मुंबई : राज्य लसींच्या पूर्तव्यावरून केंद्र विरुद्ध राज्य सरकार वाद शिगेला पोहोचला आहे. राज्यात अनेक ठिकाणी लसी नसल्याचे कारण देऊन लसीकरण ठप्प झाल्याचे चित्र आहे. मात्र केंद्र सरकार गरजेनुसार राज्यांना लसीचा पुरवठा करत असल्याचे सांगत आहे. यावरूनच आता भाजप मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी लसीकरण सुरु झाल्यापासून लसी नेमकं कोणाकोणाला देण्यात आल्या याचा हिशोब राज्य सरकारने मांडावा अशी मागणीच केली आहे.
केशव उपाध्ये म्हणतात,"महाराष्ट्र लसींचा तुटवडा असल्याचं संकट हे महाविकास आघाडी निर्मित संकट आहे. लसीकरण सुरू झाल्यापासून गेल्या दोन महिन्यांमध्ये नेमक्या कोणाला लसी दिल्या गेल्या आहेत? खरोखर पात्र असणाऱ्या आणि निकषात बसणाऱ्यांनाच लसी देण्यात आल्या की नियम, अटीत बसणाऱ्यांना लसी दिल्या गेल्या याचा हिशोब महाविकास आघाडी सरकारने दिला पाहिजे. पहिली आत होती ६० पेक्षा अधिक वर्षे वय असणाऱ्यांना आणि फ्रंटलाईन वर्कर्स ना लस देणे त्याकाळात काही लाडक्या लोकांना लसी देण्यात आल्या का ? नियम मोडून कोणाला लसी देण्यात आल्या का? दुसऱ्या टप्प्यात ४५ वर्षांवरील नागरिकांना लस देण्यात आल्या, त्याकाळात नियम मोडून काही लसी देण्यात आल्या का याचा हिशोब सरकारने द्यावा. तसेच ३ लाख लसी सरकारने राखीव ठेवल्या आहेत त्या का ठेवल्या आहेत ? असा सवालही उपाध्ये यांनी उपस्थित केला आहे.