निखळ मनोरंजनाचा अखेरचा शिलेदार

    07-Mar-2021
Total Views |

sudhir moghe_1  


रंगभूमीवर प्रभाव असला तरी आपल्या अभिनयात, भूमिकेत राजकीय रंग बेमालूमपणे मिसळण्याची जी काही पद्धत आता सुरू झाली आहे, त्यात श्रीकांत मोघे नव्हते. किंबहुना, श्रीकांत मोघे व त्यांच्या काळातील कलाकारांची संपूर्ण पिढी रंगदेवतेलाच आपले श्रद्धास्थान मानणार्‍यांपैकी होती. निखळ मनोरंजन हाच गाभा असणार्‍या कालखंडाचे ते प्रवासी होते.


रंगभूमी, चित्रपट आणि दूरचित्रवाणी माध्यमातून विविधांगी अभिनयप्रवास करत रसिक प्रेक्षकांना मनमुराद आनंद देणार्‍या नटश्रेष्ठ श्रीकांत मोघे यांची प्राणज्योत शनिवारी मालवली. सातारा जिल्ह्यातील किर्लोस्करवाडीत अभिनेते श्रीकांत मोघे यांचा जन्म झाला होता. पण, अभिनयाबरोबरच बालवयात त्यांना कुस्तीचाही शौक होता व त्यात त्यांना पारितोषिकही मिळाले होते. पुढे शालेय व विद्यालयीन शिक्षणानंतर त्यांनी पुण्याच्या स. प. महाविद्यालयातून विज्ञान शाखेतून पदवी मिळवली व याच काळात पुणे ‘आकाशवाणी’ केंद्रावर एकांकिका, काव्यवाचन, भावगीतगायन ते करत असत. सोबतच ‘गोवा मुक्ती संग्रामा’त पंडित जितेंद्र अभिषेकींची गीतेही त्यांनी ‘आकाशवाणी’वरून गायली. मात्र, पदवीनंतर ते पुन्हा किर्लोस्करवाडीला गेले व तिथे त्यांनी वर्षभर नोकरीही केली. दरम्यान, श्रीकांत मोघे दिल्ली ‘आकाशवाणी’ केंद्रावरून मराठी बातम्या देण्यासाठी दिल्लीलाही गेले होते. तिथे गेल्यानंतरही त्यांच्यातला कलाकार शांत बसला नाही व श्रीकांत मोघे यांनी हिंदी नाट्यसंस्थांच्या नाट्यप्रयोगात काम सुरू केले. ‘मिट्टी की गाडी’ नाटकाचे सूत्रधार तर ‘और भगवान देखता रहा’ यासह इतरही नाटकांत त्यांनी भूमिका केल्या व त्याचे कौतुकही झाले. त्यानंतर ते स्थापत्यशास्त्राच्या अभ्यासासाठी मुंबईला परतले आणि रंगभूमी व चित्रपटक्षेत्रातील त्यांची मुशाफिरी बहरू लागली.

अष्टपैलू कलाकार पु. ल. देशपांडे यांच्या विविध नाट्यप्रयोगांतून श्रीकांत मोघे यांचे व्यक्तिमत्त्व सर्वांसमोर प्रामुख्याने आले. स्पष्ट शब्दोच्चार, नेमकी संवादफेक, दांडगी स्मरणशक्ती, सहजसुंदर अभिनयाने साकारलेल्या विविध व्यक्तिरेखा, आपल्या भाषा आणि देहबोलीतून त्यांनी जीवंत केल्या. स्वतःचे ‘मी’पण पुसून व्यक्तिरेखा ठसठशीतपणे साकारणे, ही त्यांची खासियत होती व यामुळेच मराठी रंगभूमीवरील श्रीकांत मोघे यांच्या यशाचा आलेख सदैव चढताच राहिला. ‘अंमलदार’मधील सर्जेराव, ‘तुझे आहे तुजपाशी’मधील सतीश, राजेश व श्याम, ‘वार्‍यावरची वरात’मधील बोरटाके गुरुजी, शिरपा, शाहीर, ‘लेकुरे उदंड झाली’मधील राजशेखर, ‘सीमेवरून परत जा’मधील सिकंदर, पोरस, ‘संकेत मिलनाचा’मधील तो, ‘नवी कहाणी स्मृती पुराणी’मधील यशवंत, ‘गारंबीचा बापू’मधील बापू, ‘अश्वमेध’मधील गिरीश, यासारख्या कितीतरी आशयघन नाटकांतील दर्जेदार भूमिकांतून त्यांनी अभिनयाची छाप सोडली. तर ‘प्रपंच’मधील शंकर, ‘सिंहासन’मधील गुलछबू आमदार आणि ‘मधुचंद्र’, ‘शेवटचा मालुसरा’, ‘आम्ही जातो अमुच्या गावा’, ‘हा खेळ सावल्यांचा’, ‘उंबरठा’, ‘या सुखांनो या’ आदी चित्रपटांतील नायक व खलनायकाच्या त्यांच्या भूमिका गाजल्या.

श्रीकांत मोघे यांनी रंगभूमी आणि चित्रपटाबरोबरच ‘अजून चांदरात आहे’, ‘अवंतिका’, ‘उंच माझा झोका’, ‘भोलाराम’ या दूरचित्रवाणीवरील मालिकांतही काम केले, तर ‘स्वामी’ या लोकप्रिय मालिकेतील राघोबादादाची भूमिका वठवतानाच त्यांनी निर्मिती व दिग्दर्शन साहाय्यदेखील केले होते.दरम्यान, भारत सरकारच्या संगीत नाटक अकादमीत प्रवेश मिळवण्यासाठी श्रीकांत मोघे सुरुवातीच्या काळात दिल्लीलाही गेले होते. तथापि, त्यांना अकादमीच्या चमूत प्रवेश मिळाला नाही. मात्र, प्रतिष्ठित संस्थेत नाट्यकलेचे औपचारिक शिक्षण न घेऊनही श्रीकांत मोघे यांची रसिक प्रेक्षकांतील लोकप्रियता आणि त्यांना मिळालेले विविध सन्मान, पुरस्कार पाहता त्यांच्या अंगभूत कलाकौशल्याचीच प्रचिती येते. उत्तम ग्रहणशक्ती, उपजत अभिनय क्षमता, भूमिकेतील समरसतेमुळे श्रीकांत मोघे यांच्या अभियनाला रसिक प्रेक्षकांची वाहवा मिळाली, सोबतच अनेक पुरस्कारांवर त्यांनी आपले नाव कोरले. १९५१-५२ सालच्या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेमध्ये ‘अंमलदार’ नाटकासाठी ‘वाळवेकर स्मृती पुरस्कारा’ने, तर १९५५सालच्या महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेमध्ये ‘अपूर्व बंगाल’ नाटकातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्काराने श्रीकांत मोघे यांना सन्मानित करण्यात आले होते. मराठी चित्रपटसृष्टीतील प्रदीर्घ योगदानासाठी ‘महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्कार’, महाराष्ट्र शासनाचा ‘कलागौरव पुरस्कार’, ‘काशीनाथ घाणेकर पुरस्कार’, ‘केशवराव दाते पुरस्कार’, ‘अखिल भारतीय नाट्य परिषद पुरस्कार‘, ‘गदिमा पुरस्कार’, तर रंगभूमीवरील योगदानासाठी ‘नानासाहेब फाटक पुरस्कार’, महाराष्ट्र शासनाच्या ‘प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कारा’सह अनेक पुरस्कारांनी त्यांचा सन्मान करण्यात आला होता. सोबतच २०१२ सालच्या सांगलीतील ९२ व्या ‘अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलना’चे अध्यक्षपद श्रीकांत मोघे यांनी भूषविले होते.


दरम्यान, अनेकानेक नाटके, चित्रपट व मालिकांतील अभिनय, ‘पुलकित आनंदयात्री’ या रसिक प्रेक्षकप्रिय एकपात्री प्रयोगासाठी देशविदेशातील भ्रमण, कितीतरी राज्य व राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार आणि सन्मान मिळूनही श्रीकांत मोघे रंगभूमीशी, अभिनयाशी एकनिष्ठ राहिले. रंगभूमीवर प्रभाव असला तरी आपल्या अभिनयात, भूमिकेत राजकीय रंग बेमालूमपणे मिसळण्याची जी काही पद्धत आता सुरू झाली आहे, त्यात ते नव्हते. किंबहुना, श्रीकांत मोघे व त्यांच्या काळातील कलाकारांची संपूर्ण पिढी रंगदेवतेलाच आपले श्रद्धास्थान मानणार्‍यांपैकी होती. निखळ मनोरंजन हाच गाभा असणार्‍या कालखंडाचे ते प्रवासी होते. अनैतिक संबंध, राजकीय धूळफेक, अश्लीलता, आत्यंतिक हिंसा या घटकांशिवाय कुटुंबप्रधान मनोरंजन देण्याचा जो काही काळ होता, त्याचे ते अखेरचे शिलेदार होते, असे म्हणायला हरकत नाही. परिणामी, सर्वसामान्य जनतेच्या मनातही कलाकाराची प्रतिमा कोणत्याही किंतु, परंतुशिवाय उत्तुंगच उमटत असे. रंगभूमी, चित्रपट वा मालिकेतील कलाकाराकडे कलाकार, अभिनेता म्हणूनच पाहिले जात असे. श्रीकांत मोघे यांची अभिनय क्षेत्रातील संपूर्ण कारकिर्द या पार्श्वभूमीवर कलाकार म्हणून झळाळून दिसते. अशा कसदार व लोकप्रिय कलाकाराला दै. ‘मुंबई तरुण भारत’ची श्रद्धांजली.