स्त्रीशक्तीची ‘उज्जवल’ दिशा : डॉ. उज्ज्वला बर्दापूरकर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

डॉ. उज्ज्वला बर्दापूरकर_1


महिलांनी ‘अबला’ म्हणून नाही तर सशक्त होत समाजात आपल्यातील साहसाने समाजाला जागरूक करण्याचा काळ आज आला आहे. महिलांनी आपल्यातील शक्तीचे मूर्त रूप समाजाला दाखवून द्यावे, हे सांगताना ‘यश नर्सिंग होम अ‍ॅण्ड सोनोग्राफी सेंटर’च्या वैद्यकीय संचालिका डॉ. उज्ज्वला बर्दापूरकर यांनी आजच्या जागतिक महिला दिनी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या माध्यमातून कथन केलेला त्यांचा प्रेरणादायी प्रवास...मी मूळ इचलकरंजीची. त्यामुळे माझे संपूर्ण बालपण आणि बारावीपर्यंतचे शिक्षण इचलकरंजीतच झाले. त्यानंतर वैद्यकीय शिक्षणासाठी मी सोलापूरमध्ये दाकल झाले. सोलापूरमध्येच माझे पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाले. माझे वडील डॉ. आर. डी. अर्जुनवाडकर इचलकरंजीमधील एक नामांकित डॉक्टर असल्याने मीदेखीलडॉक्टरच व्हावे, अशी माझ्या वडिलांची मनापासून इच्छा होती. त्यातच मी घरातील भावंडांमध्ये सर्वात लहान असल्याने घरातदेखील सगळ्यांचीच लाडकी. माझे संपूर्ण बालपण अत्यंत प्रेमात आणि लाडात गेले. अशातच आमचे एकत्र कुटुंब असल्याने घरातील सर्वांचे खूप प्रेम लाभले. घरातून कोणताही दबाव किंवा तणाव असे काहीही नव्हते. हसतखेळत वातावरण असायचे. माझे वडीलदेखील गावातील नामांकित डॉक्टर. त्यांचे सामाजिक कार्य मोठे असल्याने गावात वडिलांना खूप मान होता. म्हणून मीदेखील त्यांचा हा वारसा पुढे चालवावा, अशीच त्यांची इच्छा होती. त्यामुळेच मी ‘एमबीबीएस’मध्ये पदवी घेत पुढे ‘स्त्रीरोगतज्ज्ञ’ या विषयातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. काही दिवसांतच म्हणजे १९९३मध्ये डॉ. संजय बर्दापूरकर यांच्याशी लग्न झाल्याने मग मी भिवंडीत स्थायिक होऊन, माझी ‘प्रॅक्टिस’ करू लागले. २०००मध्ये मी भिवंडीत ’यश नर्सिंग होम अ‍ॅण्ड सोनोग्राफी सेंटर’च्या माध्यमातून माझी ‘प्रॅक्टिस’ सुरू केली. मागील २७वर्षांपासून अविरतपणे ‘स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून येथे कार्यरत आहे.

खरे आव्हान इथे होते की, माहेरी असताना आमच्या कुटुंबाचे आणि वडिलांचे गावात प्रस्थ असल्याने तिथे मला माझी वेगळी ओळख करून देण्याची गरजच भासली नाही. पण, जेव्हा माझे पती आणि मी भिवंडीत आलो, तेव्हा आम्ही दोघेही गावात नवीन होतो. त्यामुळे एकेक माणूस इथे ओळखीचा करून घेणे आणि ती ओळख टिकवणे, हे सर्वात मोठे आव्हान आमच्यासमोर होते. हेच काम मी अगदी मनापासून केले. प्रत्येक माणूस मी मनापासून जोडला. ते नातं टिकविण्याचा सर्वतोपरी प्रयत्न मी केला. वैद्यकीय ‘प्रॅक्टिस’ करत असताना मी माझ्याकडून प्रत्येक गरजूला, येणार्‍या रुग्णाला, त्यांच्या नातेवाईकाला सर्व मदत करण्यावर कायम भर देते. महिलांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करते. एखाद्या रुग्णाला दुसर्‍या एखाद्या रुग्णालयात उपचार घ्यायचे असतील, तर त्यांना पूर्ण मार्गदर्शन करते. गरज पडल्यास त्यांना काही आर्थिक अडचणी असतील, तर त्यावर मार्ग काढण्याचाही पूर्ण प्रयत्न करते. मी लहानपणापासून माझ्या वडिलांचे सामाजिक कार्य अगदी जवळून अनुभवले होते. त्यांना लोकांसाठी झटताना मी पाहिले होते. आज त्याचेच अनुसरणकरण्याचा प्रयत्न मी अगदी मनापासून करते. यश मिळवायचं म्हणून मी हे केले का, तर अजिबात नाही... मी कार्य करत राहिले आणि त्यामुळे मला यश मिळत गेले. मी म्हणेन की, हे माझे भाग्यच आहे की, माझ्यावर प्रेम करणारी माणसे मला भेटत गेली. जेव्हा भिवंडीमध्ये माझे लग्न ठरले, तेव्हा आमच्या गावातील लोक प्रचंड घाबरले की, माझ्या वडिलांनी माझे लग्न या गावात का जमवले. पण, आज भिवंडीतही मी खूप आनंदात आहे.


कौटुंबिक आधाराचे म्हणाल, तर माझ्या कुटुंबीयांनी मला खूप सहकार्य केले. माहेरी असताना आई-वडील, भाऊ, माझ्या आत्या, काका-काकू यांच्याकडून मला माझ्या कामाचे खूप कौतुक झाले. माझ्या प्रत्येक यशाचे त्यांनी भरभरून कौतुक केल्यामुळे कायम नवीन काहीतरी करत राहण्याची प्रेरणा मला त्यातून मिळत गेली. सासरीदेखील तेच वातावरण कायम राहिले. यश आणि जीत ही माझी दोन मुलं. ते लहान असताना मला ‘प्रॅक्टिस’ करायची असल्याने माझ्या सासू-सासर्‍यांनी घरातील सर्व जबाबदारी कटाक्षाने सांभाळली. म्हणूनच मी माझे काम आणि सोबतच सामाजिक कार्यदेखील करु शकले. माझा रुग्णालयातील संपूर्ण कर्मचारी वृंद तसेच माझे सर्व मित्र-मैत्रिणी कायम माझ्यासोबत उभे असतात. त्यामुळेच मी हे यश संपादन करु शकले. आज मी भिवंडी विभागाची ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ची सलग तिसर्‍यांदा अध्यक्ष आहे. भिवंडी महानगरपालिकेच्या ‘कोविड टास्क फोर्स’च्या समितीमध्ये देखील मी सहभागी आहे. ‘पीसीपीएनडी समिती’मध्ये मी आहे. भिवंडी ‘जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन’च्या कार्यकारिणीतही मी सक्रिय आहे.तसेच ‘मिडलिस्ट कमिटी’ची मी अध्यक्षादेखील आहे. आज मी सर्वांना सोबत घेत यशस्वी मार्गक्रमण करते आहे. ते म्हणतात ना, ’स्त्री शिकली की संपूर्ण समाज प्रगतीच्या मार्गावर येतो.’ स्त्रियांनी आता अबलापणाच्या मथळ्याखाली जगणं सोडून द्यावं. महिलांनी आज अबला नाही, तर सशक्त व्यक्तिमत्त्व म्हणून समाजात राहणे गरजेचे आहे.
-डॉ. उज्ज्वला बर्दापूरकर
@@AUTHORINFO_V1@@