‘जलजीवन मिशन’ घडवतेय ‘जलक्रांती’ !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Mar-2021
Total Views |

jjm_1  H x W: 0

 

ग्रामीण भारतातील ४ कोटींहून अधिक घरांना शुद्ध पाणीपुरवठा


 

नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : देशातील ग्रामीण भागातील प्रत्येक घरामध्ये २०२४ पर्यंत नळावाटे पिण्याचे शुद्ध पाणी पुरविण्यात येईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट, २०१९ रोजी लाल किल्ल्यावरून केली होती. त्यासाठी राष्ट्रीय जलजीवन मिशनची सुरुवातही करण्यात आली होती. केंद्र सरकारच्या या महत्वाकांक्षी योजनेमुळे गेल्या २ वर्षांमध्ये आतापर्यंत ४ कोटींहून अधिक घरांमध्ये पिण्याचे शुद्ध पाणी पुरविण्यात यश आले आहे. त्यामुळे जलजीवन मिशनद्वारे जलक्रांती घडण्यास सुरुवात झाली आहे.
 
 

देशातील ग्रामीण भागात एकुण १९ कोटी १९ लाख १२ हजार ५२० घरे आहेत. त्यापैकी २०१९ पर्यंत म्हणजे जल जीवन मिशनची घोषणा होईपर्यंत ३ कोटी २३ लाख ६२ हजार ८३८ म्हणजे जवळपास १७ टक्के घरांपर्यंत नळावाटे शुद्ध पिण्याची पाणी पुरविले जात होते. या योजनेची घोषणा झाल्यापासून म्हणजे १५ ऑगस्ट, २०१९ ते आजपर्यंत म्हणजे ३० मार्च २०२१ पर्यंत ७ कोटी २४ लाख ९७ हजार ६४३ घरांपर्यंत (३७.७८ टक्के) नळावाटे पाणीपुरवठा करण्यात यश आले आहे. म्हणजेच गेल्या २ वर्षांत तब्बल ४ कोटींहून अधिक ग्रामीण घरांमध्ये नळावाटे शुद्ध पाणीपुरवठा केला जात आहे. करोना संसर्गासारख्या संकटाच्या काळातही घरामंध्ये नळजोडणी करण्याचे काम थांबले नाही, सध्या दरदिवशी १ लाख घरांमध्ये नळजोडणी देण्याची काम यशस्वीपणे केले जात आहे.

 
 

देशात गोव्याने आपल्या राज्यातील १०० टक्के ग्रामीण घरांमध्ये नळावाटे शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात यश मिळविले आहे. गोव्यापाठोपाठ तेलंगाणा आणि अंदमान निकोबार द्विपसमुह योजनेची अंमलबजावणी करण्यात आघाडीवर आहेत. या प्रदेशातील ५६ जिल्ह्यांमधल्या ८६ हजारांहून अधिक गावांमध्ये राहणाऱ्या प्रत्येक कुटुंबास पाणीपुरवठा होत आहे. महाराष्ट्रातील १ कोटी ४२ लाख ३६ हजार १३५ घरांपैकी आतापर्यंत ९० लाख ७० हजार ००२ म्हणजेच ६७.७१ टक्के घरांमध्ये या योजनेची यशस्वी अंमलबजावणी झाली आहे.

 
 

जलजीवन मिशनमुळे देशातील ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांच्या जीवनात मोठे परिवर्तन होत आहे. कारण, अशुद्ध पाणी प्यायलामुळे अनेक रोगांचा सामना करावा लागतो. त्याचप्रमाणे दूरवरून पाणी वाहून आणावे लागत असल्याने आरोग्यावरही घातक परिणाम होतो. मात्र, आता या योजनेला मिळत असलेल्या यशामुळे ग्रामीण भारताचा चेहरामोहरा नक्कीच बदलणार आहे.

 
 

mjj_1  H x W: 0 
 

दुर्गम भागातही २४ तास पाणीपुरवठा

 

जल जीवन मिशनअंतर्गत अगदी दुर्गम असलेल्या ग्रामीण भागातही पाणीपुरवठा करणे शक्य होत आहे. आंध्र प्रदेशातील वेलीरपद मंडलातील काकीसनूर हे वनभागातील एक गाव, त्यात २०० पेक्षा थोडे अधिक लोक वास्तव्यास आहेत. डोंगराळ भाग असल्याने रस्ता आणि वीज या गावापर्यंत पोहोचलेले नाही. मात्र, जवजीवन मिशन अंतर्गत या गावामध्ये २० किलोमीटर दूर असलेल्या गोदावरी नदीतून पाणीपुरवठा करण्याची योजना आखण्यात आली. त्यानंतर गावाजवळ बोअरवेल खणण्यात आले आणि सौर उर्जेवर चालणारे पंप बसविण्यात आले. त्याद्वारे आता या दुर्गम गावात आठवड्याचे सातही दिवस आणि २४ तास शुद्ध पिण्याचे पाणी मिळत आहे.
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@