मुक्तकार्यकर्ते ‘मुक्तेश्वर’

09 Mar 2021 21:13:53

Mukteshwar_1  H


अभिलाषाविरहित कार्य करणारे मुक्तेश्वर मुनशेट्टीवार यांच्या कार्याविषयी...
 
 
आजच्या सामाजिक परिस्थितीत कार्यकर्ता असणे हे अनेकांना प्रतिभेचे आणि सन्मानाचे पद वाटत असते. मात्र, कोणत्याही अभिलाषेशिवाय सतत कार्य करणारा, सामाजिक जाणिवा समृद्ध असणारा आणि त्या जपणारा कार्यकर्ता आजच्या घडीला सहज सापडणे तसे कठीण. नाशिक येथील मुक्तेश्वर मुनशेट्टीवार हे या अर्थाने कार्य करणारे कार्यकर्ते ठरतात. दृष्टिबाधित, विधी संघर्षित बालक, बाबा आमटे यांचे कार्य, राज्य सरकारी कर्मचारी युनियन, वसंत व्याख्यानमाला, लोकहितवादी मंडळ अशा अगणित माध्यमांतून मुनशेट्टीवार यांचा कार्यकर्ता म्हणून मुक्तसंचार नाशिककर नागरिकांना कायमच अनुभवास येत असतो.
 
चंद्रपूर जिल्ह्यातील मुल या गावातील मुनशेट्टीवार यांचे शिक्षण विदर्भात पार पडले. १९६५ मध्ये वडिलांच्या बदलीमुळे मुनशेट्टीवार नाशिककर झाले. त्यानंतर पाटबंधारे खात्यात त्यांनी अनेक वर्षे सेवा केली. त्यावेळी काही करणास्तव पदवीप्राप्तीचे स्वप्न त्यांनी वयाच्या ७५व्या वर्षी पूर्ण केले. नोकरी काळात त्यांनी र. ग. कर्णिक यांच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या राज्य सरकारी कर्मचारी युनियनचे काम करत आपल्या कार्याचा डंका अवघ्या राज्यात गाजविला. निवृत्तीपश्चात आजही ते या युनियनचे कार्य त्याच हिरिरीने करत आहेत. या माध्यमातून ११ ऑगस्ट, १९६६ रोजी राज्यात पुकारण्यात आलेला पहिला संपदेखील यशस्वी झाला. सामाजिक दायित्वाच्या भावनेतून नाशिक जिल्ह्यातील सावरगाव दत्तक घेत, तेथे लोकोपयोगी प्रकल्प राबवत गावाचा पाणी, वीजप्रश्न सोडविण्यात युनियनच्या माध्यमातून मुनशेट्टीवार यांनी मोलाचे कार्य केले.
 
मुनशेट्टीवार यांचे वय वर्ष नऊ असताना १९५२ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील मारोड गावास आग लागली व या गावातील निम्मेगाव जाळून खाक झाले. त्यावेळी सरकारी व काही स्वयंसेवी संस्था या मदतीसाठी गावात पोहोचल्या. त्यांना आपल्या कार्यात मदत करण्याचे काम मुनशेट्टीवार यांनी हाती घेतले. येथूनच त्यांच्या सामाजिक कार्याचा खऱ्या अर्थाने श्रीगणेशा झाला. तसेच, यावेळी त्यांनी ‘युनिसेफ’मार्फत करण्यात येणाऱ्या मदतकार्यातही साहाय्यकारी भूमिका बजावली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शाखेशी परिचय असल्याने व संघप्रणित शाळा व महाविद्यालयात शिक्षण घेण्याचे सौभाग्य मिळाल्याने सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे संस्कार अधिक वृद्धिंगत होत गेल्याचे मुनशेट्टीवार आवर्जून नमूद करतात. तेव्हाचे नील सिटी हायस्कूल व आताचे दादासाहेब धनवटे हायस्कूल, महाल व मोहता सायन्स कॉलेज, रेशीमबाग येथे त्यांचे शिक्षण झाले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत, याचा मुनशेट्टीवार यांना आजही सार्थ अभिमान आहे.
 
 
नाशिकमध्ये आल्यावर १९६७ मध्ये मुनशेट्टीवार यांनी वसंत व्याख्यानमालेच्या माध्यमातून कार्य करण्यास सुरुवात केली. पुढे ३५ वर्षे विविध पदे भूषवित नाशिककर नागरिकांना अनेक वक्त्यांचे विचार ऐकण्याची संधी उपलब्ध करून देण्यात मोलाची भूमिका बजावली. काही वेळा आमंत्रित वक्त्यांना मानधन देण्यासाठी त्यांनी आपल्या पत्नीचे स्त्रीधन गहाण ठेवून आर्थिक पूर्ततादेखील केली आहे. त्याचवेळी त्यांचा कुसुमाग्रज यांच्याशी जवळचा संपर्क आला. त्यातून कुसुमाग्रज यांनी स्थापन केलेल्या ‘लोकहितवादी मंडळा’चे कार्यदेखील ते करू लागले. विविध प्रकारची वैचारिक धारणा असलेल्या नागरिकांशी येणारा संपर्क व स्वतः गरिबीचे चटके सहन केल्याने मध्यमवर्गीय व निम्न मध्यमवर्गीयांचे दु:ख खऱ्या प्रगल्भतेने मुनशेट्टीवार समजत होते. त्यामुळे भटक्या विमुक्त जाती-जमातीसाठी कार्य करत त्यांनी त्यांच्या समस्यांना वाचा फोडली. तसेच, या प्रवर्गातील साहित्यिकांना स्थान मिळावे व संस्कृतीचा जागर व्हावा यासाठी दहा वेळेला भटक्या विमुक्त साहित्य संमेलनाचे यशस्वी आयोजन नाशिक जिल्ह्यात केले.
 
विविध पातळीवर कार्य करत असताना मुनशेट्टीवार यांचा १९९४ मध्ये ‘नॅब’ (नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंड)शी संबंध आला. तेव्हापासून ते आजतागायत ते ‘नॅब’चे सहसचिव म्हणून अखंडित सेवा बजावत आहेत. कुसुमाग्रज हयात असताना दृष्टिबाधित बांधवांची प्रत्येक दिवाळी ही कुसुमाग्रज यांच्या घरी साजरी करण्यात येत असे. दृष्टिबाधितांना पारंपरिक व्यावसायिक शिक्षण देण्याबरोबरच ‘प्लंबिंग’, ‘मसाजिस्ट’ यांचे शिक्षण देण्याचे धोरण मुनशेट्टीवार यांनी अंगीकारले. त्यामुळे जवळपास १६ दृष्टिबाधित ‘प्लंबर’ व ‘मसाजिस्ट’ आज आपला व्यवसाय करत आहेत. ‘बी.एड.’ व ‘डी.एड.’चे विशेष शिक्षण या दृष्टिबाधित बांधवांना उपलब्ध करून देण्यात मुनशेट्टीवार यांचे मोलाचे योगदान आहे. कीबो, ग्राफाईट व सारा या अत्याधुनिक मशीनच्या माध्यमातून दृष्टिबाधितांना विविध भाषांतील पुस्तके वाचण्याची अत्याधुनिक सुविधा मुनशेट्टीवार यांनी उपलब्ध करून दिली आहे.
 
आगामी काळात दिव्यांगांसाठी विद्यापीठ साकारण्याचा मुनशेट्टीवार यांचा मानस आहे. याशिवाय जिल्हा कारागृहातील कैदी, अभिक्षणगृहातील विधी संघर्षित बालके यांना त्यांच्या जीवनाची चुकलेली दिशा दाखवून त्यांच्या पंखात सन्मानजनक जीवन जगण्याचे बळ निर्माण करण्याचे कार्य मुनशेट्टीवार करत आहेत. नुकतीच त्यांची यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागाच्या समुपदेशन अभ्यासक्रम मंडळावर नियुक्ती झाली आहे. बाबा आमटे, गाडगे महाराज, रा. स्व. संघ असा त्रिवेणी संगम प्राप्त झालेल्या मुनशेट्टीवार यांच्या आगामी कार्यास दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!
 
Powered By Sangraha 9.0