प्रकाशबापूंचा अज्ञान प्रकाश

04 Mar 2021 21:21:20

Prakash Ambedkar_1 &
 
"ख्रिश्चन नर्सच्या हातून कोरोना लस घेतली का, हिंदू नर्सवर विश्वास नव्हता,” इति प्रकाशबापू. हो, प्रकाशबापूच असे म्हणणार! कारण, त्यांच्याशिवाय असा अज्ञानाचा प्रकाश कोण पाडणार? त्यांच्या या बेताल वक्तव्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आठवण येते. त्यांनी जातीअंताची लढाई लढली. इतकेच नव्हे तर सर्व प्रकारचा भेद नाकारला. मात्र, प्रकाश आंबेडकर अजूनही जातधर्माच्या चक्कीत आपली अक्कल पाजळत आहेत. कोरोना लस देणाऱ्या सेवाभावी नर्सचेही त्यांनी धर्मावरून वर्गीकरण केले. मान्य आहे नरेंद्र मोदी हिंदू आहेत. त्यांना हिंदू धर्माबद्दल आस्था असणारच. पण, ते ज्या रा.स्व.संघाच्या मुशीत घडले, तिथले संस्कार त्यांच्या रक्तात आहेत. ते संस्कार म्हणजे, या देशाचा नागरिक असलेला आणि या देशाविषयी निष्ठा असणारा कुणाही धर्माचा नागरिक हा भारतीय आहे आणि आपला बांधव आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी आणि इतर करोडो स्वयंसेवकांना कोरोना लस भारतीय असलेल्या कोणत्याही धर्माच्या नर्सच्या हातून घेतली तर काही फरक पडणार नाही. सहिष्णुता आणि बंधुत्व जपणारा हिंदू धर्म मोदींनी पाळला. पण, प्रकाश आंबेडकरांचे काय? धर्म-निष्ठेची गोष्ट करताना ते खरेच त्यांचा जो काही पंथ आहे, त्याच्याशी तरी एकनिष्ठ आहेत का? नाही, ते एकनिष्ठ नाहीत. नाहीच, हिंदू धर्माचा कायम द्वेष करणारी काही मंडळी आहेत. त्या मंडळींचे प्रकाशबापू कायमच सरदार होते. जातपात न बघता प्रकाशबापूंनी कधी कुणाला मदत केली आहे का? नवबौद्ध किंवा ठरावीक मागासवर्गीय जातींच्या एक-दोन माणसांव्यतिरिक्त प्रकाशबापू यांनी कुणासाठी आवाज उठवला? नक्षली समर्थक म्हणून तेलतुंबडे तुरुंगात आहे. त्याची कृत्य देशाला बाधक आहेत. त्या तेलतुंबडेबद्दल कधी प्रकाशबापूंनी आक्षेप उठवला का? नाही, पूजा चव्हाण जीवानिशी गेली. पण, तिच्या हत्याऱ्याला सजा व्हावी यासाठीही प्रकाशबापू काहीच बोलले नाहीत. का? पूजा बंजारा समाजाची, हिंदू होती म्हणून? जातपात पाहून काम करणाऱ्या प्रकाशबापू आणि त्यांच्यासारखेच वागणाऱ्या अनेक तथाकथित विचारवंतांमुळे समाजात दुही माजत आहे. मी, प्रथम आणि अंतिमही भारतीय, असे म्हणणाऱ्या बाबासाहेबांचे वंशज कुणाही नर्सच्या भारतीयत्वापेक्षा तिच्या धर्माबद्दल बोलतात, हे अक्षम्य आहे.
 

चीनची मुंबई वीज स्थगिती

 
चीनची नितीन राऊतांशी काय दुश्मनी माहिती नाही. पण, ते मंत्री असताना आणि त्यांचे महाविकास आघाडी सत्तेत असताना चीनने मुंबईची बत्तीगूल केली बरं का? पण, यावर सामान्य जनतेचे (तीच बिचारी जनता जिने भाजपला बहुमत दिले होते. पण, तीन बिघाडीने जनतेची फसवणूक करत राज्य बळकावले) तर जनतेचे म्हणणे आहे की, चीनने केवळ मुंबईचीच बत्तीगूल का केली? दिल्ली नाही, गुजरात नाही, कोलकाता नाही, तामिळनाडू पण नाही, अगदी योगींच्या उत्तरप्रदेशातली बत्तीही गूल केली नाही. पण, आता प्रश्न असा आहे की, चीनने मुंबई आणि आसपासच्या परिसरातील काही वस्त्या किंवा दोन-चार घर सोडून वीज का घालवली? कारण, त्या दिवशी मुंबई उपनगराच्या बाबतीत म्हणावे तर विक्रोळीची वीज गेलेली; पण बाजूच्या कांजुर, भांडुपच्या काही भागाची वीज होती. चीनला नीट प्लॅन करता आला नाही वाटतं! यावर काही लोकांचे असेही म्हणणे आहे की, त्या दिवशी मुंबईत वीज गेली, त्यावेळी वाटले की या महाविकास आघाडीने वीजपुरवठ्यावरच स्थगिती आणली असेल. कारण, जेव्हापासून हे महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले, त्या सरकारने फक्त एकच काम इमानेइतबारे केले. जनतेसाठी आधीच्या म्हणजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच्या काळात ज्या ज्या योजना होत्या, त्या योजनांना स्थगिती देणे. बस, या उपर सरकारने एक नवीन योजना आणली असेल तर शपथ! हो, एक ‘शिवभोजन’ थाळी नावाचे काही सुरू केले होते. पण, ती थाळी कुठे आणि कुणाला मिळाली हे बहुतेकांना माहितीच नाही. ग्रॅमच्या हिशोबात अन्न खाण्याची भिकार सवय महाराष्ट्राला नाही. त्यामुळे ज्या कोण्या सुदैवी व्यक्तीला ती थाळी मिळाली, तिने गॅ्रमच्या हिशोबातले जेवण जेवताना काय वाटत असेल, हे त्यांचे त्यालाच ठाऊक आणि हो, तो काय ‘शक्ती’ कायदाबियदा होता. तो तर करुणा शर्मा, पूजा चव्हाणच्या जीवनासोबतच स्थगिती मिळाली की काय, अशी शंका वाटावी अशी महाराष्ट्रात परिस्थिती. त्यामुळे वीज गेली तर लोकांनी मनात हेच ठरवले की, वाइटातली वाईट काय स्थगिती होऊ शकते? वीजच गेली ना? महाविकास आघाडी सरकारमध्ये आणखी खूप गोष्टींवर स्थगिती येईल. होशियार राहणे हेच आता महाराष्ट्राच्या हातात आहे.
Powered By Sangraha 9.0