
अशातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. बैठकीदरम्यान दहावी-बारावीच्या सीबीएससी बोर्डाच्या परीक्षा टाळता येऊ शकतील का याबद्दल चर्चा झाली. त्याअनुषंगाने हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
 
 
४ मे २०२१ पासून सीबीएससी बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू होणार होत्या. बोर्डातर्फे जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार या परीक्षा दोन सत्रांमध्ये घेण्यात येणार होत्या. परंतु संपूर्ण देशभरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता परीक्षा रद्द होण्याचीच मागणी जोर धरू लागली होती. मुख्य म्हणजे अनेक विद्यार्थ्यांनी #cancleboardexam2021 हा हॅशटॅग वापरून सोशल मीडियावर पोस्ट लिहायला सुद्धा सुरुवात केली आहे.

 
Powered By Sangraha 9.0