दहावी-बारावीच्या परीक्षांबद्दल महत्वाचा निर्णय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Apr-2021
Total Views |

varsha gaikwad_1 &nb
 
 
 
मुंबई : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येचा विचार करता परिस्थीती अत्यंत बिकट होत चालली आहे. राज्यात दररोज ५० हजारांपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण होत आहे. शहर व ग्रामीण भागातही कोरोनाचे संक्रमण वाढलेले दिसत आहे. अशा गंभीर परिस्थितीत परीक्षा घेणे हे लाखो विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ केल्यासारखे होईल. विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी आग्रही मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
 
 
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यात सोमवारी सकाळी बैठक पार पडली. या बैठकीत दोन्ही परीक्षांचे वेळापत्रक बदलले जावे, अशी चर्चा दोन्ही मंत्र्यांमध्ये झाली आहे. राज्यात कोरोनाचा वाढता आलेख पाहता लॉकडाऊनचा निर्णयही प्रलंबित आहे. अशा स्थितीत मुलांच्या निर्णयाबद्दल काय होणार, जर वेळापत्रक नव्याने ठरवले तर तेव्हाच्या परिस्थितीत परिक्षा कशा घ्यायच्या, असे प्रश्न सरकारपुढे उभे आहेत. एखाद्या विद्यार्थ्याला परिक्षेच्या काळात कोरोनाची लागण झाली तर काय होणार, अशा अनेक मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली.
 
 
 
ज्या प्रमाणे एमपीएससीच्या परीक्षांबद्दल निर्णय घेण्यात आला होता. तसाच निर्णय राज्यात दहावी बारावीच्या विर्द्यार्थ्यांबद्दल घेतला जाईल, अशी शक्यता या बैठकीनंतर व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपूर्वी वर्षा गायकवाड यांनी ट्विट करत याबद्दलचे सुतोवाच केले होते. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबद्दल आणि आरोग्याबद्दल शिक्षण विभाग प्राधान्य देईल, असे आश्वासन त्यांनी केले होते. त्या पार्श्वभूमीवरच हा निर्णय घेतला जाऊ शकतो.
 
 
काँग्रेसतर्फे नाना पटोले यांनीही आपली बाजू मांडली आहे. नाना पटोले म्हणाले, कोरोनाच्या संकटामुळे वर्षभर ऑनलाईन शिक्षण सुरु ठेवून विद्यार्थ्यांचा या महामारीच्या धोक्यापासून बचाव करण्याचा प्रयत्न केला गेला. दहावी बारावीची परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याच्यादृष्टीने अत्यंत महत्वाची असते. पूर्वनियोजित वेळापत्रकाप्रमाणे बारावीची परीक्षा २१ एप्रिल तर दहावीची परीक्षा २९ एप्रिलपासून सुरू होईल असे जाहीर करण्यात आले होते. परंतु मागील दोन महिन्यात कोरोनाचे संक्रमण मोठ्या वेगाने वाढलेले आहे."
 
"राज्यातील सरकारी यंत्रणाही मोठ्या प्रमाणात कोरोना महामारीच्या संघर्षात लढा देत आहे. राज्य सरकार कडक निर्बंध लावून कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत असताना परीक्षा घेणे संयुक्तीत ठरणार नाही. दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता परीक्षेसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात एकत्र येणारे विद्यार्थी, पालक, शिक्षक, परिक्षेसाठी लागणारा इतर कर्मचारी वर्ग यांच्यासह अनेक घटक यावेळी संपर्कात येतात. यातून एख्याद्याला कोरोनाची लागण झाली तर त्यातून अनेकांना संक्रमण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सीबीएसई बोर्डाच्या परीक्षासुद्धा पुढे ढकलण्यासंदर्भात केंद्र सरकारला विनंती करावी.", असेही ते म्हणाले.
 
"महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची ११ एप्रिलची परीक्षा राज्य सरकारने पुढे ढकलली आहे. पहिली ते आठवीच्या परिक्षा रद्द करण्यात आल्या त्यानंतर ९ वी व ११ वीच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे आणि पालक तसेच बहुसंख्य विद्यार्थ्यांकडूनही बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी जोर धरू लागली आहे. एकीकडे कोरोनाचे संकट आणि दुसरीकडे अभ्यास अशा दुहेरी कात्रीत विद्यार्थी सापडले आहेत. याबाबात सरकारने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून तातडीने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर करावा ते सर्वांच्याच हिताचे होईल." असे पटोले म्हणाले.


 
@@AUTHORINFO_V1@@