जय ‘महा’भकास!

11 Apr 2021 22:45:20

Sanjay Raut _1  



संजय राऊत यांना दिव्यशक्ती आहे. वरळीला निवडणुकांपूर्वीच्या सभेत ते म्हणाले होते की, आता लोक ‘हाऊडी मोदी’ म्हणत आहेत. पण पुढची निवडणूक जिंकल्यानंतर लोक ‘हाऊडी आदी’ म्हणतील. त्यांचे म्हणणे अक्षरश: खरे ठरले. महाविकास आघाडीचे सरकार लोकांचा आदेश धुडकाऊन महाराष्ट्रात ‘खलनायक’ पद्धतीने अवतीर्ण झाले. त्यात काहीहीअनुभव नसताना थेट आदित्य ठाकरेंना मंत्री करण्यात आले. मग काय? ‘नाईट लाईफ’चा हट्ट धरणे, पुढे दिशा आणि सुशांतच्या मृत्यूनंतर अखत्यारित नसणार्‍या खात्यांची बैठक घेणे हे सगळे सुरू झाले. हे सगळे पाहून लोक आश्चर्याने, संतापाने आणि दु:खाने आणि भीतीनेही ‘हाऊ दी आदी’ म्हणू लागले. इतकेच काय? हेच संजय राऊत म्हणाले की, “डॉक्टरांना काय कळतंय? मी तर ‘कंपाऊंडर’कडून औषध घेतो.” तसेच ते म्हणाले, “मुख्यमंत्र्यांना ‘डब्ल्यूएचओ’पेक्षाही कोरोनातले जास्त कळते.” या सगळ्यांचा एकत्रित परिणाम असा झाला की, कोरोना झाला तरी लोक घरात लपवून ठेऊ लागले. त्यांनाही कदाचित वाटले असेल, डॉक्टरांना काय कळते? तसेच मुख्यमंत्री ‘डब्ल्यूएचओ’पेक्षाही जास्त कोरोनाज्ञानी आहेत म्हणून कुटुंबीयांना कोरोना झाल्यानंतरही ते जनतेसाठी सुदृढ राहिले. असो, महाराष्ट्रात कोरोनाचा हैदोस आहे. त्यातच सरकारी मंत्र्यांचे 100 कोटींचे ‘टार्गेट.’ पोलीस खात्यातील माणसालाच ‘टार्गेट’ दिले की, आरोग्य खात्यालाही असे काही ‘टार्गेट’ दिले असावे? या शंकेने महाराष्ट्राची जनता हवालदिल आहे. तसेच आपल्या मनमानी आणि लूटमारीच्या कारकिर्दीविरोधात जनता रस्त्यावर उतरू नये यासाठी ‘लॉकडाऊन’ आहेच. ‘लॉकडाऊन’मुळे सात पिढ्या मज्जा करू शकतील, इतकी संपत्ती असलेले लोक तरतील बाकीचे तर मृत्यूची भीकच मागतील. ‘लॉकडाऊन’मध्ये केंद्र सरकारकडून मिळालेले तांदूळ असो की ‘कोविड’ची लस सगळे अर्ध्यात गायब. अन्नधान्य, ‘कोविड’ लस कुठे गेली विचारायचे नाही बरं का? अशा स्थितीत महाराष्ट्रापर्यंत काहीही चांगले पोहोचणार नाही. त्यामुळे प्रकाश जावडेकरांनी काही चांगले सांगितले तर लोकांपर्यंत पोहोचणारच नाही. म्हणून दिल्लीत बसून प्रकाश जावडेकर देत असलेल्या ज्ञानामृताची महाराष्ट्राला गरज नाही, असे संजय राऊत म्हणाले असावेत. जय ‘महा’भकास!



राजू, बच्चू सुधारा!


बच्चू कडू नावातच ‘कडू’ आहे. त्यामुळे कामही तसेच असेल कडूभंगार. या महाशयांनी एका गरीब आचार्‍याला मारले. का? तर जेवण निकृष्ट होते. चव नव्हती. आचार्‍याला जेवढे सामान पुरवले जाते त्यातच त्याला अन्न शिजवावे लागते. जेवण अधिक रूचकर बनावे म्हणून त्याने काय स्वत:च्या खिशातून पैसे टाकायचे का? नेतागिरीच्या नशेत बच्चू कडूंना वाटते, आपण काहीही केले तरी काय होणार आहे? यथा राजा तशा प्रजा. दोन वर्षांत राज्यात किती खून झाले? किती भ्रष्टाचार झाले? उठसूठ संविधानाचा गजर करणार्‍या मुंडेंनी दोन पत्नी आणि परत एका महिलेवर बलात्कार करण्याचे आरोप आहेत. संजय राठोड यांच्यावर वयाने अर्ध्या असलेल्या मुलीच्या हत्येचा आरोप आहे. अनिल देशमुख, अनिल परब यांच्यावरही इतर आरोप. आरोप यासाठी म्हणायचे की, झालेल्या गुन्ह्याची झाकपाक करण्याची संधी राज्य सरकारने सोडली नाही. बुद्धिबळाच्या डावासारखे राज्य सरकारचे मंत्री बाद होत आहेत. पण त्याचे परिणाम भोगत आहे जनता. बच्चू कडूंना वाटले की, आपण तर काय केले? एका गरीब दुबळ्या आचार्‍याला त्याची चूक नसताना मारले. त्यात काय एवढे? बच्चू कडूंना शासन झालेच पाहिजे. पण या राज्य सरकारमध्ये बच्चू सहिसलामत नेतागिरी करत राहणार हे नक्की! दुसरीकडे राजू शेट्टी म्हणतात, महाराष्ट्रातील ‘कोविड’ लस कमतरता थांबली नाही तर आम्ही ‘सीरम’मधून एकही ट्रक बाहेर पडू देणार नाही. कदाचित राजूंना ‘सीरम’ म्हणजे उसाचा प्रकार किंवा भाजीपाला किंवा दुधाचा क्रेट वाटला असेल. ‘कोविड’ लस ही राष्ट्रीय संपत्ती आहे. या लसीचे वाटप कुठे आणि कधी करावे याचे काही नियम आहेत. उगाच आले मनात आणि वाटली लस असे नसते. ‘सीरम’चा ट्रक अडवण्यापेक्षा किंवा गरीब आचार्‍याला मारण्यापेक्षा राजू आणि बच्चू यांनी महाराष्ट्राची सेवा केली असती तर? भ्रष्ट आणि खुनी नेत्यांना जाब विचारला असता तर? पण छे! त्यासाठी असलेली संवेदनशीलता, सत्य आणि न्यायप्रियता, जनतेची कणव आणि माणुसकी राजू आणि बच्चू दोघांकडेही नाही. गुंडगिरी भ्रष्टाचार करून किंवा फसवून नेता होता येते, हे समीकरण काही लोकांचे असते, पण हे समीकरण पार काळ टिकत नाही. राजू, बच्चू सुधारा!
Powered By Sangraha 9.0