नांदेडमध्ये ४०० जणांनी केला पोलिसांवर हल्ला
नांदेड : महाराष्ट्र पोलीस दल आणि गृहखात्यात अंतर्गत कलह सुरू असताना 'हल्ला-महल्ला' जुलूस दरम्यान, पोलिसांवर भीषण हल्ला करण्यात आला होता. पोलिसांवर झालेल्या हल्ल्याच्या विरोधात ४००हून अधिक जणांविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी १७ अटक करण्यात आली आहे. या हल्ल्यात चार पोलिसांना गंभीर दुखापत झाली होती. महाविकास आघाडी सरकारच्या काळात पोलिसांवर होणाऱ्या वाढत्या हल्ल्यांचे प्रमाण पाहता गृहमंत्रालयाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
पोलिसांवर तलवार, दगड आणि लाठ्याकाठ्यांनी हल्ले
पोलिसांच्या पथकावर लाठ्या-काठ्या, दगड आणि तलवारींनी हल्ले झाले. जेव्हा नांदेड साहब येथे विना परवाना होणाऱ्या 'हल्ला-महल्ला' जुलूस थांबवण्यासाठी काही पोलीस अधिकारी सरसावले होते. त्यांच्यावर हल्ला चढवण्यात आला. एसपी, डीएसपींवरही हल्ला करण्यात आला. याप्रकरणी शीख महिलांनीही दगडफेक केली. हा जमाव अचानक बाहेर आला. बॅरिकेड्स तोडून पोलिसांवर हल्ले केले. हिंसा झाली अनेक वाहनांचेही नुकसान झाले होते.
गुरुद्वारा समितीवर ठपका
नांदेड रेंज पोलीस उपमहानिरीक्षक (डीआयजी) निसार तंबोली यांनी प्रसिद्धीमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, गुरुद्वारेतून शीख समुदायाचा 'हल्ला-महल्ला' जुलूस काढला जात होता. महाराष्ट्रात कोरोना महामारीमुळे याला परवानगी दिली नव्हती. त्याची सूचना गुरुद्वारा समितीलाही देण्यात आली होती. जुलूस निघणार नाही, अशी हमी समितीने दिली होती. कार्यक्रम या आवारातच करणार असल्याची हमीही देण्यात आली होती.
रस्त्यावरच काढायची होती मिरवणूक
पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, निर्देशांविरोधात सायंकाळी ४ वाजता गुरुद्वाराच्या प्रवेशद्वारावर पोलीस कर्मचाऱ्यांनी विरोध केला, तर जमावाने पोलिसांवर हल्ला चढवला. काही जण हत्यारे घेऊनच पोलिसांच्या अंगावर धावले. यात एका महिला कर्मचाऱ्याची प्रकृती गंभीर आहे. अचानक इतक्या मोठ्या प्रमाणावर एकत्र केलेल्या हल्ल्यामुळे हे प्रकरण पूर्वनियोजित तर नव्हते ना, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.