महापालिकेच्या उद्यानांचे सौंदर्य वाढविणार ‘तोफा’

    दिनांक  30-Mar-2021 15:39:08
|

ghatkopar garden _1 घाटकोपरमधील उद्यानात पुनःस्थापित होणार १६४ वर्षांपूर्वीच्या ‘तोफा’

मुंबई: घाटकोपर येथील ‘लायन्स चिल्ड्रन पार्क’मध्ये असणार्‍या तब्बल १६४ वर्षे जुन्या तरीही भरभक्कम असणार्‍या दोन पोलादी तोफांना नवी झळाळी देत, त्या पुनःस्थापित करण्यात येणार आहेत. त्यामुळे लवकरच घाटकोपर पूर्व परिसरातील टिळक पथावर असणार्‍या ‘लायन्स चिल्ड्रन पार्क’मध्ये निसर्गाशी जवळीक साधण्यासोबतच ऐतिहासिक ठेवाही अनुभवता येणार आहे.
 
 
 
समुद्राने वेढलेल्या मुंबई नगरीचे संरक्षण करण्यासाठी ब्रिटिशांनी अनेक ठिकाणी तोफा बसविल्या होत्या. त्यापैकीच या तोफा असून पर्यटकांना ऐतिहासिक खजिन्याबाबत माहिती मिळणार आहे. महानगरपालिकेच्या उद्यान विभागाच्या अखत्यारीत असणार्‍या घाटकोपर पूर्व परिसरातील ‘लायन्स चिल्ड्रन पार्क’ हे सन १९७१ पासून मुंबईकरांच्या सेवेत असणारे उद्यान आहे. ५५ हजार ८४३ चौरस फुटांच्या जागेत विकसित असलेल्या या उद्यानात असणार्‍या हिरवाई सोबतच ‘ईस्ट इंडिया कंपनी’च्या काळातील दोन तोफादेखील या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहेत. या दोन्ही तोफांची लांबी ३.१० मीटर असून, तोफांचा आतील घेर ०.६४ मीटर आणि बाहेरील घेर १.१७ मीटर इतका आहे. या दोन्ही तोफांवर १,८५६ अशी नोंद असून, एका बाजूला रोमन लिपी मध्ये ‘एनसीपीसी’ अशी अक्षरे कोरण्यात आली आहेत.
 
 
 
साधारणपणे १६४ वर्षे जुन्या असणार्‍या या दोन्ही तोफांना नवी झळाळी देण्यासह भव्य-दिव्य चबुतर्‍यावर पुनःस्थापित करण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या उद्यान विभागाने महापालिकेच्या पुरातन वास्तू जतन अभियंता यांच्याकडे नुकताच पाठविला आहे. यामुळे आता लवकरच या ऐतिहासिक ठेव्याला नवा रुबाब प्राप्त होण्यासह मुंबईकरांनाही एक ऐतिहासिक स्पर्श असलेले विरंगुळ्याचे आणखी एक ठिकाण उपलब्ध होणार आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.