कलेच्या कलेने वाढणारी ‘पोर्णिमा’

    दिनांक  12-Apr-2021 12:44:51
|
पौर्णिमा Paurnima _1 
 
 
 
“आयुष्य म्हणजेच एका आव्हान आहे. त्यात जय किंवा पराजय महत्त्वाचा नाही, तर तुम्ही ते आव्हान कसे पेलले आणि त्यावेळी तुम्हाला काय वाटले, हे अधिक महत्त्वाचे,” असे म्हणणारी आर्किटेक्ट पोर्णिमा बुद्धिवंत सध्या फॅशनच्या क्षेत्रात भारताचे प्रतिनिधित्व करते आहे. तिच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकणारा हा लेख...
 
 
 
मुंबईच्या एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात पोर्णिमाचा जन्म झाला. तिचे वडील शाळेच्या गाडीवर कामाला, तर आई दुसर्‍यांच्या घरी काम करून आठ जणांचा हा संसाररथ यशस्वीपणे रेटत होती. पोर्णिमाला लहानपणापासूनच कष्टाचे आणि प्रामाणिकपणाचे धडे आई-वडिलांकडून मिळाले. आई आजारी असताना पोर्णिमा आईचे काम सांभाळायची. आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण पूर्ण न करू शकलेले तिचे आईवडील, तिच्या आणि भावंडांच्या शिक्षणासाठी कायमच प्रोत्साहन देत राहिले. त्यांच्या या प्रोत्साहनामुळेच आज पोर्णिमा ’आर्किटेक्ट’, तर बहीण ’डॉक्टर’ आणि भाऊ ’इंजिनिअर’ म्हणून स्वत:च्या पायांवर उभे आहेत.
 
 
पोर्णिमा तिच्या करिअरविषयी बोलताना सांगते की, “जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर शिक्षणक्षेत्राची वाट धरावीच लागेल, ही आईवडिलांची शिकवण मला आयुष्यभर कामी आली. लहानपणापासून मी फक्त अभ्यासावरच लक्ष केंद्रित करत राहिले. सडपातळ, कमी उंचीची, तेल लावून दोन वेण्या घालून सतत हातात पुस्तक घेऊन अभ्यास करणारी मी... कधीच फॅशन क्षेत्रात येईन, असे वाटलेच नव्हते. पण, मी माझे सामर्थ्य ओळखले. मी मला जे हवं ते करू शकते आणि मला हवं ते बनू शकते, ही जिद्द कायम ठेवून मी नेहमी पुढे जात राहिले. स्वतःमध्ये बदल करत राहिले.”
 
 
आज पोर्णिमा व्यावसायिकदृष्ट्या ‘आर्किटेक्ट’ आहे. २०१७ मध्ये ‘रचना संसद कॉलेज ऑफ आर्किटेक्चर’मधून तिने आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ‘पर्यावरणशास्त्र’ संस्थेच्या ‘नॅचरल रिसोर्स कन्झर्वेशन’ या विषयात पदव्युत्तर पदवीही प्राप्त केली. अभ्यासासोबतच पोर्णिमाने तिचे समाजभान जपत शैक्षणिक वर्षाच्या अंतिम वर्षात ‘टीच फॉर इंडिया, मुंबई’ या ‘एनजीओ’साठी स्वयंसेवक म्हणूनही काम करण्यास सुरुवात केली. तिथल्या लहान मुलांना गणित, इंग्रजी इ. विषय शिकवत ती लहान मुलांमध्ये मिसळून गेली.
 
 
याविषयी सांगताना पोर्णिमा म्हणते की, “आपण जोपर्यंत त्या परिस्थितीतून जात नाही, तोपर्यंत आपल्याला एखाद्याची वेदना जाणवत नाही. जेव्हा मी लहान होते, मला चित्रकलेच्या क्लासला जायचे असायचे, पण घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे ते करता आले नाही. अभ्यासाव्यतिरिक्त इतर छंद जोपासणे किंवा इतर इच्छा पूर्ण करणं खूप कठीण होतं. परंतु, काम करत असताना लक्षात आलं की, पैसा मला कलाकार म्हणून जे हवं आहे ते मिळवण्यासाठी अडवत होता. त्यावेळी मी पैसा सोडून माझ्या आतल्या कलाकाराला संधी द्यायचं ठरवले.”
 
 
आपल्या भावना व्यक्त करताना पोर्णिमा पुढे म्हणते की, “आपण स्वतःच्या गोष्टीत इतके रमतो की, आपण आपल्या समाजाचं देणं लागतो, हेच विसरून जातो. परंतु, या सर्वांमधून मला जाणवलं की, आपण आपल्या समाजासाठी काहीतरी करणं गरजेचं आहे. त्यावेळी मी ठरवले की, आपण लहानपणी पैशांअभावी जे करू शकलो नाही, ते इतर कोणाच्याही नशिबाला येऊ नये, कुठल्याही लहान मुलाला आपले छंद जोपासता यावे, हे मनाशी पक्के केले.” या संकल्पनेतून पोर्णिमाने २०१७ मध्ये ‘कर्व संकलन’ नावाने गरीब मुलांसाठी ‘आर्ट ग्रुप’ सुरू केला. या ‘आर्ट ग्रुप’मार्फत मुलांसाठी वेगवेगळ्या कार्यशाळा विनामूल्य आयोजित केल्या जातात. यात त्यांना त्यांच्यातील सुप्त गुणांची ओळख करून दिली जाते. या कार्यशाळांमधून मुलांना वेगवेगळ्या प्रकारचे कलाप्रकार शिकायला मिळतात. या सगळ्यांमध्ये पोर्णिमा स्वतःचं बालपण जगून घेते.
 
जागतिक ‘कला प्रवास’
 
आपणही मॉडेलिंग करावे, असे तिला नेहमी वाटायचे. एकदा पोर्णिमाने तिच्या मित्राची विनामूल्य फोटोशूटची जाहिरात पाहिली आणि त्यासाठी प्रयत्न करायचे ठरवले. पोर्णिमाचे हे फोटोशूट उत्तम पार पडले. यातूनच तिच्या मॉडेलिंगचा श्रीगणेशा झाला. यानंतर तिने अनेक शूट यशस्वीरीत्या पार पाडले. या प्रवासाकडे बघताना पोर्णिमा म्हणते, “मला बर्‍याचदा सौंदर्यस्पर्धेत भाग घ्यावा असे वाटायचे. पण, त्यावेळी स्टेजची भीतीही होती आणि एखादा नवीन ड्रेस घ्यावा इतके पैसेही नव्हते. आज या प्रवासाकडे बघताना स्वतःवरचा आत्मविश्वास दृढ होतो.”
 
 
 
हे सगळं करत असताना आपला आर्थिक भार इतरांवर पडू नये म्हणून पोर्णिमाने एका आर्किटेक्चरल कंपनीत नोकरी करायला सुरुवात केली. यातून वेळ काढून, सुट्टीच्या दिवशी तिने ‘मॉडेलिंग’ची कामे करण्यास सुरुवात केली. याशिवाय आर्किटेक्चरच्या शेवटच्या वर्षाच्या ‘थिसिस प्रोजेक्ट’साठी आंतरराष्ट्रीय आर्किटेक्चरल स्पर्धेत तिला द्वितीय स्थान मिळाले. तिने काढलेली चित्रे पुण्याच्या ‘राजा रविवर्मा आर्ट गॅलरी’मध्ये प्रदर्शित झाली. एकीकडे करिअर, तर दुसरीकडे मॉडेलिंग अशी तारेवरची कसरत करणार्‍या पोर्णिमाची याच वेळी ‘मिस्टर अ‍ॅण्ड मिस महाराष्ट्र 2018’साठीच्या अंतिम फेरीची स्पर्धक म्हणून निवड झाली.
 
 
याच स्पर्धांमुळे आत्मविश्वास निर्माण झाल्याचे ती सांगते. स्पर्धांमध्ये मजल दरमजल करत ती ‘TGPCs Miss India’या स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचली आणि या स्पर्धेत तिला तिच्या सामाजिक कार्यासाठी म्हणजेच ‘कर्व संकलन’ या आर्ट प्रोजेक्टसाठी ‘मिस गोल्डन हार्ट टायटल’ हा पुरस्कार मिळाला. मुंबईच्या ‘हॅप्पी क्लब’तर्फे तिला ‘यंग अचिव्हर २०१९’ या पुरस्कारानेदेखील गौरविण्यात आले आहे.
 
 
जून२०१९ मध्ये पोर्णिमाने 'Miss India Exquisite 2019 : Queen For Cause' हा किताब पटकावला. ऑगस्टमध्ये म्यानमारमध्ये पार पडलेल्या 'Miss Tourism and Culture Universe 2019' या आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत पोर्णिमाने भारताचे प्रतिनिधित्व केले. या आंतरराष्ट्रीय व्यासपीठामुळे तिला वेगवेगळ्या देशांतील लोकांना भेटण्याची संधी मिळाली. ही संधी माझ्यासारख्या मध्यमवर्गीय मुलीसाठी स्वप्नवत असल्याचे ती सांगते.
 
 
 
इतके यश कमावूनही पोर्णिमाचे पाय मात्र जमिनीवरच आहेत, याचे श्रेय ती आई-वडिलांना देते. या यशस्वी प्रवासाचं रहस्य सांगताना पोर्णिमा म्हणते, “प्रत्येकाने असं काहीतरी करायला हवं की, ज्यातून त्यांना खरा आनंद मिळेल. प्रामाणिकपणे कठोर परिश्रम करणं आणि कामाप्रति वचनबद्ध असणं हेच यशाचं खरं गमक आहे. याशिवाय आपण समाजाचं देणं लागतो, हे लक्षात घेऊन इतरांना आपल्या क्षमतेप्रमाणे मदत केलीच पाहिजे. ‘क्यूंकी हम चलते जायेंगे और कारवां बढता जायेगा!’
 
यशाचा मूलमंत्र
एखाद्या परिस्थितीतून आपण स्वतः जोपर्यंत जात नाही, तोपर्यंत आपल्याला तिची किंमत कळत नाही. त्यामुळे न्यूनगंड बाजूला सारून आत्मविश्वासाने पुढे जा आणि आपण समाजाचे देणे लागतो, हे कायम लक्षात ठेवा.
 
 
- हर्षदा सीमा
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.