डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक धोरणातील समरसता

    13-Apr-2021
Total Views |

Dr Ambedkar_1  
 
 
 
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जातिअंताचे कार्य, त्याची व्याप्ती आणि त्यांच्या सामाजिक धोरणातील सकारात्मक बदलाचा सामाजिक समरसतेवर झालेला परिणाम, या विषयावर आजच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भाष्य करणारा हा लेख...
मूळ विषयाकडे वळण्यापूर्वी आपल्याला स्वातंत्र्यापूर्वीच्या सामाजिक सुधारणांच्या चळवळीची पार्श्वभूमी काय होती, हे पाहणे संयुक्तिक होईल, असे मला वाटते. इंग्रज भारतात येण्यापूर्वी सामाजिक चळवळींचा मागमूस कुठेही नव्हता. अर्थात, एक्का-दुक्का अपवाद असूही शकेल. पण, दखलपात्र सामाजिक चळवळ कुठेही दिसून येत नाही. इंग्रजांच्या आधी डच, पोर्तुगीज, मुघल अशा अनेक परकीय शक्तींनी भारतावर अधिराज्य गाजवले. मुघल तर ४००-४५० वर्षं भारतावर राज्य करत होते. पण, सामाजिक चळवळींचा वणवा इंग्रजांच्या काळात जितका पसरला, तितका त्यापूर्वी कधीही अनुभवायला आलेला नव्हता. अर्थात, हा एक वेगळा स्वतंत्र अभ्यास विषय होऊ शकतो. येथे संदर्भ इतकाच घ्यायचा की, इंग्रजांच्या बरोबर त्यांचे पुढारलेले तत्त्वज्ञान, त्यांची मोकळी सामाजिक आणि सांस्कृतिक विचारसरणीही भारतात आली आणि हजारो वर्षे अनिष्ट रूढी-परंपरांच्या बंधनात अडकून पडलेल्या शोषित आणि शोषक दोन्हीही समाजाला त्याचे आकर्षण वाटल्यावाचून राहिले नाही. भारतीय समाजमनावर त्याचा परिणाम अगदी नकळत होऊन गेला. तसाच तो इथल्या समाजनायकांवर होणेही अगदी स्वाभाविक होते. म्हणूनच काही जणांना इंग्रजी राजवट मुघली सत्तेपेक्षा वा इतर कोणत्याही राजसत्तेपेक्षा चांगली वाटत होती. याच अनुषंगाने जर आपण सामाजिक चळवळीचा मागोवा घेत गेलो, तर आपल्या असे लक्षात येते की, या प्रवाहाचा उगम राजा राममोहन राय यांच्यापर्यंत जातो. राजा राममोहन राय यांनी ‘जीवसृष्टीचा निर्माता एकच आहे व तो निर्गुण, निराकार आहे,’ असे म्हणत हिंदू धर्मातील जातिभेदाला आणि कालबाह्य झालेल्या रूढी-परंपरांना विरोध केला. समाजाला एक नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला आणि हाच प्रयत्न अनाहूतपणे समरसतेचा पाया घालण्याच्या कामी महत्त्वाचा ठरला. वास्तविक समरसतेच्या कल्पनेचा पुरस्कार त्यापूर्वीही स्वामी विवेकानंदांचे गुरू रामकृष्ण परमहंस यांच्यासारख्या योगमार्ग आचारणार्‍या महंतानेसुद्धा ‘सर्वधर्मसमभाव’ अशी घोषणा करत केला होता. तेव्हापासून तर ईश्वरचंद विद्यासागर, स्वामी दयानंद सरस्वती, गोपाळ गणेश आगरकर, महात्मा ज्योतिबा फुले, न्यायमूर्ती रानडे आणि महर्षी कर्वेंपर्यंत अनेक समाजसुधारकांचे हे कार्य वेगवेगळ्या नावाने, निमित्ताने आणि उद्देशाने पुढे गेलेले आढळते. या सर्वांच्या कामाचा गाभा वा सारांश एकच होता की, हिंदू समाजातील जातीय विषमतेची दरी संपून संपूर्ण हिंदू समाज एक व्हावा, त्यांच्यात समरसता निर्माण व्हावी आणि त्यासाठी जर काही उपाय असेल तर तो आहे शिक्षण! फक्त शिक्षणच हे करू शकते.
 
 
 
 
स्पृश्यास्पृश्य भेदास शिक्षणाचा अभाव, हेच खरे कारण आहे. भेदाभेद संपून बंधुभाव म्हणजेच सामाजिक समरसतेचा भाव प्रस्थापित व्हावयाचा असेल, तर विद्या हेच एकमेव उत्तर आहे. अंत्यजातीचे सुशिक्षण वाढणे हाच खरा स्पृश्यास्पृश्यभेद नाहीसा करण्याचा उपाय आहे, असे केशरीनेही वारंवार बजावले होते. त्यापूर्वीही आर्य समाजाने स्पृश्यास्पृश्यभेद आपल्या पंथातून काढून टाकण्याचा प्रयत्न केला होताच. पण, सर्वात मोठा व अभिमानाचा प्रयत्न जर कुठे झाला असेल तर तो महाराष्ट्रात. तो कुणी केला? तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी. अतिशूद्रांच्या शिक्षणाकडे आपले लक्ष वळवत भारतातल्या पहिल्या मुलींच्या शाळेबरोबरच दि. १० सप्टेंबर, १८५३ साली अस्पृश्यांसाठीही शाळा काढत त्यांनी दलितोद्धाराच्या कार्याची दमदार सुरुवात केली होती. आपल्या घराजवळील हौद अस्पृश्यांना खुला करत अतिशय धैर्याने आणि चिकाटीने त्यांनी आपले कार्य पुढे नेले. राजश्री शाहू महाराज, श्रीमंत सयाजीराव गायकवाड, म. माटे यांच्यासारख्या बहुजन समाजातील अनेक समाजसुधारकांनी मोठ्या साहसाने समरसतेचा हा रथ पुढे नेण्यासाठी आपापल्या परीने यथाशक्ती हातभार लावला. पण, हे सगळं पुरेसं होतं का? तर अजिबात नव्हतं. परंतु, आधी सांगितल्याप्रमाणे अनेकांना इंग्रजांचा पुढारलेला उदारमतवाद देशात सामाजिक सुधारणा घडवून आणण्यासाठी पूरक आहे, असे वाटत होते आणि ते साहजिकच होतं. हजारो वर्षे बहिष्कृत राहिलेल्या समाजाला पाश्चात्त्य संस्कृतीतला मोकळेपणा आणि उदारवाद भुरळ घालणं अगदी साहजिक होतं आणि म्हणूनच, आधी सामाजिक सुधारणा की आधी स्वातंत्र्य, या संघर्षामध्ये भारतातले अनेक आघाडीचे लोकनायक अडकले होते. अशा परिस्थितीत या चळवळी भरकटण्याचीही शक्यता नाकारता येत नव्हती. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर सामाजिक चळवळीच्या आकाशात एका नव्या सूर्याचा उदय झाला ज्याचे नाव होते डॉ. भीमराव रामजी आंबेडकर अर्थात ‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर. वरील सर्व समाजसुधारकांचे जातिसंस्थेचे विश्लेषण आणि बाबासाहेबांचे जातिसंस्थेचे विश्लेषण यात मुख्य फरक हा होता की, वरील सर्वांचे चिंतन हिंदूराष्ट्र बळकट कसे होईल, या प्रेरणेतून जन्माला आले होते, तर बाबासाहेबांनी समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून भारतीय जातीसंस्थेचे विश्लेषण केले. त्यांचे चिंतन आपल्या समाजबांधवांच्या वेदनेतून जन्माला आले होते. म्हणूनच, बाबासाहेबांना वाटत होते की, केवळ शिक्षण समाजातली दरी कधीच संपवू शकणार नाही. कारण, जात हा भारतीय समाजधारणेचा पाया आहे. त्याच्यावर आघात केल्याशिवाय कोणतेही ठोस परिणाम हाताला लागणार नाही आणि हे लक्षात आल्यावरच त्यांनी दि. २० मार्च, १९२७ला महाड येथील चवदार तळ्याच्या संगराने आपल्या अस्पृश्योद्धाराच्या कार्याचे, तसेच हजारो वर्षांपासून जातीय विषमतेच्या अंधारात खितपत पडलेल्या आपल्या अस्पृश्य बांधवांच्या सर्वांगीण उत्थानाचे बिगुल वाजवले.
 
 
 
चवदार तळ्याचा हा संगर सामाजिक तसेच राजकीयदृष्ट्याही अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आणि महत्त्वाचा ठरला आणि सामाजिक चळवळींच्या इतिहासात एक मैलाचा दगड बनून राहिला. हा संगर जरी वरवर केवळ दलितांच्या उत्थानासाठी आहे, असे वाटत असले तरी त्यात बहुजनांचा विशेषत: चित्रे-टिपणीस यांसारख्या ब्राह्मण वर्गाचा असलेला सक्रिय सहभाग हा त्यानंतरच्या स्वातंत्र्य पूर्व आणि स्वातंत्र्योतर सामाजिक समरसतेवर सकारात्मक परिणाम करणारा ठरला आणि येथूनच समरसतेच्या पहिल्या अध्यायाची सुरुवात झाली. अतिशय चपखलपणे बाबासाहेबांनी हा दुवा हाताळला होता. कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता, त्यावेळी घेतलेल्या अनेक निर्णयांमुळे बाबासाहेबांचे बहुजनांच्या मनातले स्थान उंचावून गेले. मग ते सत्याग्रहाच्या दरम्यान कुठलाही हिंसक प्रतिकार न करण्याविषयी असेल किंवा ज्या वेळेस बाबासाहेबांना महाड गावातून काही बहुजन समाजातील लोकांचा संदेश आला की, “तुमच्या स्टेजवर असलेल्या ब्राह्मणांना जर स्टेजवरून खाली जायला सांगितले, तर आम्ही तुमच्या या आंदोलनाला पाठिंबा देऊ” वगैरे. या संदेशाला बाबासाहेबांनी दिलेल्या उत्तराने त्यांच्या मनातले राष्ट्रप्रेम, त्यांच्या अंत:करणातील बंधुत्वाची भावना आणि त्यांची दूरदृष्टी याचे दर्शन सगळ्या जगाला घडवून गेले. त्यांच्या या भूमिकेचा परिणाम तेव्हाही आणि आताही संपूर्ण बहुजन समाजाच्या मनावर खोलपर्यंत झालेला आपल्याला पाहायला मिळतो. बाबासाहेब त्यावेळी म्हणाले होते की, “माझे आंदोलन यशस्वी झाले नाही तरी चालेल. पण, या आंदोलनात भाग घेणार्‍या आणि जातीय विषमतेविरुद्ध लढणार्‍या प्रत्येकाला या स्टेजवर बसण्याचा अधिकार आहे. माझा विरोध ब्राह्मणांना नाही, तर ब्राह्मण्याला आहे.” याचाच अर्थ बाबासाहेबांचा संघर्ष केवळ हिंदू समाजातील पिढीजात वैगुण्य घालवण्यासाठी नव्हता, तर शोषणमुक्त समाजनिर्मितीसाठी होता. पण, बाबासाहेबांना हेही माहीत होते की, भारतीय जातीसंस्थेला हजारो वर्षाच्या अनिष्ट रूढी-परंपरेने भारतीय विचारसरणीचा अविभाज्य भाग बनवून टाकलेले आहे. त्यामुळे या विचारधारेला आधारभूत असलेली धर्मशास्त्रे आणि धर्मसंस्था नाकारल्याशिवाय जातिसंस्थेची खोलवर गेलेली मुळे उखडली जाणार नाहीत आणि बाबासाहेबांच्या लढ्यातला हा विचार जर लक्षात घेतला तर त्यांच्या सामाजिक चळवळीने पुढे घेतलेली वळणे आणि बाबासाहेबांच्या सामाजिक विचारधारेतील बदलांचा अर्थ आपल्याला नक्की लावता येतो. परिवर्तनाच्या चळवळीत बुद्धिजीवी वर्गाची भूमिका कशी साहाय्यभूत होऊ शकते, याची बाबासाहेबांना चांगली जाण होती. म्हणूनच आपल्या ‘अनहिलेशन ऑफ कास्ट्स’ या पुस्तकात ते म्हणतात की, “प्रत्येक देशात बुद्धिजीवी वर्ग हा सत्ताधारी वर्ग नसला तरी प्रभावशाली वर्ग निश्चितच असतो. या वर्गाला दूरदृष्टी असू शकते आणि तो देशाला सल्ला किंवा नेतृत्व देऊ शकतो आणि देशातली जनता या बुद्धिजीवी वर्गाचे अनुकरण करत असते.” बाबासाहेबांच्या या विचारातून समरस समाजनिर्मितीसाठी बुद्धिजीवी वर्गाचे साहाय्य किती आधारभूत होऊ शकते, हे स्पष्ट होते.
 
 
बाबासाहेबांनी चवदार तळ्याच्या आंदोलनानंतर केलेल्या अनेक आंदोलनांपैकी मंदिर प्रवेशासाठी दिलेला लढा हासुद्धा त्यांच्या वरती सांगितलेल्या चिंतनाचाच एक भाग होता. चळवळी प्रतिकात्मक होत्या. अस्पृश्यांच्या मनातला न्यूनगंड आणि स्पृश्यांमधला अहंगंड कमी होऊन त्यांच्या मनातल्या दुरी मिटाव्यात आणि त्यांच्यात बंधुत्वाची भावना वाढीस लागावी, ही आंतरिक तळमळी त्यात होती. १९३१ ते १९३५ अशी पाच वर्षं चाललेल्या काळाराम मंदिर सत्याग्रहाने बाबासाहेबांना उद्विग्न केले असले, तरी त्यांचा संयम तीळमात्र ढळला नव्हता. मात्र, या चळवळीने त्यांच्या संयमाची परिसीमा झाली होती. तरीही कुठलाही हिंसक प्रतिकार एकाही सत्याग्रहीकडून झाला नाही, हे अद्भुत होते. पण, त्यानंतर बाबासाहेबांचा चळवळीकडे बघण्याच्या दृष्टिकोनात मात्र मोठा बदल झाला. कारण, १९३५च्या भारत सरकारच्या कायद्यान्वये प्रांतिक स्वायत्तेचे तत्त्व लागू होणार होते आणि भारताच्या संसदीय राजकारणाचा खर्‍या अर्थाने आरंभ होणार होता. बाबासाहेब या सगळ्या बदलांचा अभ्यास करून होते. त्यामुळेच ते वेळोवेळी आपल्या भूमिकेत अनुकूल बदल करत गेले. संसदीय राजकारणातील राजकीय पक्षाचे महत्त्व बाबासाहेब जाणून होतेच. म्हणूनच, त्यांनी १९३६ साली ‘स्वतंत्र मजूर पक्षा’ची स्थापना केली. पण, यातही समरसतेचाच मंत्र त्यांनी दिला आणि हे त्यांनी आपल्या राजकीय पक्षाची भूमिका आणि उद्देश विशद करताना जे मत मांडले, त्यावरून स्पष्टपणे लक्षात येते. ते म्हणतात, “अस्पृश्यता निवारणाच्या लढ्याचे बाह्य स्वरूप जरी जातिनिष्ठ असले तरी तत्त्वत: तो लढा आर्थिक आहे.” हे आम्ही वेळोवेळी आमच्या लेखात सांगितलेलेच आहे. अस्पृश्यता निवारणाच्या बाबतीत अस्पृश्य श्रमजीवी जनतेचे हितसंबंध स्पृश्य श्रमजीवी जनतेच्या हितसंबंधापेक्षा वेगळे असल्याने अस्पृश्यवर्गाला आपला लढा स्वतंत्रपणे लढविणे क्रमप्राप्त होते. पण, आर्थिक लढ्यात स्पृश्य आणि अस्पृश्य शेतकरी, कामकरी वर्गाचे हितसंबंध एकजीव आहेत. अस्पृश्यवर्गाला आपला लढा स्पृश्य शेतकरी, कामकरी वर्गाच्या साहाय्यावाचून स्वतंत्रपणे लढता येणार नाही. बाबासाहेबांच्या या भूमिकेतून हे लक्षात येते की, बदलत्या राजकीय परिस्थितीत आणि पुढे येणारे राजकीय बदल ध्यानात घेत, बाबासाहेबांनी स्पृश्य-अस्पृश्यांचे हितसंबंध एकत्र जोडत एका वेगळ्या बदलाची नांदी दिली होती. शिक्षणातून वा अनुभवातून आलेल्या शहाणपणाला बाबासाहेबांनी कधीच नाकारले नाही आणि त्यानुसार आपली भूमिका बदलायलाही त्यांनी कधीच संकोच केला नाही. त्यांच्यातला हा गुण पुढेही स्वातंत्र्यानंतर आणि नंतरही शेवटपर्यंत कायम राहिला आणि हे पुढे संविधाननिर्मिती असो किंवा त्यांनी संसदेत मांडलेले ‘हिंदू कोडबिल’ असो, सहज लक्षात येते. समरसता मनातून तयार झाली तरच समता प्रस्थापित होऊ शकते, हे त्यांना माहीत होते. म्हणूनच, ते म्हणत की, “जर माझ्या मनात द्वेष असता, सुडाची भावना असती, तर पाच वर्षांच्या आत मी या देशाचे वाटोळे केले असते.” हिंदू संस्कृती न सोडण्याविषयीची त्यांनी घेतलेली खबरदारीही त्यांचे मन वाचता येण्यासाठी पुरेशी आहे. ते नेहमी म्हणत की, “जो धर्म या देशातील प्राचीन संस्कृतीला धोका देईल किंवा अस्पृश्यांना अराष्ट्रीय बनवील, असा कोणताही धर्म मी केव्हाही स्वीकारणार नाही. कारण, या देशाच्या इतिहासात विध्वंसक म्हणून स्वत:च्या नावाची नोंद करून घेण्याची माझी इच्छा नाही.” हे त्यांचे तेजस्वी विचार हेच सिद्ध करतात की, राष्ट्रीयता आणि बंधुता अर्थात समरसता हेच त्यांच्यासाठी सर्वात प्रथम होते.
 
 
- काशीनाथ पवार 
 
(लेखक समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्रचे
सदस्य आहेत.)