सज्जनगड (पूर्वार्ध)

14 Apr 2021 22:34:04

Sajjangarh_1  H
 
 
शिवाजी महाराजांनी मोठ्या कल्पकतेने समर्थांसारखा सज्जन तेथे राहण्यास आला म्हणून परळीगडाचे नाव ‘सज्जनगड’ ठेवले, असे सांगितले जाते. समर्थांबरोबर त्यांच्या सहवर्तमान गडावर राहायला आलेली सर्व शिष्यमंडळी सज्जन होती. तेथे जणू काही सज्जनांचा मेळावा तयार झाला म्हणूनही त्याला ‘सज्जनगड’ म्हणून संबोधण्यात येऊ लागले.
 
 
 
सातार्‍याहून नैऋत्येस सुमारे दहा किमी अंतरावर परळी नावाचे एक खेडे आहे. तेथे जवळच ‘उरमोडी’ नावाची नदी वाहते. तिच्याजवळच एक प्राचीन दुर्ग आहे. तोच आपण समर्थांचा ‘सज्जनगड’ म्हणून ओळखतो. तेथील समर्थसमाधी मंदिर व एकंदर गडाचा परिसर पाहण्यासाठी अनेकजण जातात. हे ठिकाण समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंच आहे. तसेच पायथ्यापासून त्याची उंची सुमारे 300 मीटर आहे. सध्या कोरोनाजन्य परिस्थितीमुळे गडावर जाण्यासाठी निर्बंध असले, तरी लवकरच या महामारीच्या संकटावर मात करून आपण सज्जनगडावर मुक्तपणे संचार करू शकू. या गडाच्या कानाकोपर्‍याविषयी कितीतरी आख्यायिका ऐकायला मिळतात. परंतु, हे मात्र खरे आहे की, समर्थांच्या आणि शिवरायांच्या आठवणी या गडाशी निगडित आहेत. त्याला ऐतिहासिक पुरावे आहेत. समर्थ आणि शिवाजी महाराज यांच्यासारख्या महान विभूतींचे पाय या गडाला लागलेले आहेत. त्यांच्या वास्तव्याच्या आठवणी या गडाने जतन करून ठेवल्या आहेत. अशा या पवित्र भूमीला एकदा तरी वंदन करून यावे.
 
 
 
शिवाजी महाराज आणि समर्थ रामदासस्वामी यांची प्रथम भेट वैशाख शुद्ध नवमी, शके १५७१ म्हणजेच इ. स. १६४९ साली शिंगणवाडीच्या बागेत झाली, असा उल्लेख ‘वाकेनिसी प्रकरणा’च्या अठराव्या टिप्पणात आढळतो. परंतु, यासंबंधी अभ्यासकांमध्ये एकमत नाही. विद्वानांची मते एकमेकांशी जुळतातच, असे नाही आणि यात काही नवीन नाही. ‘वाकेनिसी’ टिप्पणात यापुढे असाही उल्लेख आढळतो की, त्यावेळी समर्थांनी शिंगणवाडीच्या बागेत शिवाजी महाराजांना व त्यांच्याबरोबर आलेल्या सरदार अमात्यांना अनुग्रह दिला. समर्थचरित्राच्या अभ्यासकांना हे माहीत आहे की, समर्थांचा मुक्काम एके ठिकाणी फार काळ नसे. डोंगरदर्‍यांमध्ये निसर्गाच्या सान्निध्यात राहणे समर्थांना आवडे. ‘दास डोंगरी राहातो। यात्रा देवाची पाहातो॥’ ही त्यांची उक्ती सर्वपरिचित आहे. समर्थ कधी शिवथर घळीला, तर कधी चाफळला राहत असत. हे शिवरायांना माहीत होते. समर्थ शिवरायांपेक्षा २२ वर्षांनी वडील होते. परंतु, दोघांची विचारसरणी व हिंदवी स्वराज्य संस्कृती रक्षणाचे ध्येय समान असल्याने दोघांचे संबंध जिव्हाळ्याचे, आपुलकीचे होते, यात संदेह नाही. त्यामुळे समर्थांचे कायम वास्तव्य एखाद्या निवांत सुरक्षित ठिकाणी असावे, असे शिवरायांच्या मनात होते. त्यासाठी योग्य अशा ठिकाणाच्या शोधात शिवाजी महाराज होते. खेड-दापोली तालुक्यातील ‘महिपतगड’ यासाठी योग्य आहे का, याची पाहणी शिवाजी महाराजांनी केली होती. महिपतगडाच्या माथ्यावरील पठाराचा भाग खूप विस्तीर्ण होता. त्यामानाने परळीच्या किल्ल्यावरील सपाटीचा प्रदेश आटोपशीर होता. जवळच ‘उरमोडी’ उर्फ ‘उर्वशी’ नदी वाहत आहे. या नदीजवळील गुहेत व गडावर पूर्वी ऋषिमुनींचे वास्तव्य होते. डोंगरमाथ्यावरील भाग आजूबाजूचा परिसर निसर्गरम्य होता. प्राचीन काळी या डोंगरावर ‘आश्वलायन’ नावाच्या ऋषींचा आश्रम होता. त्यामुळे या किल्ल्याला ‘आश्वलायनगड’ म्हणत असत. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या परळी गावामुळे त्याला ‘परळीचा किल्ला’ असेही म्हणत असत. समर्थांचे आवडते चाफळ ठिकाण येथून जवळ आहे. तसेच समर्थस्थापित ११ मारुती या परिसरात जवळपास आहेत. या सर्व गोष्टी विचारात घेऊन शिवरायांनी स्वामींच्या कायमस्वरुपी वास्तव्यासाठी या परळीच्या किल्ल्याची निवड केली असावी. या किल्ल्याची थोडक्यात हकिगत अशी आहे - चौदाव्या शतकात हा किल्ला बहामनी राज्याच्या ताब्यात होता. तेथून तो विजापूरच्या आदिलशाहाकडे आला. त्यांनी त्याचे नाव ‘नौरसतारा’ ठेवल्याचे उल्लेख आहेत. नंतर शिवाजी महाराजांनी हा परळीचा किल्ला १ एप्रिल, १६७३ ला विजापूरकरांकडून जिंकून घेतला. लगेच त्याचवर्षी २७ जुलैला शिवाजी महाराजांनी सातारा काबीज केले व तेथील किल्ला ताब्यात घेतला. त्यामुळे समर्थ जर परळीच्या किल्ल्यावर कायम वास्तव्याला आले, तर शिवाजी महाराज ज्यावेळी सातारा किल्ल्यावर येतील, तेव्हा समर्थांना भेटणे त्यांना सहज शक्य होणार होते. शिवाजी महाराजांची मधून मधून सामार्थांशी अनेक विषयांवर चर्चा होत असे. या परळीच्या किल्ल्यावरील सपाट पृष्ठभागाचा आकार विहंगमदृष्टीने बघितला, तर तो शंखाच्या आकाराचा आहे, असे वाटते. म्हणजे उत्तरेकडील सपाटी रुंद असून दक्षिणेकडे तो भाग निमुळता होत गेला आहे.
 
 
 
काही वर्षांपूर्वी कॅप्टन आनंद बोडस यांनी विमानातून समर्थसमाधी मंदिरावर पुष्पवृष्टी केली. त्यावेळी विमानातून गडाच्या सपाटीचा पृष्ठभाग त्यांना भारताच्या नकाशाप्रमाणे वाटला. अशा या परळीच्या किल्ल्याची निवड शिवाजी महाराजांनी समर्थांच्या कायम वास्तव्यासाठी केली. त्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी चाफळला जाऊन समर्थांना तशी विनंती केली. पण, समर्थांनी लगेच त्यासाठी होकार दिला नाही आणि नाही म्हणूनही सांगितले नाही. नंतर ते शिवाजी महाराजांना म्हणाले की, “चाफळ येथील श्रीरामाच्या पूजेचा आणि रामनवमीच्या वार्षिक रामजन्मोत्सवाचा अंगीकार शिवरायांनी करावा.” अर्थातच, शिवाजी महाराजांनी ते तत्काळ मान्य केले. रामरायाच्या पूजोपचाराची सोय झाल्याने रामदास शांतचित्ताने परळीच्या किल्ल्यावर काही निवडक शिष्यांसह जाण्यास तयार झाले. महाराजांनी लगेच चाफळच्या दैनंदिन खर्चासाठी जावळीच्या सुभेदारास आज्ञापत्र पाठवले. तसेच रामनवमीच्या वार्षिक उत्सवासाठी दत्ताजी भिमल वाकनीस यास आज्ञापत्र दिले की, “तुम्ही या प्रांती राहता तेव्हा येथील रामजन्म मोहोछाव तुम्ही करणे, त्यास जो खर्च लागेल तो दिवाणातून लावणे.” (संदर्भ : समर्थ अवतार) शिवाजी महाराजांनी हा जो चाफळच्या नित्य पूजेचा व वार्षिक महोत्सवाचा अंगीकार केला तो पुढे संभाजीराजे, राजाराम, शाहू महाराज या छत्रपतींनीही चालवला. थोडक्यात म्हणजे, ही त्याकाळची शासकीय पूजा म्हणता येईल. चाफळ हे महाराष्ट्राच्या राज्यकारभाराचे अंग बनले होते. यानिमित्ताने या राजकीय महापुरुषांनी सतत चाफळशी संबंध साधला. शंकरराव देवांच्या मते, ही महाराष्ट्राच्या राजकीय दृष्टीने मोठी घटना होती. चाफळचे देवस्थान मराठ्यांच्या राजकारणाचे अंग शेवटपर्यंत मानण्यात आले.
 
 
 
शिवरायांच्या विनंतीवरून व त्यांनी चाफळच्या पूजेचा, वार्षिक महोत्सवाचा अंगीकार केल्यावर रामदासस्वामी काही निवडक शिष्यांसह परळी किल्ल्याच्या गडावर राहायला आले. शिवाजी महाराजांनी मोठ्या कल्पकतेने समर्थांसारखा सज्जन तेथे राहण्यास आला म्हणून परळीगडाचे नाव ‘सज्जनगड’ ठेवले, असे सांगितले जाते. समर्थांबरोबर त्यांच्या सहवर्तमान गडावर राहायला आलेली सर्व शिष्यमंडळी सज्जन होती. तेथे जणू काही सज्जनांचा मेळावा तयार झाला म्हणूनही त्याला ‘सज्जनगड’ म्हणून संबोधण्यात येऊ लागले. समर्थ त्यांच्या पूर्वायुष्यात १२ वर्षे पायी सारा हिंदुस्थान फिरले होते. ठिकठिकाणी त्यांनी मठस्थापना केली होती. त्यावेळी वेगवेगळ्या नावाने ते प्रसिद्ध होते. त्यातील काही नावे अशी होती- ‘कीर्तिवंत’, ‘भक्त’, ‘विजय’, ‘महंत’, ‘बंदे’, ‘फकीर’, ‘जयवंत’, ‘सज्जन’ या नावांपैकी हिंदुस्थानच्या काही भागांत त्यांचे ‘सज्जन’ हे नाव प्रसिद्ध होते. म्हणूनही त्या गडाला ‘सज्जनगड’ हे नाव साजेसे वाटते. यापुढे समर्थांचे सज्जनगडावर कायमचे राहाणे झाले. तथापि दरवर्षी रामनवमीच्या उत्सवासाठी ते चाफळला जात असत. गडावर शिष्य आणि सेवेकरी मिळून सर्व २५ मंडळी राहत. कवी अनंत यांनी या गडाचे सुरेख वर्णन केले आहे-
सह्यगिरीचा विभाग विलसे मंदारशृंगापरी।
नामे सज्जन तो नृपे वसविला श्रीउर्वशीचे तिरी॥
साकेताधिपती, कपी, भगवती, हे देव ज्याचे शिरी।
तेथे जागृत रामदास विलसे जो या जना उद्धरी॥
 
 
या गडाने अनुभवलेल्या आणखी काही आठवणी पुढील लेखात पाहू.
 
 
- सुरेश जाखडी
Powered By Sangraha 9.0