श्रमे श्री: प्रतिष्ठिता।

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Mar-2021
Total Views |

hard work_1  H
 
 
आज खरी गरज आहे ती प्रत्येकाने आपल्या जीवनात श्रमनिष्ठा जोपासण्याची! कारण, जो श्रमनिष्ठ तपस्वी जीवन जगतो, त्याला सर्व गोष्टींची प्राप्त होत असते. श्रमामध्येच तर सर्व प्रकारचे सुख व ऐश्वर्य घडलेले आहे आणि हेच तत्त्व आपल्या वैदिक संस्कृतीत सामावलेले आहे.
 
इदाह्न: पीतिमुत वो मदं धुर्
न ऋते श्रान्तस्य सख्याय देवा:।
ते नूनमस्मे ऋभवो वसूनि
तृतीये अस्मिन्त्सवने दधात॥
 
अन्वयार्थ
 
(देवा:) जगातील सर्व दिव्यगुण व दिव्यशक्ती या (आ अह्न:) जीवनरुपी दिवसांपर्यंत सर्वांना (पीतिम्) सर्व पदार्थांचे रसपान करून (धु:) देतात. (व:) तुम्हा सर्वांना (मदम्) आनंद प्रदान करतात, पण त्या (श्रान्तस्य) परिश्रमां (ऋते) विना, खेरीज (सख्याय) मैत्रीसाठी कदापि तत्पर होत नाहीत. म्हणून (ऋभव:) हे प्रकाशशील, तेजस्वी व महाशक्तीसंपन्न अशा विद्वान पुरुषांनो! (ते) तुम्ही सर्वजण(नूनम्) निश्चितच (अस्मिन्) या (तृतीये) तिसऱ्या (सवने) श्रेष्ठ अशा कर्माच्या निमित्ताने (अस्मे) आम्हा सर्वांकरिता (वसूनि) धन व ऐश्वर्यांना आपल्या जीवनात (दधात) धारण करा.
 

विवेचन
मानवाची अनंत काळापासून सुरू असलेली ही महान जीवनयात्रा अगदी सुरळीत व सुव्यवस्थितपणे पार पाडावी, यासाठी भगवंताने आम्हाला शरीररुपी रथ प्रदान केला आहे. या रथाच्या साहाय्याने आम्ही नेहमी गतिमान राहावयास हवे. ‘रथ’ या दोन अक्षरी शब्दांत बरेच सार दडलेले आहे. ‘र’ म्हणजे ’रमते’ रममाण होणारा किंवा ’राति ददाति इति’ देत राहणारा, तर ‘थ’ म्हणजेच ’थर्वण’ याचा अर्थ स्थिर किंवा दृढ राहणे असा होतो. जीवनरुपी रथ हा नेहमी गतिशील, प्रसन्नतेने रमणारा, दुसऱ्यांना दान देणारा आणि स्थिर झालेला असतो. हा रथ कदापि थांबता नये. रथाची दोन्ही चाके नेहमी एका महान उद्देशाने प्रेरित होत कल्याणकारी दिशेने गतिमान असली पाहिजेत. ती मागे पुढे कदापि होता नयेत. प्रस्तुत मंत्रात मानवाला मिळालेल्या देहरूपी अनुपम रथाच्या माध्यमाने सदैव परिश्रम करण्याचा उपदेश मिळतो. जगातील कोणत्याही दिव्यशक्ती, दिव्य गोष्टी किंवा उच्च ध्येयोद्दिष्टे ही कष्ट व परराष्ट्र परिश्रमाशिवाय अजिबात मिळत नाहीत. जीवनरुपी दिवसाच्या अंतापर्यंत माणसाला सर्व गोष्टींची प्राप्ती अथवा जगातील अशक्यप्राय अशाही वस्तू पदार्थांचा लाभ होतो, तो केवळ कष्ट व परिश्रम केल्यानेच! म्हणूनच म्हटले आहे-
 
न ऋते श्रान्तस्य सख्याय देवा:।
 
परिश्रम करून थकल्याखेरीज अथवा घाम गाळल्याशिवाय या जगात सज्जन देवलोक हे मैत्रीसाठी आपला हात पुढे करीत नसतात. श्रमाला सर्वत्र किंमत असते. श्रमहीनांना मात्र कोणीही विचारत नाही. जे अपार कष्ट करतात व कठोर परिश्रम करून आपल्या ध्येयमार्गावरून वाटचाल करीत असतात. त्यांना अशक्य असे काहीच नसते. व्यापक परिश्रमाच्या बळावर ते शून्यातून विश्व निर्माण करतात आणि प्रगतीच्या शिखरावर आरूढ होत जगासमोर पुरुषार्थाचा दीपस्तंभ उभा करतात. म्हणूनच असे ते क्रांतदर्शी पुरुषसिंह समग्र विश्वात वंदनीय ठरतात. जगात अशा पुरुषार्थी सत्पुरुषांची मुळीच कमतरता नाही. भारताचा इतिहास हा तर थोर श्रमप्रवीण अशा महात्म्यांच्या प्रेरक जीवनगाथांनी सुशोभित झालेला आहे.
 
 
श्रमनिष्ठा ही आपल्या वैदिक संस्कृतीचा आधारभूत घटक होय. वेदांनी प्रतिपादित केलेली आश्रमव्यवस्था ही श्रमप्रतिष्ठेचा एक भाग आहे. मानवी जीवनाच्या आयुष्मानाची चार भागांत विभाजन करताना आपणांस श्रमतत्त्वाची प्रकर्षाने प्रचिती येते. पहिला भाग हा ब्रह्मचर्य आश्रम म्हणून ओळखला जातो. यात मुला-मुलींना आपल्या मन, बुद्धी व आत्म्याचा विकास साधण्यासाठी अहर्निश परिश्रम करावयाचे आहे. ब्रह्मचर्याचे पालन करीत सर्व दृष्टीने विकसित व्हावयाचे आहे. सर्व प्रकारच्या विद्या ग्रहण करण्यासाठी त्यांना अहर्निश कष्ट सोसावयाचे आहेत. विद्यार्थी जीवन हे इतर सर्व आश्रमांचा मूलभूत आधार आहे, ते याचसाठी! ज्यांनी या वयात श्रम केले, त्याचेच पुढील सर्व आश्रम सफल ठरतात.
पूर्वीच्या काळी वयाच्या सातव्या किंवा आठव्या वर्षी मुला-मुलींना गुरुकुलांमध्ये प्रवेश दिला जायचा. पितृकुळातून गुरुकुळात प्रविष्ट झालेल्या मुला-मुलींचा ‘आचार्य’ किंवा ‘आचार्या’ त्यांचा उपनयन संस्कार करवून घेत. विद्या पूर्ण होईपर्यंत त्यांच्याच सान्निध्यात राहून हे ब्रह्मचारी किंवा ब्रह्मचारिणी आपापल्या गुणवृत्तींप्रमाणे वेगवेगळे वर्ण धारण करत. गुरूंच्या आदेशाप्रमाणे ’सत्यं वद’, ‘धर्मं चर’,‘ स्वाध्यायान्मा प्रमद।’ इत्यादी उपदेश ग्रहण करीत. गुरूंचा आदर्श व आदेश या दोन्हींना शिरोधार्य मानत ते अहर्निश तपस्वी जीवन जगत. आपल्या सर्वांगीण जीवनाचा विकास साधत. अशीही तपश्चर्येची व परिश्रमाची परंपरा आपल्या देशात प्राचीन काळी होती म्हणूनच तो काळ खऱ्या अर्थाने उज्ज्वल होता. दुर्दैवाने आज ती गुरुकुल शिक्षणपद्धती राहिली नाही, न ते आचार्यवृंद आणि नाही ते बटु ब्रह्मचारी! आज श्रमनिष्ठा ही विद्यार्थीवयापासून जणू काही दुरापास्तच झालेली आहेत. पाश्चात्य कुसंस्कृतीच्या या सहशिक्षणाच्या वादळात कठोर ब्रह्मचारी जीवन शैक्षणिक व्यवस्थेतून पूर्णपणे हरवले आहे, म्हणून लहान वयापासूनच चारित्र्याची ऐशीतैशी झाल्याचे आपल्या दृष्टीस पडते. कोणतेही क्षेत्र घ्या, आज परिश्रम कोणालाही नकोसेच वाटतात. अगदी सहजपणे सर्व गोष्टी मिळत राहाव्यात. कष्टाविना सर्व प्रकारची सुखे मिळावीत, अशीच अभिलाषा प्रत्येकाची झाली आहे, पण ही ऐतखाऊ वृत्ती काय कामाची? ‘दे रे हरी खाटल्यावरी!’ याप्रमाणे जगणारे लोक हे धरणीमातेला भारभूत ठरतात. म्हणूनच भर्तृहरी म्हणतात-
 
 
येषां न विद्या न तपो न दानं
ज्ञानं न शीलं न गुणो न धर्म:।
ते मर्त्यलोके भुविभारभूता:
मनुष्यरुपेण मृगाश्चरन्ति॥
 
 
अर्थात, परिश्रमाच्या माध्यमाने जे विद्या मिळवत नाहीत, कठोर तपश्चर्या करीत नाहीत, कधीही दानधर्म करीत नाहीत, सर्व प्रकारचे ज्ञान प्राप्त करीत नाहीत, स्वतःला चारित्र्यसंपन्न (शीलवंत) बनवत नाहीत, सद्गुणांनी जे परिपूर्ण होत नाहीत आणि जे धर्ममार्गावरून वाटचाल करत नाहीत, असे ते सर्व कपाळकरंटे आळशी व प्रमादी लोक या मृत्युलोकी भूमीला भारभूत (ओझे) म्हणूनच वावरतात आणि माणसांच्या रूपाने पशू होऊन जगतात. अशांचे जगणे काय कामाचे? यापेक्षा तर मृत्यू परवडला!
 
 
याच अनुषंगाने नेहमी श्रमनिष्ठ राहण्याकरिता आणि रथाप्रमाणे गतिमान बनवण्याकरिता ‘ऐतरेय ब्राह्मण’ ग्रंथाच्या 33व्या अध्यायात एक बोधप्रद प्रेरक संवाद आलेला आहे. तेथे ‘रोहित’ नावाचा एक ब्रह्मचारी आपल्या आचार्यांच्या सेवेत उपस्थित होतो आणि त्यांना प्रार्थना करतो की, जीवनात यश मिळविण्याकरिता कोणत्या साधनांची गरज आहे ? त्यांचा मला उपदेश द्या. तेव्हा त्यास आचार्य म्हणतात-
 
नानाश्रान्ताय श्रीरस्तीति रोहित शुश्रुम ।
पापो नृषद्वरो जन इन्द्र इच्चरत सखा॥
 
चरैवेति चरैवेति... म्हणजेच अरे रोहिता, आम्ही असे ऐकले आहे की, परिश्रम करणाऱ्यांसाठीच या जगात श्रींचे म्हणजेच धनेश्वर्याचे किंवा लक्ष्मीचे (शोभेचे)अस्तित्व असते. पण जो एके ठिकाणी बसून राहणारा आळशी असतो, तो मात्र निश्चितच पापी समजला जातो. कारण, इंद्र भगवान हेदेखील पुरुषार्थी माणसांचेच मित्र बनतात. म्हणून तू या जगात श्रम कर. चालत राहा. चालत राहा. कदापि थांबू नकोस. पुढे बराच उपदेश विस्ताराने आलेला आहे. आज खरी गरज आहे ती प्रत्येकाने आपल्या जीवनात श्रमनिष्ठा जोपासण्याची! कारण, जो श्रमनिष्ठ तपस्वी जीवन जगतो, त्याला सर्व गोष्टींची प्राप्त होत असते. श्रमामध्येच तर सर्व प्रकारचे सुख व ऐश्वर्य घडलेले आहे आणि हेच तत्त्व आपल्या वैदिक संस्कृतीत सामावलेले आहे. म्हणूनच ‘श्रमे श्री: प्रतिष्ठिता।’या प्रेरक विचारास आपण आपल्या जीवनाचे अविभाज्य अंग बनवूया आणि सर्वार्थाने यशस्वी होऊया!
 
- प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य
@@AUTHORINFO_V1@@