आमदार नाईक साहेब किमान रस्ते सुधारा!

06 Mar 2021 16:22:52

mla naik _1  H
 
 
 
कणकवली : एकेकाळी नारायण राणेंचा बालेकिल्ला मानला जाणारा कुडाळ-मालवण मतदार संघ शिवसेनेकडे गेल्यापासून ग्रामस्थ मुलभूत सोयीसुविधांपासून वंचित असल्याचे चित्र आहे. आमदार वैभव नाईक यांनी राणेंसारख्या नेत्याचा पराभव केला. सलग दोन टर्म आमदार म्हणून निवडून आलेल्या नाईक यांनी गेल्या सहा वर्षांत रस्त्यांचा प्रश्नही सोडवला नसल्याचे विदारक चित्र आहे. गावातील सांडवे-गोठणे-रामगड हा मुख्य रस्त्याची चाळण झालेली आहे.
 
 
 
लॉकडाऊनमध्ये बरेच चाकरमानी आपापल्या गावी गेले असल्याने त्यांनी उघडउघड आपली नाराजी व्यक्त करून दाखवली आहे. गावातील रस्त्यांवरून वाहन न्यायचे झाल्यास केवळ १० किमी प्रतितास वेगाने वाहन चालवावले लागत आहे. याच विषयावर ग्रामस्थांनी आवाज उठवला आहे. आम्हाला किमान मुलभूत सोयी तरी द्या, रस्त्यांची रखडलेली कामे मार्गी लावा आणि अंतर्गत रस्त्यांसाठीही निधी देऊन कामे मार्गी लावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
 
 
 
गावातील तरुणांनी रस्त्यांच्या दुरवस्थेचा एक व्हीडिओ तयार केला आहे. गावातील रस्त्यावरून प्रवास करताना येणाऱ्या अडचणी सांगितल्या आहेत. सांडवे-गोठणे-रामगड या रस्त्याचे बांधकाम साधारणतः १५-२० वर्षांपूर्वी झाले होते. मात्र, त्यांनंतर इतका काळ लोटल्यानंतरही याकडे कुणी लक्षच दिले नसल्याची तक्रार ग्रामस्थ करत आहेत.
 
 
 
शिवसेनेने विश्वासघात करून दाखवला!
 
 
तत्कालीन आमदार नारायण राणे यांच्या कार्यकाळात बांधलेल्या रस्त्याकडे आमदार नाईक यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जात आहे. काही ठिकाणी रस्त्याची कामे सुरू आहेत. मात्र, लॉकडाऊनमुळे ही कामेही बंद पडली होती. विकासकामे संथगतीने सुरू असल्याने शिवसेनेविरोधात उघड नाराजी व्यक्त केली जात आहे.





Powered By Sangraha 9.0