निराधार वृद्धांचा प्रीत‘किनारा’

    दिनांक  12-Apr-2021 20:16:17
|

Kinara_1  H x W
 
 
 
समाजात अनेकदा आपल्याला निराधार, निराश्रित ज्येष्ठ नागरिक, वृद्ध आजी-आजोबा दिसतात. आपल्या मुलामुलींनी सांभाळावे, नातवंडांबरोबर लहान व्हावे आणि आयुष्याच्या संध्याकाळी आनंदाने जगावे, असे त्यांनाही वाटत असते. परंतु, दुर्दैवाने म्हणा किंवा अन्य काही कारणांनी त्यांच्या नशिबी वेदना आणि यातनाच येतात. अशाच ५० पेक्षा अधिक आजी-आजोबांना ‘किनारा वृद्ध आणि मतिमंद ट्रस्ट’च्या माध्यमातून सांभाळताहेत पुण्यातील अ‍ॅड. प्रीती वैद्य, तेही अगदी मुलीच्या मायेने!
आजारपण, मनोविकार, खासगीपणा, दोघांच्या मध्ये तिसरा-चौथा कशाला किंवा घरची आर्थिक दैन्यावस्था या आणि अशा कितीतरी कारणांमुळे पोटच्या मुलांनीच असंख्य ज्येष्ठ नागरिकांना म्हातारपणी बस-रेल्वे स्थानकावर, बाजारात-मंदिरात किंवा रुग्णालयात बेवारस सोडून दिल्याचे, घराबाहेर काढल्याचे वा वृद्धाश्रमात पाठवल्याचे आपण पाहतो. तसेच अनेकदा फसवणुकीने म्हणा किंवा मतिमंदपणा अशा कारणांमुळे म्हणा, अनेक ज्येष्ठ नागरिक स्वतःहूनच घरापासून दुरावतात. खरे म्हणजे आयुष्याच्या संध्याकाळी या व्यक्तींना आपल्या माणसाच्या आधाराची, प्रेमाची, आपुलकीची गरज असते, पण दुर्दैवाने ते त्यांना मिळत नाही. अशाच आजी-आजोबांना विनाशुल्क सांभाळण्याचे काम पुणे येथील प्रीती वैद्य (एमए, एलएलबी) आपल्या ‘किनारा वृद्ध व मतिमंद सेवा ट्रस्ट’च्या माध्यमातून करत आहेत. परंतु, ज्यांना घरचे कुणीच नाही, त्यांना आपले म्हणण्याची भावना प्रीती यांच्या मनात कशी निर्माण झाली? समाजाचे आपण देणे लागतो आणि समाजासाठी आपण काम केले पाहिजे, ही प्रेरणा प्रीती यांच्या मनात कशी निर्माण झाली?
 
 
 
प्रीती वैद्य मूळच्या खानदेशातील. परंतु, त्यांचे बालपण आणि शिक्षण झाले ते पुण्यात. शिक्षणानंतर त्यांनी संगीत शिक्षक म्हणून कामाला सुरुवात केली. पुढे विवाह झाला. मात्र, सर्व काही सुरळीत सुरू असताना त्यांच्या पतीला यकृताचा कर्करोग असल्याचे निदान झाले. दैनंदिन उपजीविकेबरोबरच पतीचा कर्करोग आणि त्यावरील महागड्या उपचारांचा खर्च करताना प्रीती यांचे वेतन अपुरे पडू लागले. खर्च भागवण्यासाठी त्यांनी घरीच शिकवणी घ्यायला सुरुवात केली. असे आयुष्य सुरू असताना अचानक एके दिवशी पतीची प्राणज्योत मालवली आणि प्रीती वैद्य यांच्या जीवनात अंधार दाटला. २००९ साली ही घटना घडली आणि जगायचे कसे? कशासाठी? कोणासाठी? या प्रश्नांनी त्यांना अक्षरश: भंडावून सोडले. दरम्यान, पतीनिधनापूर्वी प्रीती वैद्य यांनी एका वृद्धाश्रमाला भेट देऊन तिथली संपूर्ण परिस्थिती पाहिली होती. मुला-मुलींनी पैसा किंवा शुल्क देऊन म्हातार्‍या आई-वडिलांना वृद्धाश्रमात ठेवल्याचे पण त्यांच्यासाठी वेळ काढू शकत नसल्याचे जळजळीत वास्तव त्यांना दिसले. वृद्ध आजी-आजोबांच्या चेहर्‍यावरील दुःख पाहून प्रीती वैद्य यांनी त्यांच्यासाठी काम करण्याचे ठरवले आणि पतीच्या मृत्यूनंतर त्यांनी ही इच्छा आपल्या आई-वडिलांना सांगितली.
 
 
तथापि, प्रीती यांच्या आई-वडिलांची परिस्थितीही काही फार चांगली नव्हती. जेमतेम खाऊन-पिऊन सुखी असे घर, वडील कामगार म्हणून, तर आई गृहिणी म्हणून जीवन जगणारी. तरीही त्यांनी मुलीची इच्छा समजून घेतली व विनाअडथळा कामाला सुरुवात करून दिली. पतीनिधनानंतर पुण्यातील रुपीनगर परिसरातील १२ बाय १० स्क्वेअर फुटाच्या घरात प्रीती आपल्या आई-वडिलांसह राहू लागल्या. इथेच त्यांच्या वृद्ध आजी-आजोबांच्या सेवेची सुरुवात झाली. प्रथमतः एक, नंतर दोन, तीन अशाप्रकारे गरजू वृद्ध व्यक्ती त्यांच्याकडे येत गेल्या आणि प्रीती यांचे नावही होऊ लागले. प्रारंभी त्यांनी पैसे घेऊन वृद्धांना सांभाळले. मात्र, नंतर एका घटनेने त्यांचा ज्येष्ठांच्या सेवेचा आणि आयुष्याचाही मार्ग बदलला. २०१२ मध्ये पिंपरीतील एका रुग्णालयातून प्रीती यांना एक फोन ‘कॉल’ आला व त्या तिथे गेल्या. रुग्णालयात गेल्यानंतर प्रीती यांना तिथे एक आजोबा अंथरुणाला खिळलेल्या अवस्थेत दिसले आणि त्यांच्या दारिद्य्रावस्थेमुळे कोणतेही वृद्धाश्रम त्यांना विनाशुल्क स्वीकारण्यास तयार नव्हते. त्याचवेळी प्रीती यांनी विचार केला की, जर आपण आपल्या वृद्धाश्रमात या आजोबांना ठेवून घेतले तर?
 
 
विचाराचे रूपांतर कृतीत झाले आणि प्रीती यांनी संबंधित ज्येष्ठ नागरिकाला आपल्या वृद्धाश्रमात कोणतेही पैसे न घेता आणले व त्याची प्रसिद्धीही झाली. वृत्तपत्रात ही बातमी प्रकाशित झाल्याने अनेकांनी त्यांना पाठिंबा देत त्यांचे कौैतुक केले. परंतु, ही फक्त सुरुवात होती. नंतर त्यांनी रस्त्यावर आढळणार्‍या किंवा निराधार वृद्धांना आधार द्यायला प्रारंभ केला. सध्याच्या युगात माणुसकीच नव्हे, तर कौटुंबिक नातीही दुरावताना दिसतात, तसेच बहुतांश घरात ज्येष्ठ व्यक्तींना ओझे किंवा अडगळ म्हणूनच समजले जाते. ‘किनारा वृद्धाश्रमा’त येणारे किंवा आणले जाणारे वृद्ध आजी-आजोबा हे त्याचे दुर्दैवी उदाहरण. घरातून बाहेर काढल्यानंतर केवळ वेदना आणि यातनांचीच त्यांना सोबत असते. परंतु, प्रीती वैद्य यांनी आपल्या संस्थेच्या माध्यमातून वेदना विसरायला लावून या वृद्धांच्या चेहर्‍यावर हसू फुलवण्यासाठी काम केल्याचे दिसते. इथे सर्व सोयी-सुविधा देऊन, विविध सणोत्सव साजरे करून या आजी-आजोबांचे प्रेमाने संगोपन केले जाते. आपल्या मुला-मुलींच्या, नातू-पतवंडांच्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या वृद्ध आजी-आजोबांना मुलाच्या मायेने सांभाळले जाते. ‘किनारा वृद्धाश्रमा’त सध्या 50 पेक्षा अधिक आजी-आजोबा असून त्यात अंध, दिव्यांग, आजारी, बोलता-ऐकता न येणारे, परावलंबी, निराधार, पोलिसांमार्फत येणारे, सरकारी दवाखान्यामार्फत पाठवले जाणारे, दारिद्य्ररेषेखालील गरजू, दुष्काळी भागातील, वृद्धाश्रमाच्या शोधमोहिमेत सापडलेले आणि स्वतःहून आलेल्या अशा सर्वच प्रकारच्या ज्येष्ठांचा समावेश आहे. सोबतच आर्थिक परिस्थिती ठीक नसलेल्या, परंतु कुटुंबीय असलेल्या आजी-आजोबांना अत्यल्प शुल्क आकारूनही इथे प्रवेश दिलेला आहे.
 
 
दरम्यान, काही काही वेळा मरणासन्न अवस्थेतील वृद्धही इथे आणले जातात. तसेच इथल्या ज्येष्ठांपैकी कोणी दगावल्यास त्यांचे अंत्यविधी वृद्धाश्रमामार्फतच केले जातात, सोबतच शक्य असेल तर त्यांचे नेत्रदान वा अवयवदानही करण्यात येते. सध्या ‘किनारा वृद्ध व अपंग संस्थे’चे पुण्यातील निगडी आणि लोणावळ्याजवळील कामशेत परिसरात दोन वृद्धाश्रम आहेत. रोजच्या वैद्यकीय तपासण्यांपासून ज्येष्ठांच्या मनोरंजनासाठी विविध कार्यक्रम, सहली, नववर्ष स्वागतादी उपक्रमही इथे आयोजित करण्यात येतात. परंतु, संस्थेकडे सध्या असलेली जागा अपुरी असून समाजात गरजूंची संख्या अधिक आहे, त्यामुळे वृद्धाश्रमाला मदतीचीही नितांत आवश्यकता आहे. किमान एक हजार वृद्ध व्यक्तींना सांभाळण्याची प्रीती वैद्य यांची मनिषा आहे.
 
 
आतापर्यंत शासनाच्या कोणत्याही मदतीशिवाय चालू असलेल्या ‘किनारा’ संस्थेला वायसीएम रुग्णालयातील समाजसेवक, ‘रियल लाईफ, रियल पीपल’चे संस्थापक एम. हुसेन आणि महादेव बोत्रे, ‘टाटा मोटर्स’चे कर्मचारी, पोलीस, समाजातील सजग नागरिकांनीच मदत केलेली आहे. संस्था ‘८० जी’ अंतर्गत नोंदणीकृत असल्याने देणगीदारांना आयकरात ५० टक्के सवलतही मिळते. दरम्यान, प्रीती वैद्य यांना या कार्याबद्दल अनेक सामाजिक संस्था व विविध संघटनांनी पुरस्कारही दिलेले आहेत. जसे की, ‘लायन्स क्लब ऑफ पुणे’ यांचा ‘फिनिक्स भरारी अवॉर्ड’, ‘रोटरी क्लब ऑफ चिंचवड’चा ‘सेवा गौरव पुरस्कार’, ‘सिद्धी फाऊंडेशन’चा पुरस्कार, ‘गया फाऊंडेशन’ व ‘मराठवाडा विकास प्रतिष्ठान, पुणे’चा पुरस्कार, ‘नेहरू युवा केंद्र पुणे’चा पुरस्कार, अकरावे अ. भा. स्त्री साहित्य, कला संमेलनाचा ‘स्वानंद भरारी पुरस्कार’, ‘चिंचवड देवस्थान’चा पुरस्कार आणि ‘समाजभूषण पुरस्कार’! अर्थात, पुरस्कार मिळणे हा काही कोणत्याही सामाजिक कार्याचा मुख्य उद्देश असू शकत नाही. परंतु, यामुळे संबंधित व्यक्तीला आपले काम करण्याचा हुरुप नक्कीच येतो, तसेच केलेल्या कामाची पोचपावतीही मिळत असते. अशा गरजवंतांच्या सेवेचा वसा घेतलेल्या आणि सामाजिक कार्यात स्वतःचा ठसा उमटवणार्‍या प्रीती वैद्य यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’चा सलाम!
 
यशाचा मूलमंत्र
 
 
 
देवाने आपल्याला आजी-आजोबांची सेवा करण्याची संधी दिली. जणू काही देवाने हे कार्य करण्यासाठी माझी निवड केली आणि आपण आपले काम सर्वांठायी देवत्व या भावनेनेच केले पाहिजे. मी देवाचेही यासाठी आभार मानते. तसेच आई-वडील व समाजाच्या पाठिंब्याने इथपर्यंत पोहोचू शकले.
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.