"सर्वच सामने खेळण्याची सक्ती नाही"

01 Apr 2021 13:46:17

Virat Kohli_1  
 
 
मुंबई : कोरोना महामारीनंतर मोठ्या ब्रेकनंतर क्रिकेट स्पर्धांना सुरुवात झाली. मात्र, आता सर्वच स्पर्धांचे नियोजन हे सलग असल्याने खेळाडूंवर परिणाम होऊ शकतो असे विराट कोहलीने म्हंटले होते. यावर आता बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याकडून, "सर्वच सामने खेळण्याची सक्ती बीसीसीआयने कोणावर केलेली नाही." असे उत्तर देण्यात आले आहे. त्यामुळे आता विराट विरुद्ध बीसीसीआय असा वाद निर्माण होतो का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
 
 
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यानंतर नाराजीचा सूर आवळला होता. भविष्यात वेळापत्रक तयार करताना काळजीपूर्वक विचार करण्याची गरज आहे. एकाच वेळी सर्व खेळाडूंकडून मानसिक कणखरतेची अपेक्षा तुम्ही करू शकत नाही. तुम्हाला त्यात थोडे बदल करावे लागतात, असे परखड मत विराटने व्यक्त केले होते.
 
 
 
यावर आता एका वृत्त संस्थेशी बोलताना बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की, "खेळाडूंनी सर्व सामने खेळावे, अशी सक्ती बीसीसीआयने कधीच केली नाही. कोरोना विषाणूचे संकट लक्षात घेऊन वेळापत्रकाची आखणी केली गेली आहे. पुढे काय होईल, याची हमी कोणीच देऊ शकत नाही. संघामधील खेळाडूंचे सामर्थ्य पाहता, जर एखाद्या खेळाडूला विराम हवा असेल किंवा आराम करायचा असेल, तर तो घेऊ शकतो. बीसीसीआयने तो निर्णय खेळाडूंवर सोडला आहे." असे स्पष्ट केले.
Powered By Sangraha 9.0