फास्टॅग आमदारांना लावायचे कि गाडीला ?

    दिनांक  03-Mar-2021 16:26:08
|

devendra fadanavis_1 


देवेंद्र फडणवीसांचा झिरवळांना हास्यास्पद टोला


मुंबई: माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे तसे गंभीर स्वरूपाचे व आक्रमक स्वरूपाचे नेते म्हणून राज्याला परिचित आहेत. मात्र एखादा विनोदी प्रसंग घडला किंवा कोणी त्यांची टोपी उडवली तर त्यावर ते हसून दादही देतात. आज मात्र त्यांनी विधानसभेत उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांचीच खिल्ली उडवली आणि विधानसभेत हास्याची लकेर उमटली.
दुपारी सभागृहात औचित्याच्या मुद्यावरील चर्चा झाल्यानंतर विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी सर्व आमदारांच्या वाहनासाठी एचडीएफसी बँकेकडून फास्टॅगचे वाटप करण्यात येत असल्याची माहिती देण्यास सुरूवात केली. मात्र झिरवळ यांना फास्टॅगचा उच्चार काही करता येईना. त्यामुळे त्यांनी फास्टींग, फास्टग तर कधी अन्य काही उच्चार करण्यास सुरुवात केली. त्यामुळे सभागृहातील सदस्यांसमोर उपाध्यक्ष झिरवळ नेमकी कशाची माहिती देत आहेत, याविषयी संभ्रम निर्माण झाला. अखेर भाजपामधील एका सदस्यांने फास्टॅग असा उच्चार केला आणि त्यानुसार उपाध्यक्षांनीही त्याचा पुनरूच्चार केल्यावर मग सर्व आमदारांना फास्टॅगचे वाटप सुरु झाल्याची माहिती कळली.
त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे बोलायला उभे राहिले आणि झिरवळांना मिश्किलपणे विचारले की, " फास्टॅग नेमके कशाला लावायचे आमदारांना कि गाडीला ? " आणि फडणविसांच्या प्रश्नावर सभागृहात एकच हस्यकल्लोळ झाला. मात्र उपाध्यक्ष झिरवळ यांचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. यानिमित्ताने फडणवीसांमध्ये लपलेला मिश्किली आणि कोपरखळीचा देण्याचा स्वभावही संपूर्ण महाराष्ट्राला दिसला.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.